Friday, October 23, 2020

शिक्षक संघटना अधिवेशन व वर्गणी अर्थकारण


 शिक्षक संघटना अधिवेशन आणि अर्थकारण....


महाराष्ट्रात सर्वात मोठी (संख्यावरून ) शासकिय कर्मचारी संघटना बहुतेक "शिक्षक संघटनां" असाव्यात. त्यात प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक संघटना कार्यरत आहेत. प्रत्येक संघटनांची दर दोन किंवा तीन वर्षानी अधिवेशने होत असतात. त्यातही प्राथमिक शिक्षक संघटनांची अधिवेशने ही दणकेबाज होत असतात. शिक्षकांचे अनेक प्रश्न घेऊन राज्यातील मोठ्या नेत्यांना आमंत्रित करुन मोठया उपस्थितीत अधिवेशन पार पडते.
   प्रत्येक संघटना आपल्या अधिवेशनाला लाख दोन लाख सिकांची उपस्थिती होती असे जाहिर करतात अधिवेानासाठी प्रत्येक शिक्षकी किमान ५०० रुपये वर्गणी गोळा केली जाते.
संघटनांच्या दाव्यापेक्षा कमी म्हणजे किमान १००००० / - (एक लाख ) उपस्थिती धरली तरी ५००००००० / - पाच कोटी रुपये रोख जमा होतात. इतका निधी कार्यकर्ते स्वतःची पदरमोड करून वसुल करतात. त्यासाठी संघटनेच्या निधीमधील रक्कम थोडीही वापरली जात नाही. पुर्णच्या पुर्ण रक्कम राज्य संघटनेच्या हातात जाते.
       अधिवेशनाच्या ठिकाणच्या कार्यक्रमाचा खर्च (मंडप पाच सहा लाख, साउंड सिस्टिम एक लाख व इतर तीन चार लाख धरा )जास्तीत जास्त दहा लाखाच्या वर जात नसेल. कारण संघटनेचे सर्व कायकर्ते स्वतःचा प्रवासखर्च, जेवण, चहापाणी खर्च स्वतःच्या खिशातूनच करत असतो. बर, अधिवेशनाचा हा खर्च तुम्हाला कमी वाटत असेल तर चला डबल करु. म्हणजे वीस लाख झाला असे समजू. तरीही एकुण रक्कमेतील 4 कोटी 8O लाख रुपये उरतात. 
त्याचे काय होते  ????
राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याना संघटनेच्या कामासाठी फक्त प्रवासखर्च 4 कोटी 8O लाख खर्च???बर, त्याचा दिशेबही नसतो.
       संघटना बांधणीचं मुख्य कार्य घडते ते तालुक्या लेवललाच.
तालुक्यात संघटना जीवंत ठेवण्यासाठी किंवा कार्यकर्त्याना कार्यरत ठेवण्यासाठी विविध उपक्रम, कार्यक्रम ठेवावे लागतात स्नेहभोजन आयोजित करावे लागते, मोर्चे, आंदोलने, छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी निवेदने देण्यासाठी प्रवासखर्च असतो. तालुका लेवलच्या अधिवेशनचा खर्च असतो.
असाच खर्च जिल्हा पातळीवर असतो.
म्हणजेच संघटनेसाठी जास्तीत जास्त खर्च येतो तो तालुक्याला. त्यानंतर जिल्ह्याला. पण सारा निधी जातो तो राज्याला... म्हणजे अगदीच विरोधाभास....
म्हणून माझे असे मत आहे की या निधीचे वाटप योग्य नाही. कार्यकर्ता पातळीवर काम करणाऱ्या तालुका व जिल्हा शाखेला यातील वाटा मिळणे आवश्यक आहे. कारण राज्य पातळीवर इतका खर्च नसतो. उलट या इतक्या प्रचंड निधीमुळेच राज्य पातळीवरील नेत्यांत तूतू मीमी होत असते. व या पैशांसाठीच संघटनेमध्ये फुट पडते. त्यामुळे संघटनेच्या फुटीला कारणीभूत ठरणाऱ्या या निधीचे वाटप योग्य प्रमाणात तालुका व जिल्हा संघटनेसाठी व्हावे.जेणेकरून तालुका व जिल्हा लेवलला आर्थिक बळ मिळेल. 
या निधीच्या वाटपाचे प्रमाण खालील प्रमाणे असावे.
एकुण
तालुक्यात जमा झालेल्या एकुण निधीपैकी 
तालुक्याला ७० टक्के
जिल्ह्याला   २० टक्के
राज्याला     १० टक्के

समजा एका संघटनेच्या तालुक्यात पाचशे पावत्या फाडल्या तर एकुण 
२ लाख५० हजार जमा होतात.
त्यातील 
७० टक्के म्हणजे एक लाख ७५ हजार तालुक्याला .....
२० टक्के म्हणजे ५०हजार जिल्ह्याला....
१० टक्के म्हणजे २५ हजार राज्याला.....

तालुक्याला तीन वर्षासाठी एक लाख  ७५ हजार म्हणजे जास्त नव्हेत...

जिल्ह्याला एका तालुक्यातून ५० हजार म्हणजे किमान दहा तालुके धरले तरी एकुण पाच लाख ( ५०००००/-) रुपये जमा होतात. आणि....राज्याला
     राज्याला एका तालुक्यातून २५ हजार म्हणजे एका जिल्ह्यातून २ लाख ५० हजार . असे किमान ३० जिल्ह्यातून ७५००००० / - ( पंच्याहत्तर लाख रुपये ) जमा होतील.
  
राज्याला पंच्याहत्तर लाख, जिल्हाला पाच लाख व तालुक्याला पावणेदोन लाख रुपये निधी उपलब्ध होईल....
आणि हे प्रमाण अगदी योग्य आहे असे मला वाटते.
  हा लिखानाचा प्रपंच केवळ एका संघटनेसाठी नाही तर राज्यातील सर्व संघटनांसाठी आहे. कारण मी सर्व संघटना टिकल्या पाहिजे या मताचा आहे .कोणतीही संघटना आपापल्या परिने शिक्षकांसाठीच कार्य करते याची मला जाणिव आहे. संघटनेच्या तालुका लेवलला खर्च करण्यासाठी निधीच नसल्यामुळे तालुका पदाधिकाऱ्याना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागते.
  तालुका व जिल्हा लेवलच्या सर्व संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्याना विनंती आहे की निधीच्या अशा वाटपासाठी आग्रही रहावे कारण हे आपल्या हिताचच आहे. आणि कार्यकर्त्यानीही मागील हिशेब दिल्याशिवाय पावती फाडणार नाही अशी भूमिका घ्यावी (हिशेबाची एक PDF बनवली तरी सर्वांपर्यंत सहज पोहोचते. फक्त हिशेब द्यायची मानसिकता हवी ) म्हणून संघटनाच्या शुदधता मोहिमेसाठी अशा वाटपासाठी आग्रही व ठाम रहावे....
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
... सर्व संघटनांतील सर्वांसाठी....

🙏🏼मॅसेज प्रत्येक केंद्रातील ग्रुपवर फॉरवर्ड व्हावा. चिंतन व्हावे.🙏🏼🙏🏼

       जयवंत जाधव, कोवाड
       ता. चंदगड जि. कोल्हापूर
       मोबाईल  9403463881

Saturday, October 10, 2020

कविता - नको ते आहे स्वस्त

नको ते आहे स्वस्त
साऱ्या या जगात माझा भारत आहे मस्त
पाहिजे ते सोडून इथे,नको ते आहे स्वस्त

छेडाछेडी करण्यासाठी लागत नाही पैसा
बलात्काऱ्यांसाठी इथला कायदा ऐसा वैसा
अब्रु लुटती इथे सर्वांसमक्ष रात्री,भरदिवसा
तरी निवांत आहे शासन नि मंत्रीही आहेत मस्त 
खरंच सांगतो इथे अबलांची अब्रु झालीय स्वस्त ..

साऱ्या या जगात माझा भारत आहे मस्त
पाहिजे ते सोडून इथे,नको ते आहे स्वस्त

शेतात राबून भार्याच्या,नशिबी फाटका पदर
दलालांच्या हाती धान्य,मुलांचे रिकामे उदर
पड़के घर विसाव्याला, तक्तरे झाली चादर
कर्जापायी जीव दिला तरी शासन आहे सुस्त
खरंच सांगतो,बळीराजाचे इथे मरण झालेय स्वस्त

साऱ्या या जगात माझा भारत आहे मस्त
पाहिजे ते सोडून इथे,नको ते आहे स्वस्त

मोठमोठ्याने ठोकायच्या नुसत्या आरोळ्या
भावनेला हात घालूनी भाजून घ्यायच्या पोळ्या
चिंता देशाची नाही नेत्यांना,सैनिक झेलती गोळ्या
कितीतरी जीव हुतात्मे सीमेवर घालता गस्त
खरंच सांगतो इथे सैन्यांचे मरण झालेय स्वस्त

साऱ्या या जगात माझा भारत आहे मस्त
पाहिजे ते सोडून इथे,नको ते आहे स्वस्त

         ©जयवंत जाधव,कोवाड
         ता.चंदगड जि. कोल्हापूर
         मोबा -9403463881

Sunday, September 13, 2020

कविता - गडी चंदगडी

(चंदगड तालुका गौरव गीत )

*गडी चंदगडी*

गाजला चंदगड,सजला चंदगड, 
मनात चंदगड, जनात चंदगड
जिल्ह्यात राज्यात देशात जगात 
चंदगड गाजतोय हा  हरघडी 
आम्ही चंदगडी गडी चंदगडी           

चंदगडी चंदगडी चंदगडी 
मी चंदगडी चंदगडी चंदगडी
चंदगडी चंदगडी चंदगडी 
आम्ही चंदगडी चंदगडी चंदगडी   ॥ धृ ॥

चंदगड नगरीत भव्य मंदिर
कलाकुसर आहे किती सुंदर
वसला देव रवळनाथ युगंधर

गर्दहिरवी झाडी भोवताली
कोदाळीस्थित देवी माऊली
भक्तांच्या नवसाला पावली

जागृत दैवत देव वैजनाथ
भक्त जमतो इथे गुणगात
भक्तांच्या डोईवर सदा हात

भजन किर्तनी रममान वारकरी
अध्यात्मिक आम्ही गडी चंदगडी ॥ १ ॥

अंबोलीसम सुंडी धबधबा धवल
स्वप्नवत आहे पाँईट स्वप्नवेल
महाबळेश्वर सिमलाही इथे फेल

ऐतिहासिक कलानिधीगड
स्वराज्यांत गणती गंधर्वगड
राजा महिपाळाचा महिपाळगड

नाव मोठे स्वराज्यात पारगडाचे
वास्तव्य होते इथे शिवरायांचे
वंशज शेलारमामा तानाजीचे


सर्प प्रदर्शनात प्रसिद्ध ढोलगरवाडी
स्वातंत्र्यसेनानी,सैनिक हुतात्मे चंदगडी ॥ २ ॥

पश्चिमपट्टा लाललाल माती
काळी सुपिक जमीन कर्याती
पिकतात धनधान्याचे मोती

तालुक्यात होते वतनदार
हेऱ्याचे सांवत इनामदार
कोवाडकर देसाई सरकार

ज्यांनी त्यांची जमीन कसली
सात बाराला नावे डसली
कुळकायद्याने जनता हसली

उताऱ्यासाठी डायरी केली उघडी
शेतीने समृद्ध आम्ही गडी चंदगडी ॥ ३ ॥

सीमेला खेटली राज्य दोन
शेजारी आहेत जिल्हे तीन
सात तालुके आहेत लागून

कोल्हापूर टाईप खुप बंधारे
धरणे जंगमहट्टी तिलारी जांबरे
कैक ठिकाणी लघु पाटबंधारे

हिरण्यकेशी घटप्रभा ताम्रपर्णी
मार्कंडेय तिलारी नदींचे पाणी
फिरले इथल्या सुपिक रानोरानी

निसर्ग हवापाणी जगात लै भारी
शेतीवाडीत रमतो  गडी चंदगडी ॥ ४॥

टपोरे दाणे भाताच्या तुर्‍यात
ऊस डोलतो कसा कुऱ्यात
असतो एक नंबर उताऱ्यात

वाटाना भुईमूग बिनिस हरभरा
प्रसिद्ध सोले दिडघे नि मसुरा
मिरची गहू मका नाचना साजरा

इथल्या काजूची चव आगळी
पिकली पौष्टीक गोड रताळी
कुठे नारळ कुठे पिकते केळी

आंबे फणस करवंदाची झाडी
रानमेवा चाखतो गडी चंदगडी ॥ ५ ॥

'ओलम','इको'ला खाजगी सवलत
शेतकऱ्यांचाही सहकारी दौलत
तिन्ही कारखाने कसे उभे डौलत

शिनोळी हलकर्णी एमआयडीसी
जुळली नाळ आधुनिक उद्योगाशी
जलविद्युत प्रकल्प तिलारी पायथ्याशी

तेल राईसमील,पोल्ट्री जोरदार
चिकण,काजूफॅक्टरीत रोजगार
आली धवलक्रांती दुधाची धार

विकासात घेतोय आता आघाडी
कष्टकरी उद्योगी  गडी चंदगडी ॥६॥

साहित्यात झाले नाव देशभर
पद्मश्री रणजित देसाई स्वामीकार
सिनेनिर्माता दळवी विजयकुमार

पाडूरंग जाधव,पांडूरंग कुंभार
शंकर हदगल,पारु नाईक,केसरकर 
साबळे,नामदेव कांबळे,चांदेकर

शि तु गावडे,बी एन,हणमंत, के जे
शिवणगेकर,कोकीतकर,खाडे बिर्जे
एकनाथ तात्यांचाही 'ठोकळा' गाजे

नंदकुमार मोरेंचा प्रबंध 'भाषा चंदगडी' 
या कवितेचे कवी जयवंत जाधव चंदगडी ॥ ७ ॥

सुर्यकांत दळवी एक नट थोर
प्रसिद्ध नामदेव निकम शाहीर
विकास 'जलवा' टीव्ही स्टार

इथे मिळते सारे शिक्षण दर्जेदार
घडले क्लासवन अधिकारी फार
खेळाडूही जिद्दी आणि उर्जेदार

वल्लभ नि मनवाडकर राष्ट्रीय विनर
सुरज सिद्धार्थ प्रो कब्बडी स्टार
गोळा फेकीत बेनके किर्तीकुमार

शिवछत्रपती क्रीडा पुरकार पै.नाईक मारुती
महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर चंदगडी ॥ ८ ॥

प्रसिद्ध हाफ चड्डी चंदगडी
डोकीस शोभे टर्कीनची घडी
असा रुबाबदार गडी चंदगडी

नऊवारी साडी चंदगडी कास
गोलमोठा कुंकू कपाळी खास
आता नव्या फॅशनची मिजास

आहे मायेचा ओलावा खोल
असते पाहुणचारालाही मोल
चंदगडी भाषेतील प्रेमळ बोल

सुर पश्चिमेला कोकणी, पूर्वेला कानडी
प्रमाण भाषेतही खुलतो गडी चंदगडी ॥ ९ ॥

नाट्य आणि सांस्कृतिक चळवळ
कामगार,भूमीहीनांचीही कळकळ
तरुण रक्तात राजकारण सळसळं

जेष्ठ,तरुण नेत्यांत मोठी धडाडी
कुठे आघाडी,आहे कुठे बिघाडी
कांही प्रामाणिक,कांहीत लबाडी

आमदार झाले व्हीबी, व्ही.के .
नरसिंगराव पाटील नावाचे दोघे
राजेश पाटलांचे नशीब चमके

मंत्री भरमूआण्णांना लाल दिव्याची गाडी
आणि राजकारणी आम्ही गडी चंदगडी  ॥ १० ॥

गाजला चंदगड,सजला चंदगड, 
मनात चंदगड, जनात चंदगड
जिल्ह्यात राज्यात देशात जगात 
चंदगड गाजतोय हा हरघडी
                  आम्ही चंदगडी
                  मी गडी चंदगडी
                  आम्ही चंदगडी
                  मी गडी चंदगडी

चंदगडी चंदगडी चंदगडी 
मी चंदगडी चंदगडी चंदगडी
चंदगडी चंदगडी चंदगडी 
आम्ही चंदगडी चंदगडी चंदगडी   ॥ धृ ॥

 
      ©जयवंत जाधव,कोवाड
      ता.चंदगड जि.कोल्हापूर
      मोबाईल 9403463881

बालकविता - शाळा कधी सुरु होणार ?

बालकविता

शाळा कधी सुरु होणार ?
सांग ना गं मम्मी आता
हा कोरोना कधी जाणार ?
कोरोना जाऊन पुन्हा माझी
शाळा कधी सुरु होणार ? ॥ धृ ॥
आठवण येते शाळेची
तो आठवतो माझा वर्ग
आठवतात बाई,गुरुजी
दाखवत आम्हा चागला मार्ग
त्यांच्यासोबत शिकायला
पुन्हा कधी मिळणार ?
सांग ना गं मम्मी आता
हा कोरोना कधी जाणार ?
कोरोना जाऊन पुन्हा माझी
शाळा कधी सुरु होणार ?॥१॥
रोज आम्ही गाठत होतो
धावत धावत शाळा
परिपाठाआधी खेळायला
सारे होत होतो गोळा 
गंमतीजमती करायला
पुन्हा कधी मिळणार ? 
सांग ना गं मम्मी आता
हा कोरोना कधी जाणार ?
कोरोना जाऊन पुन्हा माझी
शाळा कधी सुरु होणार ?॥ २ ॥
रांगेत सारे बसत होतो
होताच परिपाठाची वेळ
प्रार्थना नि समूहगीतात
जुळायचा तालसुरांचा मेळ
बोधकथा पंचाग  सांगायला
पुन्हा कधी मिळणार ?
सांग ना गं मम्मी आता
हा कोरोना कधी जाणार ?
कोरोना जाऊन पुन्हा माझी
शाळा कधी सुरु होणार ? ॥ ३ ॥

शिकत होतो छान पाठ
शिकत होतो व्याख्या सुत्र
धडे कविता गाणी गोष्टी
शिकायचो खेळ आणि चित्र
दुपारच्या सुट्टीत गरम जेवण
पुन्हा कधी मिळणार ?
सांग ना गं मम्मी आता
हा कोरोना कधी जाणार ?
कोरोना जाऊन पुन्हा माझी
शाळा कधी सुरु होणार ?
 ॥४॥
सांस्कृतिक नि क्रीडा स्पर्धांत
करून दाखतवत होतो कमाल
वनभोजन आणि सहलीत
करायचो खुप खुप धमाल
गुरुजी बाई नि मित्रांसोबत
पुन्हा कधी गप्पाटप्पा होणार ?
सांग ना गं मम्मी आता
हा कोरोना कधी जाणार ?
कोरोना जाऊन पुन्हा माझी
शाळा कधी सुरु होणार ? ॥५॥
          जयवंत जाधव, कोवाड
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो .9403463881

कविता - मंदीत संधी

मंदीत संधी

कोरोनाने आली साऱ्यांच्या कामधंद्यात मंदी
लबाडांनी यातही साधून घेतली आपली संधी॥धृ ॥
गावोगावी आणि शहरात
किती लॉकडाऊन झाले
शिल्लक होते ते अन्नधान्य
कामाविना खाऊन झाले
रिकामा खिसा रिकामी मन,ठप्प झाली बुद्धी ॥ १ ॥
लबाडांनी यातही साधून घेतली आपली संधी ॥धृ ॥
महामारीत या महागाईनेही
आपले वर काढले डोके
अव्वाच्यासव्वा 'लोण्या'साठी
टपले साठेबाज व्यापारी बोके
नडलेल्यांना लूटून, करून घेतली आपली चांदी ॥ २ ॥
लबाडांनी यातही साधून घेतली आपली संधी ॥धृ ॥
भयभीत पेशंटच्या खिशावर
'पिपासु डॉक्टरांचा'  डल्ला
अवाढव्य बिले आकारून
भरून घेतला आपला गल्ला
'धंदा' सोडून 'सेवा' थोडी देणार तरी कधी ? ॥ ३ ॥
लबाडांनी यातही साधून घेतली आपली संधी ॥धृ ॥
बऱ्याच नेते अधिकाऱ्यांनी
भ्रष्टाचाराच्या परिसीमा गाठल्या
लाखांच्या  सरकारी योजना
साऱ्या मधल्यामधेच लाटल्या
सरकारी कामकाजात सारी माजली अंधाधुदी ॥४॥
लबाडांनी यातही साधून घेतली आपली संधी ॥धृ ॥
माणूसच(?) माणसासोबत
निर्दय वागतोय किती
निर्जिव कोरोनापेक्षा आता
यांचीच वाटतेय भिती
कधी उतरणार डोळ्यावरून याच्या पैशांची धुंदी? ॥ ५ ॥
लबाडांनी यातही साधून घेतली आपली संधी ॥धृ ॥

       जयवंत जाधव, कोवाड
       ता .चंदगड जि कोल्हापूर
       मोबाईल 9403463881

Sunday, August 23, 2020

कवी कथाकार जयवंत जाधव: बालकविता - सोनीच्या स्वप्नात

कवी कथाकार जयवंत जाधव: बालकविता - सोनीच्या स्वप्नात: बालकविता सोनीच्या स्वप्नात सोनीनं पाहिलं एकदा भूताचं घर खालती छप्पर आणि जमीन वर भूताचे डोळे म्हणे होते ते मागे छान छान गोष्टी तो...

कवी कथाकार जयवंत जाधव: बालकविता - सोनीच्या स्वप्नात

कवी कथाकार जयवंत जाधव: बालकविता - सोनीच्या स्वप्नात: बालकविता सोनीच्या स्वप्नात सोनीनं पाहिलं एकदा भूताचं घर खालती छप्पर आणि जमीन वर भूताचे डोळे म्हणे होते ते मागे छान छान गोष्टी तो...

कवी कथाकार जयवंत जाधव: बालकविता - सोनीच्या स्वप्नात

कवी कथाकार जयवंत जाधव: बालकविता - सोनीच्या स्वप्नात: बालकविता सोनीच्या स्वप्नात सोनीनं पाहिलं एकदा भूताचं घर खालती छप्पर आणि जमीन वर भूताचे डोळे म्हणे होते ते मागे छान छान गोष्टी तो...

Saturday, August 15, 2020

कथा - सुटका



सुटका
गोंद्या आणि सकीचा कोयताही इतर ऊसतोडकऱ्यासारखाच ऊसावरून सपासप फिरत होता .शेंडा बुडका तोडताना सारखं वर खाली, वर खाली करून कंबर धरुन आली होती. त्यात नववा महिना लागलेल्या सकीला जास्तच त्रास होत होता . होणारा त्रास सकीच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता . गरोदरपणामुळं सकीच्या कामातील चपळाई थोडी मंदावली होती . पण सकीची ही कसर भरून काढण्यासाठी आणि इतर तोडकरी जोडप्याच्याआपण मागे राहू नये म्हणून गोंद्याची अगदीच कसरत चालू होती . तोडकऱ्यांची पोरं पोरी ऊसाची वाडी गोळा करुन त्यांच्या पेंङ्या बांधून गावात विकून आपापल्या आई बाबाना मदत करत हाती. तर बारकी पोरंही जवळच आपापले खेळाचे डाव मांडून खेळत होतीे.
       सुर्य डोईवर तळपत होता. सारे फडकरी घाई करताना दिसत होते. अर्ध्या एक तासातच फड संपणार होता. आता एका गाडीची बेजमीही होत आली होती. इतक्यात गोंद्याच्या खिशातील मोबाईलची रिंग वाजली. " च्यामायला, आता कामाच्या वक्ताला आणि कुणाचा फोन आलाय ? "गोंद्या स्वतःवरच त्रागा करत पुटपुटला. तोडीप थांबवत एका हातात कोयता धरला.दुसरा हात खिशात  घातला. मोबाईल काढला व ऑन करुन कानाला लावला. रखरखणारं ऊन तर मी म्हणत होतं.ऊनात गोंद्या घामानं पार भिजून गेला होता. हातातला कोयता बाजूला ठेवला. गळयात गुंडाळलेल्या टॉवेलनं घाम पुसतच जवळच्या मोळीवर बसला.
    " हां, हॅलो... "
  ऊनामुळं मोबाईलवरच नाव दिसत नात्यामुळे फोनवर कोण बोलतय याचा कानोसा घेत गोंद्या बोलला . फोन ऐकता ऐकता मात्र गोंद्याच्या त्रासलेल्या चेहऱ्यावर अचानक भितीचे भाव पसरु लागले होतेे. अणि बघता बघता गोंद्या ढसाढसा रडायलाच लागला.एकाएकी रडणाऱ्या गोंद्याकडं सकीच लक्ष गेलं. तिचं काळीज चराकलं . अचानक रडायला काय झालं ?? तिला काहीच कळेना. तिनं आपल्या हातातील कोयता तसाच मोळीवर टाकून गो्द्याकडं लगबगीनं आली. टॉवेलमध्ये तोंड खुपसुन  रडणाऱ्या गोंद्याचा खांदा एका हाताने हालवत विचारलं, '' अवं का म्हूण रडताय ? काय झालं रडायला ? "
" आपली शिरमी गेली ." गोंद्या आपल्या गदगदत्या आवाजात डबडबलेले डोळे पुसत बोलला. 
" गेली म्हंजी ? " काहीच न समजलेल्या सकीनं चकित मुद्रेनं विचारलं.
''जीव दिला माझ्या भनीनं.." गोंद्याला हुंदका आवरत नव्हता.
" पर का ? " सकीनं विचारलं.
" परशामुळं.रांडच्या परशाच्या जाचाला वैतागून थिमीटाच औसद खाल्ल म्हणं तिनं " परशाला मोठ्यानं शिव्या देत रडणाऱ्या गोंद्याकडं साऱ्यांचच लक्ष गेलं. जवळच्या तुकालाही नेमकं काय झालं कळलं नव्हतं.
" का रं गोंद्या, का रडतुयास ? "
" शिरमीनं जीव दिला. " डोळयातील आसवं पुसत गोंद्यानं  सांगितलं. तसं सगळेच भयचकित नजरेनं एकमेकांकडे पाहु लागले. त्यातल्या भिकाजीनच विचारलं , " आरं कशान रं ? "
" त्यो परशा भाड्या, शिरमीचा दाल्ला. त्येच्यामुळचं जीव दिला. काईमच जाच करायचा त्यो पैशापायी. गतसाली आर्दा यकर रान इकून पैसं दिलेलं.पर त्या भाड्याची हाव काय संपत नव्हती. सारखं पैसं आण पैसं आण म्हणून मारबडव करायचा. बिचारीनं कंटाळून जीव दिला असल. " डोळ्यात आसवं तराळलेली सकी उद्वेागानंच बोलली.सकीचं बोलनं ऐकून फडात एकदमच शांतता पसरली.
" गोंद्या,मग आता रं ?" शांतता भेदत भिकाजीनं विचारलं.
" आता आणि काय. आता मला निगाय पायजे " गोंद्या रडू आवरत आणि डोळे पुसत उठता उठताच बोलला.
"सकी आवर लवकर.कंची गाडी मिळती काय बगू. '' गोंद्या लगबगीनं बोलला तसं सकीनं पदरानच तोंड पुसत एक मोठा ऊसासा सोडला. आता या अवघडलेल्या अवस्थेत ओढातान करत गावाला जाणं खरं तर सकीच्या जीवावर आलं होतं. पण गेल्याशिवाय काय इलाजच नव्हता.
" आता या पोरींचं काय करायचं?" आपली मुलगी कमली व आक्की कडं लक्ष गेल्यावर सकीला प्रश्न पडला.
"सकी तुमी जा. पोरी आमच्या संगत ऱ्हातील. आमी बगतो त्यास्नी. इकडची काय काळजी करू नगा." पारीकाकीच्या बोलण्यानं सकीला थोडं बरं वाटलं . या अवघडलेल्या अवस्थेत पोरींचं हे लटांबर आणखी सोबत घेऊन जायच सकिच्या खरचं जीवावर आलं होत.
" व्हय काकी, पोरींवर जरा ध्यान ठीव. त्यांचं ते करून खातील पर झोपायला तुमच्या जवळच घ्या. रात्रीचं घाबरत्यात ती." 
सकी कोयता, टॉवेल घेता घेता बोलली. आपले आई बा आपल्याला सोडून जायलेत हे ऐकून कमली अाणि आक्की कावऱ्याबावऱ्या झाल्या.सकीनं कमली आणि आक्कीच्या गालावरून हात फिरवला . त्यांची समजूत घालून गोंध्या आणि सकी घाईनच निघाले.
गोंद्या आणि सकीला दोन पोरीच होत्या. थोरली कमली आणि धाकटी आक्की .आक्कीनंतर सात वर्सान सकी पुन्हा गरोदर होती. गोंध्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. दोन एकर जमीन  असली तरी ती बिनभरवशाची. पाऊस पडला तर पिक नाहीतर तणसुदधा उगवायचं मुश्किल. पोटासाठी मग असं परमुलुखात येऊन कष्ट उपसावं लागायचं.  गोंद्याही राबणारा होता. मनानं हळवा, भावूक होता. व्यसन म्हणावं तर आहे आणि म्हणावं तर नाही असच होतं. कारण वर्षातनं कधीतरीच एक दोन वेळा प्यायचा. पण प्यायला तर मात्र तो माणसात नसायचा. आपण काय करतोय याचं त्याला भान नसायचं.एरवी मात्र देवमाणूस. गोंद्याचे वडील गोंद्या लहान असतानाच जग सोडून गेलेले. घरात आई आणि एकूलती एक बहीण शिरमी. शिरमिला जवळच्याच एका तांड्यात दिलं होतं. पण बिचारीच्या संसारात काही सुख म्हणून काय नव्हतं. सासरच्या जाचानं घाण्यातल्या ऊसगत पिळून गेली होती. अंगाचं तर चिप्पाडं झालं होतं. हुंड्यासाठी परशाकडून बिचारीला नेहमीच मारबडव व्हायची. गोंदयानंही आपल्या बहिणीच नांदणं सुरळीत व्हावं म्हणून अर्धा एकर जमीन विकून पैसेही दिले होते. पण एवढयाने त्यांची भूक भागत नव्हती. बिचारी शिरमी आपल्या भावाला आणि घरच्याना त्रास नको म्हणून पाहिल्यासारखं आता काय सांगायचंही सोडून दिलं होतं. फोनबीन करायचही ती टाळत होती. पण आईचं काळीज गप्प बसत नव्हतं. आईच कधीमधी आपणहुनचं आपल्या लेकीला फोन लावायची. फोनवर बोलणारी शिरमी मात्र गळ्यात दाटून येणारा हुंदका गळ्यातच दाबून उसण्या अवसानानं चांगलं हाय म्हणायची. कंठ दाटून आला की फोन  कट करायची .पण आई तिच्या बोलण्यावरनच लेकीचं दुःख ओळखायची. लेकीसाठी कालवाकालव व्हायची.डोळ्यात आसवं तरळायची. लेकीच्या नशीबावर स्वतःच त्रागा करून घ्यायची. म्हणायची,
 '' माझ्या लेकीचं रोजचच मरण हाय.आसं रोज रोज मरण्यापरिस जल्मली तवाच कायबाय होऊन मेली असती नायतर मीच जीव घेतला असता तर बरं झालं असतं. या जल्माच्या जाचातनं तरी सुटका झाली असती. देवानं बाईचा जल्म कशाला घातलाय कुणास ठावं. "
  गोंध्या आईचा उद्वेग ऐकून अस्वस्थ व्हायचा. सकीच्या आईचही खरचं होतं. रोजचा होणारा त्रास शिरमी सहन करत होती. नेहमीसारखच आजही पुन्हा सकासकाळीच परशानं शिरमिला मारबडव करायला सुरवात केली होती.
 " म्हायेरास जा अाणि तुझ्या भावाकडनं घर बांधाय पैसं आण. घर बांधाय पैसं कमी पडल्याती. " परशा चढ्या आवाजात शिरमीवर डाफरत होता .
    "व्हय , राबराब राबणाऱ्या माझ्या भावाकडनं फुकट पैसं आणतो आणि तुमी आयतं बसुन खावा. हिम्मत न्हाई तर भिक मागून कशाला घरं बांधताय. पडू दे की तुमचं घर तसच. काय झालं तरी मी पैसं मागायची न्हायी. " 
शिरमी आज इरेस पेटली होती.आज ती कुणाचीच भिड ठेवत नव्हती.आपल्या माहेरच्या माणसांना काय पण बोललेलं तिला अजिबात खपत नव्हतं. आज तर ती खुपच संतापली होती. उलट बोलणाऱ्या शिरमीचा परशालाही खुपच राग आला होता. रागाच्या भरात त्यानं शिरमीच्या झिंज्या ओढतच बाहेरच्या खोलीत आणलं होतं. शिरमीची ही सहनशीलता आता संपली होती. तिनं मनाचा हिय्या करून आपले केस हिसडा मारून सोडवून घेतले आणि पळत जाऊन वरच्या फळीवर ठेवलेली थिमिटाची पावडरची पिशवी घेतली. त्यातली पुड मूठभरून घेतली आणि काही कळायच्या आत तिनं आपल्या तोंडात भसकन कोंबली. अचानक व अनपेक्षित घडलेल्या या घटनेनं परशाचे धाबे दणाणले .परशा धावत येऊन तोंडातली पावडर बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. पण शिरामिनं तोंडच उघडलं नाही . बघता बघता शिरमीचे डोळे पांढरे झाले. जालीम औषध रक्तात कवाच भिनलं होतंं. सकीचं अंग आता थंड पडू लागलं होतं.दवाखान्याला घेऊन जाण्याची उसंतही शिरमीनं परशाला दिली नव्हती. शिरमीन जाचातून स्वतःच आपली कायमचीच  सुटका करून घेतली होती.
           शिरमीन जग सोडून जाणं गोंद्यानं मनाला चांगलच लावून घेतलं होतं. शिरमीच्या आठवणीनं सैरभैर, अस्वस्थ होत होता. डोळयातलं पाणी थांबत नव्हतं. गेले तीन चार दिवस पोस्टमार्टम, पोलिस चौकशी, मूठमाती देणे या धावपळीतत केंव्हाच संपून गेले होते.
     सकीलाही तीन चार दिवस आपल्यापासुन दुर असलेल्या आपल्या मुलींची आठवण येत होती.सकीच्या मनात परत कामावर जावसं वाटलं. तसं ती गोंद्याला कचरतच म्हणाली, " अवं, तिकडं पोरी एकट्याच हाईत. कधी जायचं ? "
गोंद्यालाही मुकादमाचा सकाळीच फोन आला होता. निदान पोरींसाठी तरी कामावर जाणं भागच होतं.
       गावावरून फडावर परत आलेल्या गोंद्याचं मन मात्र पाहिल्यासारखं  कामावरं लागत नव्हतं. शिरमीनं भोगलेल्या त्रासाच्या,दुःखाच्या आठवणीन मन  कासावीस होत होतं, गहिवरून येत होतं. सकीलाही येण्याजाण्याच्या लांबच्या प्रवासाची दगदग सहन झाली नव्हती.आज गावावरून आल्यापासुन ती कामावर गेलीच नव्हती. पोटात दुखत होतं म्हणून ती पालातच पडून होती. पोटात कळा वाढायला लागल्या तसं तिनं आक्कीला बोलावलं,
"आक्की जरा फडाकडं पळत जा. आणि तुज्या बाला आणि पारीकाकीला बोलावून आण. पोटात दुखाय लागलंय म्हणावं." 
 घाबरलेली आक्की धावतच गेली. निरोप ऐकून दोघंही लगबगीन यायला निघाले.पारीकाकी आणि गोंद्याला पाला जवळ येईल तसं लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तसं दोघानी एकमेकाकडं संशयान पाहिलं. ते पाला जवळ येताच त्यांचा संशय अगदी खराच ठरला. ही दोघं यायच्या अगोदरच सकी बाळंत झाली होती.पाला जवळ येताच पारीकाकी लगबगीनं पुढं झाली. पालात शिरली आणि पारीचं एक जूणं  लुगडं समोरच्या उघड्या बाजूला आडोसा करून बांधलं. गोंद्या बाहेरच घुटमळला. थोडया वेळानं पारीकाकीनं आवाज दिला , 
" आरं गोंदया, जरा जाळ कर आणि चुलीवं पाणी ठीव तापवायला. "
" व्हयं व्हय. ठेवतो " म्हणत गोंद्या लगबगीनं चुलीकडं गेला. जाता जाता -
"पारी काकी...सकी आणि लेकरू बरं हाईत न्हवं ?"  गोंद्यानं न राहून विचारलं.
" आरं बाबा, बरी हाईत. तू पाणी ठीव .मी बगते बाकीचं. " सगळी आवराआवर करता करता पारीकाकी आतूनच बोलली. तसं गोंद्यानं जवळच पडलेल्या काटक्या मोडल्या आणि दगड लावलेल्या चुलीत कोंबल्या. काटक्याजवळच ठेवलेल्या रॉकेलच्या बाटलीचं बुच काढून बाटलीच्या तोंडावरच एक कापडाचा बोळा भिजवला व चुलीत काटक्याखाली सारला. आणि आगकाडी पेटवता पेटवताच पारीकाकीला उत्सुकतेनं विचारलं,
" काकी, काय झालंय. पोरगा का पोरगी? "
" काय रं बाबा, आणिबी पोरगीच झाली नव्हं.. "
पारी काकी कन्हतच बोलली. पारीकाकीचं उत्तर ऐकून गोंद्या एकदम गप्पच झाला. हातातली काडी काही पेटत नव्हती. नाराज झालेल्या गोंद्या रागान जोरातच काडी पेटवू लागला पण काडी पेट घेत नव्हती. गोंद्यानं पुन्हा नव्यान दुसरी काडी घेतली.गोंद्या काहीच बोलत नाही तवा तो नाराज झाला असल असं समजून पारीकाकी समजूतीच्या सुरात म्हणाली, 
" आरं गोंद्या ,काय वाईट वाटून घेऊ नगस. पोटाला पुन्यांदा तुजी भैन शिरमीच जलमलीया समज. "
पेटवलेली काडी चुलीत टाकताच चूल भडकन भडाकली. ' पुन्यांदा शिरमी ' म्हणताच गोंद्याच डोकंही चुलीसारखच भडकन भडकलं होतं. पुन्हा पोरगी झाल्यानं आधीच डोकं तापलेलं त्यात ' पुन्हा शिरमी ' म्हणताच त्याचं डोकचं सणकलं. 'पुन्हा शिरमी ' म्हणजे पुन्हा शिरमी सारखेच भोग तिच्या वाट्याला येणार. ' या विचारानं तो अस्वस्थ झाला. पुन्हा शिरमी सारखे भोग हिच्याबी वाट्याला नको. इतकेच नव्हे तर पोरगीच नको.' गोंद्याच्या डोक्यात नको त्या विचारानी घर केलं. गोंद्या अविचाराच्या गर्तेत सापडला होता. चुलीतला जाळ पेटतच होता. चुलीवर पाण्याचं भूगूनं ठेवायचं भानही त्याला राहिलं नव्हतं.
" गोंद्या ठेवलास काय पाणी तापवाय? "
पारीकाकीच्या हाकेनं गोंद्या भानावर आला.
        गेले दोन दिवस गोदया खुपच तणावात होता. मन बेचैन, सैरभैर झालेलं. गोंद्याच्या अस्वस्थ मनान मात्र दारुला जवळ केलं होतं. गेले दोन दिवस गोंद्या पिऊन तर्रर्र होता.
    आजही गोंद्या भरदुपारीच पिऊन झेपडतच पालाकडं येत होता. सारे फडकरी दुपारच्या विश्रांतीनंतर पुन्हा कामावर जात होते . त्यात त्या सर्वांच्याबरोबर फडावर तोडपीला निघालेल्या जाणत्या  विठूनं वाटेत आडवं येत विचारलं , " काय रं गोंद्या, आजबी तोडपीला येत न्हाईस व्हयं रं. आरं लई खाडं झाल्याती. मुकादम वरडत व्हता सकाळी. अशानं पैसं कसं फेडणार त्यो? असं म्हणत व्हता. "
"आरं इतकं कशाला टेंशन घ्यायचं बाबा. कुणाला काय पोरी होत न्हाईत व्हयं? आरं डोक्यातलं खुळ काढ. पिणं बंद कर आणि ये उद्यापास्न कामावर ." 
   गोंद्या मात्र काहीच न ऐकल्या सारखं करुन न बोलता झेपडतच पुढं निघूनही गेला होता . तसाच येऊन तो पाला जवळच्याच दगडावर झिंगत बसला होता . गोंद्या आजबी पिऊन आलाय म्हणून सकीची संतापानं कायबाय तणतण चालूच होती. गोंद्या मात्र डोळ्यांची झापडं ताणत झिंगत शांत  बसला होता. पण डोक्यात मात्र विचारांचं चक्र गरगर फिरतच होतं.
  गोंद्यानं झिंगतच सभोवार नजर फिरवली.आसपास कुणीच नव्ह तं. सारी पालं रिकामीच होती . सारीच फडावर गेली होती. नाही म्हणायला दुरवर कमली आणि आक्की खेळत होत्या तेवढंच.पालात बाळाचं रडनं आणि सकीचा गोंध्याच्या नावानं शिमगा चालूच होता. बराच वेळ रडणाऱ्या बाळाला खाली ठेवत सकी बाळानं ओले केलेले कपडे वाळत घालण्यासाठी बाहेर आली. बाळानं घाण केलेले कपडे धूवून टाकण्यासाठी घागरीतलं पाणी बादलीत ओतलं. तिकडं सकी बाहेर आलेली पाहून गोंद्या हळूच पालात शिरला. आज पहिल्यांदाच गोंद्यानं बाळाला पाहिलं होतं.पारीकाकीनं म्हटल्यासारखं त्याला त्या बाळात खरचं शिरमीच दिसत होती. बाळाला बघता बघता शिरमीचं बालपण, तिचं खेळणं, बागडणं आणि तिच्या लग्नानंतर तिचे झालेले हाल, सासरचा जाच सगळं डोळ्यापुढून सरसर सरकत होतं. शिरमीच्या आठवणीनं आई नेहमी त्राग्यानं बोलत असलेले बोल पुन्हा पुन्हा कानावर आदळू लागले
' माझी लेक तवाच काय बाय होऊन मेली असती तर या रोजच्या मरणातन सुटका तरी झाली असती.' 
नशेतल्या गोंद्याच्या मनात नको त्या विचारनं थैमान घालायला सुरवात केली होती. त्याच्या मनात सारखं येत होतं, ' व्हय, आईचच खरं. पोरगीचा जन्मच वाईट. या पोरीच्याबी जन्मात शिरमी सारखे भोग वाटेला नको. आधीच पदरात दोन पोरी.आता हिला आणि कुठला हुंडा आणायचा ?हिलाबी हुंड्यासाठी मारबडव नको. त्यापेक्षा आताच हिची या जन्मातनं सुटका केलेली बरी.'
नशेत असलेल्या गोंद्याला आपण काय करायला चाललोय याचं भानच उरलं नव्हतं. आपल्याला मुलगी झाली म्हणून की शिरमी सारखे भोग नको म्हणून आपण कोवळ्या जीवाला संपवायला चाललोय हे त्याचत्यालाच  कळत नव्हतं. पण गोंद्या मात्र मनात चमकून गेलेल्या निर्णयावर ठाम होता. पिणाऱ्याच्या अंगात राक्षस शिरतोय म्हणतात ते काही खोटं नव्हतं. गोंद्याच्या अंगातही असाच अविचारांचा राक्षस संचारला होता.
नशेतला गोंद्या झिंगत झिंगतच पुढं झाला. एकवार आपले डोळे घट्ट मिटले. एक लांब उसासा सोडला आणि आपला उजवा हात रडणाऱ्या बाळाच्या नाकातोंडावर घट्ट दाबून धरला. तान्हुलं कोवळं बाळ गुदमरलं. तिकडं बाहेर गेलेल्या सकीला बाळाचा आवाज एकाएकी गुदमरुन बंद झाल्यासारखा वाटला. घाबरी घुबरी होऊन हातातलं कापड तिथच टाकून सकी धावतच आली. समोरचं दृष्य पाहुन तर तिला धक्काच बसला. गोंद्यान बाळाचं नाकतोंड घट्ट दाबून धरलं होतं. ती वीजेच्या चपळाईनं  पुढं झाली. आणि आपल्या दोन्ही हातांनी गोंद्याला जोरात ढकललं. सकीच्या धक्क्यानं गोंद्या लांब जाऊन पडला. सकीनं  बाळाला पटकन वर उचललं. पाहते तर बाळाचा श्वास बंद पडलेला. तिनं जोरात हंबरडा फोडला.सकीच्या जोरात रडण्यानं गोंद्या भानावर आला. नशेत आपण काय केलय हे त्याच्या लक्षात आलं. पडलेल्या जागीच तो लगबगीनं उठून बसला. बसल्या जागीच त्याला दरदरुन घाम सुटला. अंगाला कापरा सुटला.सकी ऊर बडवून घेऊन रडू लागली. तसं नशा उतरलेला गोंद्या चटकन वर उठला. घडून गेलेल्या घटनेचे परिणाम त्याच्या डोळ्यासमोर दिसु लागले .तो जागेवरून चपळाईनं उठला व धायमोकलून रडणाऱ्या सकीचं मानगुट एका हातान पकडलं आणि दुसऱ्या हातानं सकीचं तोंड ताकदीनिशी दाबून धरलं.सकीचा आवाज तोंडातच बंद झाला पण तिची सोडवून घ्यायची धडपड थांबली नव्हती.गोविंदाच्या ताकदी पुढं मात्र तिचं काहीच चालत नव्हतं. उगाच बोभाटा नको म्हणून तोंड दाबून धरलेला गोंद्या आता चांगलाच शुद्धीवर आला होता. बराच वेळ प्रयत्न करूनही आपली सूटका होत नाही हे पाहुन सकी हताश झाली होती. सकीचा प्रतिकार हळूहळू कमी होत गेला. गोंद्याही बराच वेळ तसाच  होता.सकीचा जोर एकदमच कमी होत गेला. तसं डोळ्यात पाणी आणून गोंद्या स्वतःच ढसाढसा रडू लागला. त्याचा सकीच्या तोंडावर दाबून ठेवलेला हातही हळूहळू सैल झाला होता. पश्चातापाचे अश्रु गोंद्याच्या डोळ्यांतून घळाघळा वाहु लागले होते.
" सकी मला माप कर. नशेत नको ते खुळ माझ्या डोक्यात शिरलं होतं बघ. जे व्हायला नको हुतं ते झालं. खरं हिच्याबी नशीबात शिरमी सारखे भोग नको म्हणून माझ्या हातनं हे पाप घडलं." गोंद्याची पकड आता पूर्ण ढीली पडली होती. सकीचं अजूनही ढसाढसा रडणं चालूच होतं. गोंद्या काय बोलतोय याकडं तिचं लक्षच नव्हतं. तिचं सारं लक्ष बाळावरच खिळलं होतं. रडताना डोळ्यातून ओरंघळणारे अश्रु बाळाच्या अंगावर पडत होते. आणि एकाएकी सकीच्या उबदार अश्रूंनी की आणखी कशानं माहित नाही पण बाळाची दचकल्यासारखी हालचाल सकीला जाणवली. सकी चमकली.सकीनं बाळाला एकदा जोरात हलवलं. हलकीशी चापट मारली. चापट मारताच बाळानं अचानक टाहो फोडला. श्वास कोंडलेल्या बाळाचा श्वास पुन्हा सुरु झाला होता.
      सकी आणि गोंद्याच्या जीवात जीव आला.सकी बाळाचे अधाशासारखे मटामटा मुके घेऊ लागली. कुणाच्या नशिबी काय वाढून लिहून ठेवलय त्या विधात्यालाही माहित नसताना गोंद्या मात्र या गोंडस नवजात बाळाची या जन्मतूनच सुटका करायला निघालेला. अघोरी जाचातून बाळाची सुटका करू पाहणाऱ्या गोंद्याचीच नियतीने या दुष्कर्मातून सुटका केली होती.

