शुक्रवार, २४ जुलै, २०२०

कविता - नेता आणि भत्ता

नेता आणि भत्ता

नावाने फक्त जनसेवा पण
पुढारीच खात आहेत मेवा
संपत्तीतही भरमसाठ वाढ
सर्वांना वाटेल याचा हेवा

मिळाली संधी लुटालूटीची
म्हणून का मूळासकट खावा ?
पाच वर्षातच कसा वाढतो त्यांचा
शतपट चल आणि स्थायी ठेवा

दुरध्वनी नि टपाल भत्ता हजारो 
फुकट गाडीसह चालक सेवा
एस टी,रेल्वे फुकट प्रवास आणि
चाखतात  विमानाचीही हवा

आजी माजी लोकप्रतिनिधी
म्हणे करतात ते 'लोकसेवा'
आमदार खासदाराना त्यासाठी
भत्ता आणि लाखात पगार हवा

जरी हरले तरी म्हणे त्याना  
पुन्हा पेन्शनचा पाहिजेच मेवा
यांच्या नंतर त्यांच्या पत्नींचा
आहे पुन्हा  पेन्शनसाठी दावा

मग घाम गाळून शेतकरी,श्रमिक
का पेन्शनपासुन वंचित रहावा ?
तीस वर्षे सेवा करूनही कर्मचारी
सांगा तो पेन्शनमूक्त का व्हावा ?

विकासासाठी तिजोरीत खडखडाट
असतोच नेहमी त्यांचा कांगावा
उखळपांढरे करून घेताना मग 
त्यांची मती  जाते कुठे तेंव्हा ?

'आता तरी जागे व्हा' विनंती
माझ्या ताई आणि भावा 
हाणून पाडा हा उघड दरोडा
सत्ताधीश नि विरोधकांचा कावा

आमदार खासदारांचा पगार भत्ता
आता कपात व्हायलाच हवा
'स्वार्थासाठी एक' अशा लोकांवर
आता ठोकलाच पाहिजे दावा...

© जयवंत जाधव, कोवाड
ता . चंदगड जि. कोल्हापूर
मोबाईल - 9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा