Sunday, August 22, 2021

जयवंत जाधव पुस्तक परिचय 'कौल' कथा संग्रह

.. रहस्यप्रधान कथासंग्रह : ' कौल '

                             ( परीक्षण : उमेश मोहिते )
                  -----    -----      -----

        मराठी साहित्यविश्वात कवितेखालोखाल मोठया प्रमाणावर लिहिला जाणारा एक सशक्त साहित्यप्रकार म्हणून कथेकडे पाहिले जाते.आज महाराष्ट्राच्या विविध भूप्रदेशामध्ये वास्तव्य असणारे लेखक कथालेखन करीत असून मराठी कथा विविध अंगांनी बहरत आहे,याचीच प्रचिती जयवंत जाधव लिखित ' कौल ' हा लघुकथासंग्रह वाचताना येते.या कथासंग्रहामध्ये एकूण १४ लघुकथा असून या कथांमधून मुख्यतः मध्यमवर्गीय जीवन जाणिवा व्यक्त झाल्या आहेत.ही कथा रहस्यप्रधान असून रंजनपरता तिचे वैशिष्टय आहे. ' कौल ' या पहिल्या शीर्षक कथेत गावच्या लक्ष्मीमातेने उजवा कौल दिल्यामुळे ' धनवान ' झालेला धानबाशेठ भेटतो आणि त्याच्या सत्काराच्या वेळी तो आपल्या श्रीमंतीचे रहस्य सांगताना त्याने स्वतः अमलात आणलेला एक नवा ' विचार ' सांगतो.अर्थात हा त्याचा नवा आचार-विचार समजण्यासाठी प्रत्यक्ष ही कथा वाचणेच इष्ट ठरेल.दीपा,तिचा सैन्यात जवान असलेला पिता अशोक आणि तिची आई चारुशिला यांची एका विचित्र योगा-योगाने घडून आलेल्या परिस्थितीमध्ये कशी दुःखद घुसमट होते,याचे उत्कंठापूर्ण नि रहस्यमय चित्र ' कोंडी ' कथेत प्रकटले आहे.नेपाळच्या सीमावर्ती भागात दहशतवादी हल्ल्यात मारला गेलेला अशोक महिनाभराने ' जिवंत ' होऊन गावी परत येतो आणि पुढे चारुशिलाच्या घरात जे काही घडते,त्याचे या कथेतील चित्रण वाचकमन अस्वस्थ करुन सोडते.प्रल्हाद आणि त्याची प्रेयसी प्रा.शिरसाट यांच्याविरुद्ध षडयंत्र रचतात आणि प्रा.शिरसाट यांच्याच मोबाईलवरून प्रल्हाद अश्लिल स्वरूपाचे संदेश प्रेयसीला पाठवत राहतो.परिणामतः प्रा.शिरसाट गावात बदनाम होतात,पण स्वच्छ चारित्र्याचे प्रा.शिरसाट या आपत्तीमधून कसे निर्दोष सुटतात आणि या कारस्थानामागील खरा गुन्हेगार कसा पोलीसांच्या जाळ्यात अडकतो,याचे अगदी मनोरंजक वर्णन ' जाळं ' कथेत आहे.केशव आणि सुलभी हे कष्टकरी जोडपं गोव्याच्या पीटर सावकाराच्या शेतीमध्ये काम करीत असताना पीटर सावकाराच्या श्रीमंतीचा मोह सुलभीला होतो आणि ती वाहवत जाते.मात्र शेवटी वाहवत गेलेली सुलभी कशी विनाशापासून वाचते,याचे रसभरीत वर्णन ' मोह ' कथेतून वाचण्यास मिळते,तर भरमू या लोभी नि निर्दयी दीराकडून फसवणूक झालेल्या विधवा लक्ष्मीकाकूची कर्मकहाणी ' देवाचा न्याय ' कथेत आहे. शाळेत नाटकात अभिनय करणाऱ्या शीतलचे आई-वडील दहावी परीक्षेनंतर तिचे लग्न जमवू लागतात,तेव्हा शीतल त्यांचा बेत कसा उधळून लावते,याची रंगतदार कहाणी ' भूमिका ' कथेच्या केन्द्रस्थानी आहे.सासणे सर उन्हाच्या काहिलीत आपल्या दुचाकीवर रस्त्याने पायी चालणाऱ्या वृध्द आजीला घेतात आणि त्यामुळे कसे संकटात अडकतात,हे ' धडा ' कथेत वाचायला भेटते.प्रकाश नि शालन या निपूत्रिक दांपत्याला अनाथ मूल दत्तक घ्यायला लावणाऱ्या डॉ.स्नेहल पाटील यांची बोधपर कहाणी म्हणजे ' अभिषेक ' कथा आहे.' नटसम्राट ' सिनेमा पाहून तात्यासाहेब आणि शामकाका यांची ' पैज ' लागते आणि तात्यासाहेबांवर त्यांचा मुलगा नि सून किती माया करतात,हे पाहण्यासाठी शामकाका तात्यासाहेबांचे खोटे अपहरण घडवून आणतात.यातून काय वास्तव उजेडात येते,हे जाणण्यासाठी ' पैज ' ही उपयुक्त बोध देणारी रहस्यकथाच वाचणे श्रेयस्कर ठरेल.साधे दहावीपर्यंतही शिक्षणही पूर्ण न केलेल्या किसनच्या आयुष्याला योगायोगाने लागलेले वळण चित्रित करणारी ' थाट ' कथा मनोरंजक आहे,तर निराधार वृद्ध शंकरकाका आणि शबानाचाची यांच्यात काहीएक निमित्ताने उत्पन्न झालेले स्नेहबंध कसे धर्मापल्याडचे आहेत,याचे सूचन ' धर्म ' कथेत अगदी कलात्मकतेने आले असून मानवता हाच खरा धर्म आहे,याची साक्ष ही कथा देते.तिसऱ्यांदाही मुलगीच झाली म्हणून मानसिक संतुलन गमावून बसलेल्या गोंद्या नांवाच्या ऊसतोड मजूराची कहाणी  ' सूटका ' कथेत आहे. ' संधी ' कथा जवळच्या मित्राकडून निवेदकास आलेला ए्क विपरीत अनुभव मांडणारी आहे,तर ' उपाय ' या कथेत वृध्द मनोहररावांनी त्यांच्या विधवा सुनेवर आलेल्या संकटामधून तिचा बचाव करण्यासाठी केलेल्या कौशल्याचे आविष्करण आहे.असो...
  ..थोडक्यात जयवंत जाधव यांच्या ' कौल ' कथासंग्रहातून लेखकाने मध्यमवर्गीय आणि कष्टकरी वर्गाचे भावविश्व टिपले असून वेगवान कथानक,ओघवती लेखनशैली,सहजसुंदर निवेदन आणि रांगडया कोल्हापूरी बोलीभाषेतील संवादांमुळे ही कथा मनाची पकड घेते.तसेच लेखक कथेत निर्माण केलेली उत्कंठा शेवटापर्यंत टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे आणि त्यामुळे कथा वाचण्यास एकदा सुरुवात केली,की वाचक कथेत नकळतपणे गुरफटत जातो आणि शेवटी रहस्यस्फोट झाला की,वाचकाला एकदम सुखद धक्का बसतो आणि तो स्तिमितही होतो.हेच कथालेखक जयवंत जाधव यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे.एकूणात ' कौल ' मधील कथेत काही नवखेपणाच्या खुणा जरी जाणवत असल्या तरी ही करमणूकप्रधान कथा वाचकाचे घटकाभर मनोरंजन तर करतेच पण त्याशिवाय काहीएक उपयुक्त असा बोधही देते,हे नक्की ! ( या दृष्टीने या संग्रहामधील ' मोह ', ' धडा ' आणि ' अभिषेक ' या कथा विशेष महत्त्वाच्या आहेत.) यासाठी लेखक जयवंत जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन  !  !

कथासंग्रह   -   कौल
लेखक.      -   जयवंत जाधव
प्रकाशक.   -   अथर्व प्रकाशन,
                    कोल्हापूर.
                    ( मो.९८५०६९९९११ )
पृष्ठे           -   १८४
मूल्य.        -   ३०० रु.
   ----------------  -----------------

उमेश मोहिते,
चलभाष : ९४०५०७२१५४

Monday, August 2, 2021

कौल कथासंग्रहाचे प्रकाशन ..

पुस्तक परिचय "कौल" कथासंग्रह

सकारात्मक विचारसरणीने ठासून भरलेला कथासंग्रह - कौल
----------------------------------------------‐--------------
परिक्षण - प्रा. बा.स.जठार (गारगोटी)
                9850393996
---------------------------------------------------------
कथासंग्रहाचे नाव - कौल
लेखक-जयवंत जाधव  9403463881
प्रकाशक - अथर्व प्रकाशन, कोल्हापूर*
पृष्ठे - 184
किंमत - ₹ 300
---------------------------------------------------------------
           कोवाड गावचे सुपूत्र *जयवंत जाधव* यांचा *कौल कथासंग्रह* सकारात्मक विचारसरणीने ठासून भरलेला कथासंग्रह आहे. कुटुंबव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा विकास हा राबत्या हातावरच अवलंबून असतो. गावातील मोकळ्या हातांना काम देण्यासाठी समाजदृष्ट्या उलट्या काळजाचा बनलेला धानबा मनातील गुपीत न उलगडता कौलाला बसतो. देवी आणि त्याच्यातील हा गुप्त करार *कौल* कथेला वेगळेपण देणारा कसा ठरतो. हे कथा वाचल्यावरच समजून येते. हल्लीच्या जमान्यात, लेखकाने मांडलेली कल्पना प्रत्यक्षात उतरली तर नक्कीच समाजाचा विकास होईल हे वाचकही समजून घेईल.
                 कृत्रिमतेच्या बुरख्याखाली झाकलेली मानवी मनाची कोंडी काही केल्या सुटत नाही. स्वार्थानं बरबटलेलं मन वेळप्रसंगी कठोर - मृदू बनतं पण शेवटी पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. हे *कोंडी* या कथेतून लेखकाने पटवून दिले आहे. कथेत लेखकाने मांडलेला वेगळा बाज ती वाचून पूर्ण केल्याशिवाय पुस्तक मिटवू देत नाही.  लेखकाच्या याच वैशिष्ट्यामुळे पुस्तकाला वाचनीय बनवलं आहे. स्वार्थापोटी दुस-यांना अडकवण्यासाठी वापरलेलं साधन म्हणजे जाळं होय.  हेच जाळं लेखकाने वाचकांच्याही मनाला कैद करण्यासाठी शब्दरुपी धाग्यांनी विणलेले आहे की काय असे वाटते. *जाळं* ही कथा न्यायव्यवस्थेवरील विश्वास, आरोपीचा पुरावा, सरांचं डळमळीत मन याभोवती फिरती ठेवण्याचं लेखकाचं कसब दिसून येतं.
             *मोह* या कथेत नेमकेपणा आणि वातावरण निर्मिती करत वाचकाला नेमका सार देण्याचं लेखकाचं लेखन वाखाणण्याजोगे आहे. *देवाचा न्याय* या कथेत ग्रामीण समाजातील  भोळीभाबडी लक्ष्मी आणि तिचा बिलंदर, कपटवृत्तीचा दिर या दोघातील घमासान चितारताना मोठ्या आवाजात विरून जाणारा छोटा आवाज मनाला करुणेचा पाझर फोडून जातो. नाटकातील भूमिका वटवत असताना आयुष्याचीही भूमिका चोखपणे वटवणा-या शीतलचा, स्टेजवरचा जोश, उत्साह, कणखरपणा यांचं प्रतिबिंब *भूमिका* या कथेतून वाचायला मिळतं.
               बेरकी म्हातारी, गंडवणारं तिचं पोरगं आणि गंडलेले सर या त्रिकुटाभोवती फिरणारी *धडा* ही कथा, मुलांना शाळेत शिकवणा-या मास्तरलाच धडा शिकवून जाते. ' विश्वास मेला पानिपतच्या लढाईत.' हे एखाद्याच्या तोंडून येणारे वाक्य आता  पावलोपावली जाणवत असल्याचे समजून येते. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी संधी नशिबाचं दार ठोठावत येते. तीच वेळ साधून घेणारा संधीचं सोनं करतो अन्यथा बरबादी ठरलेलीच असते. अशाच धाटणीची *संधी* ही कथा माणसाला विचार करायला लावणारी आहे. मानसिक समाधान देणारी *अभिषेक* ही कथा तर आयुष्याचा खराखुरा चेहरा दाखवणारी *पैज* ही कथा मानवी स्वभावाच्या विरूध्द बाजूंचे प्रतिबिंब दाखवणा-या कथा आहेत. यातील एक कथा आनंदाश्रूंना मोकळीक देते तर दुसरी दुःखाश्रूंना मोकळीक देते.
            अर्धवट शाळा सोडलेला किसन, गोव्याची नोकरी, जेनीचं मुकं प्रेम, पोर्तुगाल सफर, या सा-या घटनांतून वळणावळणांनी पुढे सरकत राहणारी *थाट* ही कथा गावपणात घडलेल्या मनाला आपल्या मातीकडे कशी खेचते याचे वर्णन करताना जमीन आणि आसमान यामधील सेतू बळकट केल्याची साक्ष लेखक वाचकाला देतो. माणसातली माणुसकी शिकवणारी *धर्म* ही कथा  काळजाला भिडणारी आहे. या कथेतील घटना, पात्रे, प्रसंग या सा-यांची गुंफण उत्कृष्टपणे केली असल्याने कथा वाचकाच्या मनाचा ठाव घेते. *सुटका* आणि *उपाय* या दोन्ही कथा ग्रामीण समाजाचं चित्रण डोळ्यासमोर उभं करणा-या आहेत. 
              विषयाची विविधता, नेमकेपणाची साथ, मनाला भुरळ घालणारी शब्दशैली, साजेसं मुखपृष्ठ यामुळेच सर्वांची मांडणी करत लावलेला कौल वाचकरूपी देव निश्चितपणे अभिप्रायरूपाने लेखकाने देईल यात शंकाच नाही. लेखकाच्या भावी साहित्यप्रवासास शुभेच्या देऊन मी माझा शाब्दिक कौल थांबवतो.       ..                                                   रहस्यप्रधान कथा : ' कौल '
                             ( परीक्षण : उमेश मोहिते )
                  -----    -----      -----
   .. मराठी साहित्यविश्वात कवितेखालोखाल मोठया प्रमाणावर लिहिला जाणारा एक सशक्त साहित्यप्रकार म्हणून कथेकडे पाहिले जाते.आज महाराष्ट्राच्या विविध भूप्रदेशामध्ये वास्तव्य असणारे लेखक कथालेखन करीत असून मराठी कथा विविध अंगांनी बहरत आहे,याचीच प्रचिती जयवंत जाधव लिखित ' कौल ' हा लघुकथासंग्रह वाचताना येते.या कथासंग्रहामध्ये एकूण १४ लघुकथा असून या कथांमधून मुख्यतः मध्यमवर्गीय जीवन जाणिवा व्यक्त झाल्या आहेत.ही कथा रहस्यप्रधान असून रंजनपरता तिचे वैशिष्टय आहे. ' कौल ' या पहिल्या शीर्षक कथेत गावच्या लक्ष्मीमातेने उजवा कौल दिल्यामुळे ' धनवान ' झालेला धानबाशेठ भेटतो आणि त्याच्या सत्काराच्या वेळी तो आपल्या श्रीमंतीचे रहस्य सांगताना त्याने स्वतः अमलात आणलेला एक नवा ' विचार ' सांगतो.अर्थात हा त्याचा नवा आचार-विचार समजण्यासाठी प्रत्यक्ष ही कथा वाचणेच इष्ट ठरेल.दीपा,तिचा सैन्यात जवान असलेला पिता अशोक आणि तिची आई चारुशिला यांची एका विचित्र योगा-योगाने घडून आलेल्या परिस्थितीमध्ये कशी दुःखद घुसमट होते,याचे उत्कंठापूर्ण नि रहस्यमय चित्र ' कोंडी ' कथेत प्रकटले आहे.नेपाळच्या सीमावर्ती भागात दहशतवादी हल्ल्यात मारला गेलेला अशोक महिनाभराने ' जिवंत ' होऊन गावी परत येतो आणि पुढे चारुशिलाच्या घरात जे काही घडते,त्याचे या कथेतील चित्रण वाचकमन अस्वस्थ करुन सोडते.प्रल्हाद आणि त्याची प्रेयसी प्रा.शिरसाट यांच्याविरुद्ध षडयंत्र रचतात आणि प्रा.शिरसाट यांच्याच मोबाईलवरून प्रल्हाद अश्लिल स्वरूपाचे संदेश प्रेयसीला पाठवत राहतो.परिणामतः प्रा.शिरसाट गावात बदनाम होतात,पण स्वच्छ चारित्र्याचे प्रा.शिरसाट या आपत्तीमधून कसे निर्दोष सुटतात आणि या कारस्थानामागील खरा गुन्हेगार कसा पोलीसांच्या जाळ्यात अडकतो,याचे अगदी मनोरंजक वर्णन ' जाळं ' कथेत आहे.केशव आणि सुलभी हे कष्टकरी जोडपं गोव्याच्या पीटर सावकाराच्या शेतीमध्ये काम करीत असताना पीटर सावकाराच्या श्रीमंतीचा मोह सुलभीला होतो आणि ती वाहवत जाते.मात्र शेवटी वाहवत गेलेली सुलभी कशी विनाशापासून वाचते,याचे रसभरीत वर्णन ' मोह ' कथेतून वाचण्यास मिळते,तर भरमू या लोभी नि निर्दयी दीराकडून फसवणूक झालेल्या विधवा लक्ष्मीकाकूची कर्मकहाणी ' देवाचा न्याय ' कथेत आहे. शाळेत नाटकात अभिनय करणाऱ्या शीतलचे आई-वडील दहावी परीक्षेनंतर तिचे लग्न जमवू लागतात,तेव्हा शीतल त्यांचा बेत कसा उधळून लावते,याची रंगतदार कहाणी ' भूमिका ' कथेच्या केन्द्रस्थानी आहे.सासणे सर उन्हाच्या काहिलीत आपल्या दुचाकीवर रस्त्याने पायी चालणाऱ्या वृध्द आजीला घेतात आणि त्यामुळे कसे संकटात अडकतात,हे ' धडा ' कथेत वाचायला भेटते.प्रकाश नि शालन या निपूत्रिक दांपत्याला अनाथ मूल दत्तक घ्यायला लावणाऱ्या डॉ.स्नेहल पाटील यांची बोधपर कहाणी म्हणजे ' अभिषेक ' कथा आहे.' नटसम्राट ' सिनेमा पाहून तात्यासाहेब आणि शामकाका यांची ' पैज ' लागते आणि तात्यासाहेबांवर त्यांचा मुलगा नि सून किती माया करतात,हे पाहण्यासाठी शामकाका तात्यासाहेबांचे खोटे अपहरण घडवून आणतात.यातून काय वास्तव उजेडात येते,हे जाणण्यासाठी ' पैज ' ही उपयुक्त बोध देणारी रहस्यकथाच वाचणे श्रेयस्कर ठरेल.साधे दहावीपर्यंतही शिक्षणही पूर्ण न केलेल्या किसनच्या आयुष्याला योगायोगाने लागलेले वळण चित्रित करणारी ' थाट ' कथा मनोरंजक आहे,तर निराधार वृद्ध शंकरकाका आणि शबानाचाची यांच्यात काहीएक निमित्ताने उत्पन्न झालेले स्नेहबंध कसे धर्मापल्याडचे आहेत,याचे सूचन ' धर्म ' कथेत अगदी कलात्मकतेने आले असून मानवता हाच खरा धर्म आहे,याची साक्ष ही कथा देते.तिसऱ्यांदाही मुलगीच झाली म्हणून मानसिक संतुलन गमावून बसलेल्या गोंद्या नांवाच्या ऊसतोड मजूराची कहाणी  ' सूटका ' कथेत आहे. ' संधी ' कथा जवळच्या मित्राकडून निवेदकास आलेला ए्क विपरीत अनुभव मांडणारी आहे,तर ' उपाय ' या कथेत वृध्द मनोहररावांनी त्यांच्या विधवा सुनेवर आलेल्या संकटामधून तिचा बचाव करण्यासाठी केलेल्या कौशल्याचे आविष्करण आहे.असो...
  ..थोडक्यात जयवंत जाधव यांच्या ' कौल ' कथासंग्रहातून लेखकाने मध्यमवर्गीय आणि कष्टकरी वर्गाचे भावविश्व टिपले असून वेगवान कथानक,ओघवती लेखनशैली,सहजसुंदर निवेदन आणि रांगडया कोल्हापूरी बोलीभाषेतील संवादांमुळे ही कथा मनाची पकड घेते.तसेच लेखक कथेत निर्माण केलेली उत्कंठा शेवटापर्यंत टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे आणि त्यामुळे कथा वाचण्यास एकदा सुरुवात केली,की वाचक कथेत नकळतपणे गुरफटत जातो आणि शेवटी रहस्यस्फोट झाला की,वाचकाला एकदम सुखद धक्का बसतो आणि तो स्तिमितही होतो.हेच कथालेखक जयवंत जाधव यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे.एकूणात ' कौल ' मधील कथेत काही नवखेपणाच्या खुणा जरी जाणवत असल्या तरी ही करमणूकप्रधान कथा वाचकाचे घटकाभर मनोरंजन तर करतेच पण त्याशिवाय काहीएक उपयुक्त असा बोधही देते,हे नक्की ! ( या दृष्टीने या संग्रहामधील ' मोह ', ' धडा ' आणि ' अभिषेक ' या कथा विशेष महत्त्वाच्या आहेत.) यासाठी लेखक जयवंत जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन  !  !





कथासंग्रह   -   कौल
लेखक.      -   जयवंत जाधव
प्रकाशक.   -   अथर्व प्रकाशन,
                    कोल्हापूर.
                    ( मो.९८५०६९९९११ )
पृष्ठे           -   १८४
मूल्य.        -   ३०० रु.
   ----------------  -----------------




उमेश मोहिते,
चलभाष : ९४०५०७२१५४