कथाकार - 
जयवंत जाधव,कोवाड
ता.चंदगड जि. कोल्हापूर.
        मोबाईल  9403463881

कविता - मोबाईलचं याड


आला नवा जमाना, आले नवे फॅड
सोनू सोनीला लागलं मोबाईलचं याड ॥धृ॥

वाचन गेले लेखन गेले
अभ्यास झाला डिलिट
रोज एक एक नवीन ॲप
त्यानं डोकं झालंय मॅड
सोनू सोनीला लागलं मोबाईलचं याड    ॥१॥

खेळ नाही अभ्यास नाही
रोज नवा मोबाईलचा गेम
बसुन एकाच जागेवर दोघे
झाले डेऱ्यासारखे जाड
सोनू सोनीला लागलं मोबाईलचं याड ॥२॥

हसणे बंद, बोलणे बंद
मैत्रीही विसरली सारी
पूर्वीचे सारे संस्कार जाऊन
चांगली मुले बनली बॅड
सोनू सोनीला लागलं मोबाईलचं याड ॥३॥

मम्मी पप्पांच ऐकून एकदा
जेंव्हा सोडला मोबाईलचा नाद
मित्र, नातलग आनंदासह सारे
झाले पुन्हा कुटुंबात ॲड
सोनूसोनीच गेलं आता मोबाईलचं याड   ॥४॥

बालकविता - उलट सुलट

बालकविता

उलथापालथ

सोनीच्या स्वप्नात म्हणे
एक अशी किमया झाली
समुद्राचे पाणी आकाशी
आले निळे आकाश खाली

वाघ सिंह खाती गवत नि
शिकार हरणाच्या खाण्यात
मासे फिरतात जंगलात नि
पक्षी राहू लागले पाण्यात

कोंबडी बांग देऊ लागली
कोंबडा घालू लागला अंडी
माणसं सारी उघडी नागडी 
प्राणी घालती विजार बंडी

साखर गुळ झाले कडू
कारल्याला आली गोडी
पिण्यासाठी पेट्रोल रॉकेल
पाण्याने चालते गाडी

मुले बसती खुर्चीवर
मॅडम बसतात खाली
स्वप्न पाहता सोनीच्या
गालावर आली लाली


        जयवंत जाधव, कोवाड
         मोबा. _9403463881

कविता - महा'भारत'


महाभारत

होय इथे महाभारत घडते आहे ॥

कुणा नकोय मुलगी आता
कोण होताच कुमारी माता
'कर्ण अर्भक ' कुंतीचे 'त्या '
कचरा  कुंडीत अजूनही 'रडते ' आहे
होय इथे महाभारत घडते आहे ॥

डोनेशनवाले ते द्रोणाचार्य
श्रीमंतासाठीच शिक्षण कार्य
एकलव्य  नि कर्णाचे  शौर्य
संधीअभावी अजून 'सडते' आहे
होय इथे महाभारत घडते आहे ॥

टपले दुःशासन पदोपदी
कित्येकीची तर होतेय द्रौपदी
भिष्म, धृतराष्ट्र उबवती गादी
इथे सत्तेची नशा अजून 'चढते' आहे
होय इथे महाभारत घडते आहे ॥

सत्तेसाठी भाऊ भांडले
कृष्णकुटील डाव मांडले
हिरावले  ' कवच  कुंडले '
त्या सुतपुत्रांचे चाक भूमीतच 'रुतते'आहे
होय इथे महाभारत घडते आहे ॥

कुठे काळा  कुठे गोरा वर्ण
कुठे दलित आणि कुठे सवर्ण
समोरासमोर  सर्वच  धर्म
कार्यात अजूनही जात 'नडते' आहे
होय इथे महाभारत घडते आहे
होय इथे महाभारत घडते आहे ॥


जयवंत जाधव , कोवाड
ता. चंदगड जि.कोल्हापूर
मोबाईल 9403463881

Thursday, August 13, 2020

वात्रटिका मार्मिक ठोसे २५७ ते २६२

मार्मिक ठोसे

(वात्रटिका)

२५७
कवडीला मोल नाही तर
कवडी वर बोलणेही व्यर्थ आहे.
उगाच बोलणं असणार नाही
नक्कीच काही तरी अर्थ आहे
२५८
रामा वरून महाभारत घडतेय
सारथी उद्धवा विरुद्ध पार्थ  आहे . !
पितामह बोलतात ते सत्यच असते
'संजय'च्या बोलण्यातही स्वार्थ आहे .

२५९
मामा कडचे बोलले म्हणे
भांज्या खुप 'फायटर' आहे .
पसरलेल्या पेट्रोल मध्येच त्यांनी
हळूच पेटवलं 'लायटर' आहे .

२६०
काकांच्या गळ्यातील ताईत 
पवार हि'रो हिट' आहे.
नेहमी 'अ जीत' पावरबाजचा पुत्र
अजूनही अनफिट आहे.

२६१
काकांना न ओळखण्या इतपत
पुतणे का इतके खुळे आहेत ?
खायला मदत दा(दा)तांची पाहिजे
पण सु प्रिय मात्र 'सुळे' आहेत .

२६२
रामा साठी उद्धवशी वैरत्व
खरंच का पार्थ भोळा आहे (?)
भाऊबंदकीच्या कलहाकडे मात्र
बिलंदर देव इंद्राचा डोळा आहे .

     © जयवंत जाधव, कोवाड
     ता.चंदगड जि कोल्हापूर
     मो 9403463881

Tuesday, August 11, 2020

बालकविता - सोनूचं दप्तर

बालकविता - सोनूचं दप्तर

सोनूचं दप्तर
दप्तरात पुस्तक
पुस्तकात चित्र
चित्रात जंगल
जंगलात गूहा
गूहेत वाघ
वाघोबाला असतो
भलताच राग

सोनूचं दप्तर
दप्तरात पुस्तक पुस्तकात चित्रं
चित्रांत गाव
गावात घर
घरात मांजर
मांजर दाखवतो
पिंजरून दात
वाघ मांजराची
एकच जात
हा ... हा..  हा..,

जयवंत जाधव, कोवाड
मोबा. 9403463881

Monday, August 10, 2020

कथा - थाट

: कथा
.
.
थाट
.
.

          निदान हे दहावीच वर्ष तरी पूर्ण कर. मी शाळेच काय झालं असेल ते नुकसान देतो. मास्तरांस्नी सांगतो खरं शाळेला जा." देवाप्पाच्या समजावणीचा किसन वर काहीच परिणाम होत नव्हता.
    " मला या शाळेला जायचं नाही म्हणजे नाही.''
     " आरं या शाळेला जायचं न्हायी तर मग दुसरीकडं जा. तिथं दाखला घालूया. खरं शाळेला न्हाई म्हणू नकोस. " देवाप्पा मायेन समजावण्याचा प्रयत्न करत होता.
      "नकोच.मी तुझ्याबरोबर शेताकडं येतो. ढोरं राखतो.  खरं आता मला शाळाच नको." किसनही हट्टाला पेटला होता.
      किसन देवाप्पाचा मुलगा. मुलीच्या पाठीवरचा एकुलता एक म्हणून घरातल्यांचा लाडका. किसननं शाळा सोडली आणि कामधंदा सोडून गावातल्या उनाड पोरां बरोबर बाहेरच हुंदडायला सुरवात केली होती.शाळाही नाही आणि घरातलंही काम नाही.किसनच्या असल्या वागण्यामुळं मात्र देवाप्पाला खुपच काळजी लागून राहिली होती.  'थोडी शाळा शिकला असता म्हणजे बरं झालं असतं.' देवाप्पाच्या डोक्यात सदानकदा किसनचाच विचार.  
       गेला महिनाभर देवाप्पाच कशातच मन लागत नव्हतं. सध्या शेतीचीही काही कामं नव्हती. कधी तरी शेताकडं एक फेरी मारली न मारली असंच.सकाळचं चार म्हशींच दुध काढून डेअरीला घालून दोन गवताचे भारे आणले की झालं. मग दिवसभर वेशीवर वडाखालच्या पारावर बसुन गप्पा मारायला रिकामा.
     वेशीवरचा पार नेहमी दोन चार म्हाताऱ्या माणसांबरोबरच इतर गप्पा मारत बसणाऱ्या, रिकामटेकडया  लोकांनी भरलेला असायचा. सध्या देवाप्पाही जवळ जवळ रोज असायचा. पण आज देवाप्पा एकटाच बसला होता.  संध्याकाळचे सहा वाजून गेले होते.सुर्य मावळतीला झुकला होता. लोकांची वर्दळही थोडी कमी झाली होती. बराच वेळ देवाप्पा शुन्यात नजर लावून तसाच बसला होता. धुरळा उडवत आणि खाडखाड आवाज करत सहाची एसटी नुकतीच आली होती. त्याच गाडीतून उतरुन घराकडे चाललेल्या  रामभाऊला पारावर बसलेला आणि विचारात गढलेला देवाप्पा दिसला. रामभाऊंनं जाता जाता देवाप्पाला हाक मारली.
   "देवाप्पा,असं रे का गप्प गप्प बसलाईस?"
    " आं? काय? '' तंद्री तुटलेला देवाप्पा काचबारुन बोलला.
    "एवढया कसल्या तंद्रीत हैस रे ?" रामभाऊ देवाप्पाकडं बघत हलकंस हसतच विचारलं. रामभाऊच्या प्रश्नानं देवापा भानावर आला. पाय लांब सोडून ऐसपैस बसलेल्या देवाप्पानं एक लांब उसासा सोडला. आपले दोन्ही पाय खाली सोडले आणि कट्टयावरच पुढं सरकून बसला. जांभई देतच आपला उजवा हात आपल्या काळ्यापांढऱ्या बारीक केसाच्या डोक्यावरनं फिरवला. तोच हात शर्टाच्या वरच्या खिशात घातला. खिशातली चुना आणि तंबाखुची पुडी काढली.आपल्या जाड भूवया वर ताणून कपाळावर आठ्या आणल्या आणि परवल्यासारख बोलला,
       " काय सांगू बाबा, पोरानं तर डोकं खाल्लय नुस्त.. कुणाचं एक ऐकना झालंय !"
     " अरे, पोरांची जातच ती.एकदा सांगून ऐकतील ती पोरं कसली? तेंच आणि कशा एवढं मनावर घ्यायलाईस. '' रामभाऊ हातातली बाजार भरलेली पिशवी सावरत म्हणाला.
    " काय बाकीची पोरं न्हाईत काय? काय हे एकटच हाय." देवाप्पा वैतागल्या सुरात बोलला.
     " ते व्हय खरं, एवढं झालं तरी काय  त्याच्यावर वैतागण्यासारखं?"
     " आरं ते शाळेलाच जाईना न्हवं." डबीतला तंबाखु डाव्या हातावर ओतत देवाप्पा म्हणाला.
     " का? जाईल की.. "
     " काय जातंय.डोकं आपटून घेऊन सांगितलं तरी ते काय ऐकना.गावातल्या उंडग्या पोरांतंन फिराय सवाकलय. आता तेला शाळेत कुठली गोडी वाटल. ते शाळेस जाईल असं मला तरी काय वाटत नायी बा." हाताच्या उजव्या अंगठयाच्या नखानं टोकरुन घेतलेला डबीतला चुना  हातातल्या तंबाखुला लावता लावता देवाप्पा  नाराजीच्या सुरात बोलला. 
   " तरी बी समजाऊन सांगूया घे आणि एकदा.. " हातातली पिशवी कट्टयावर ठेऊन देवाप्पानं ठेवलेल्या डबीतला तंबाखु चूना घेत रामभाऊ म्हणाला.
     " तरीबी आत्त ते काय ऐकील असं काय मला वाटत न्हायी.तवा मी काय म्हणतो..." देवाप्पा तोंडात तंबाखु कोंबत जरा संकोचूनच बोलला, " रामू तू गोव्याला शाळा शिकलाईस. बरंच दिवस तिथं ऱ्हायलाईस तवा तुझ्या तिथ वळखी असतीलच की. कुणाची वळखबिळख असेल तर त्या वळखीनं किसनला कुठंतरी कामाबिमाला चिकटीवतस काय बघ.आरं,शाळा न्हाई ते न्हाई. निदान कामधंदा तरी शिकल. "
    " आरं शाळा नायतर मग काम तरी कसलं मिळणार तेला? '' मळलेला तंबाखू तोंडात टाकून उरलेल्या तंबाखुचा हात झटकत रामभाऊ म्हणाला.
    " कुठं तरी दुकानात नायतर  हॉटेलातबिटेलात बघ कुठल्या तरी. तेला आता काय सरकारी नोकरी मिळणार हाय?" देवाप्पा कावून गेल्यासारखं म्हणाला.
    " आरं कामाचं काय लावलाईस. माप कामं हाईत. माझा एक मित्र हाय तिथं  .माझ्या वर्गातलाच हाय. त्येंच मोठं हॉटेल हाय. हॉटेलात  काम मिळल खरं तुझं पोरगं करतंय  काय ते आधी बघाय पायजे."
    " न कराय काय झालंय. तू ये संध्याकाळी जरा आमच्या घराकडं.जरा तूच समजाऊन सांग. बघू तुझं तरी ऐकतय काय ते ."
     " बर, येतोघे नंतर.बघूया कसं ऐकत न्हाई ते." रामभाऊ कट्टयावर ठेवलेली बाजारची पिशवी हातात घेत जाता जाता म्हणाला,
     "बर घराकडे येणार काय इथंच बसणार ?" 
     " व्हय येणार तर. इथं बसुन आणि काय करू? मी बी आत्त घराकडच  चाल्लोतो. दुधाचा येळ झालाय. दुधबी काढाय पायजेच की.''  म्हणत देवाप्पानं पारावरची तंबाखुची डबी खिशात ठेवली आणि रामभाऊबरोबर गप्पा मारत घराकडं निघाला.
      आकाश टिपूर चांदण्यानं भरुन गेलं होतं.चंद्राच्या शुभ्र उजेडात रात्र अगदी दिवसासारखी भासत होती.गावच्या बाहेर रानात घर असलेला रामभाऊ या  पडलेल्या टिपूर उजेडातून  देवाप्पाकडं निघाला होता. देवाप्पाला बोलल्यासारखं आपलं जेवण आटपून रामभाऊ नऊलाच देवाप्पाच्या घरी आला होता..देवाप्पाच्या घरात आताच जेवण चाललं होतं.रामभाऊनं बाहेरुनच देवाप्पाला हाक मारली. हाक ऐकून देवाप्पानं रामभाऊलाच घरात बोलावलं, "रामू ये की. जरा जेव ये."
     "जेव जेव, मी आताच जेऊन आलोय. तू जेवस्तवर मी बसतो बाहेर कट्टयावर. तपकिर लावत.''     खिशातली तपकिरीची डब्बी काढत रामभाऊ म्हणाला.
    '' मग बस बस तर.जेऊन येतोच पाच मिनटात." 
    "ये शिस्तात. काय गडबड न्हायी." डबी खोलत रामभाऊ कट्टयावर बसला.डबीतली तपकिर हातावर ओतून घेतली आणि तपकिर लावत बसला.
      रामभाऊ आणि देवाप्पा अगदी जिवलग मित्र.देवाप्पाचं कुटुंबही अगदी छोटं,चौकोनी आणि बऱ्यापैकी खाऊनपिऊन सुखी होतं .बायको अनुसया, मुलगा किसन आणि मुलगी सरिता.पोटापुरती शेती.शेतीला जोडधंदा म्हणून चार दुधाच्या म्हशी होत्या. सगळं बरं चाललेलं पण 'पोरगं थोडं शिकलं असतं तर बरं झालं असतं' एवढी एकच चुटपुट देवाप्पाच्या मनाला लागली होती. 
    देवाप्पाचं जेवण होईपर्यंत रामभाऊचीही तपकिर लावून संपली होती. देवाप्पा जेऊन बाहेर येताच त्याच्याकडून थोडं पाणी मागून घेतलं. तांब्यातल्या पाण्यानं खळाळा चूळ भरली. उरलेलं पाणी तपकिर घेतलेल्या हातावर ओतून घेतलं. रिकामी तांब्या देवाप्पाकडं दिला. आपल्या खिशातला हातरुमाल काढला. हात,तोंड पुसलं आणि आत येऊन खुर्चीवर बसला. इतक्यात किसनही जेवण आवरुन बाहेर मित्रांकडं जाण्यासाठी बाहेर जात होता. तोच रामभाऊनं किसनला हाक मारली.
     " अरे ए किसना. अरे तुझ्याकडच काम हाय म्हणून आलोय आणि तू कुठं चाललाईस?" 
किसना बाहेर जाता जाता उंबऱ्यावरच थबकला.
        " मग सध्या काय चाललंय तुझं?" रामभाऊनं खोचक स्वरात विचारलं.
      " काही नाही बाहेर मित्रांकडं चाल्लोय." 
       " आरं आत्ताचं नाही विचारत. तुझ्या शाळेबद्दल विचारतोय." रामभाऊनं सरळ मुद्द्यालाच हात घातला.
      शाळेचं नाव काढताच किसन थोडं गडबडला. काहीच न बोलता भूवया ताणत कपाळावर आठ्या आणून  उंबऱ्यावरच अडखळल्यासारखा थांबला.
     रामभाऊचं  बोलणं ऐकून अनुसया जेवणांची ताटं आवरत आतूनच बोलली.
    " बघा जरा तुम्ही तरी सांगून. काय ऐकतंय काय. शाळा सोडून काय करणार हाय कुणास ठाऊक... "
      "हे बघ आत्त झालं ते झालं. आम्ही शाळेत काय सांगायचं ते सांगतो. तू तेची काळजी करु नको. उद्यापास्न तू शाळंला जा."  रामभाऊ किसनला शाळेला जाण्यासाठी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता.
      " अं हं. मी काय शाळेला न्हाई जात आता.'' रामभाऊशी नजर न भिडवता  किसननं नकारार्थी मान हलवली.
      " अरे मग असच उपटसुंब्यासारखं फिरणार काय? " किसनच्या उत्तरानं रामभाऊचा राग एकदम उफाळून आला. पण लगेच रागाचा सुर खाली घेत समजावणीच्या सुरात म्हणाला, "अरे बाबा,शाळेशिवाय जगायचं इथनं पुढ लई अवघड हाय बघ या जगात. शाळा हाय तर सगळं हाय.माझं ऐक. शाना हो.नंतर पश्चाताप करत बसशील. खरं त्यावेळेस आपल्याकडची वेळ निघून गेलेली असल. म्हणून आणखी एकदा जरा थंड डोक्यानं विचार कर. घाईघाईनं काय पण करु नको."
      "मी न्हाई जात." किसन  निश्चयी सुरात बोलला. शाळेला न जाण्याच्या आपल्या शब्दावर तो ठाम होता. किसनचा हा निश्चय बघून देवापा आणि रामभाऊ एकमेकांकडं बघितलं.आता काही इलाज नसल्याचं दोघांच्या चेहऱ्यावरूनच एकमेकांनी ओळखलं होतं. शेवटी नाईलाजानंच रामभाऊनं विचारलं,
       " शाळा न्हाय तर मग कामाला जावं लागल बघ." कामाची भिती दाखवावी म्हणून रामभाऊ बोलला.
    पण किसन काहीच न बोलता पुन्हा तसाच गप्प उभा राहिला.
   " काम नको तर शाळंला जा. आणि शाळा न्हायीच म्हणतोस तर मात्र एक  काम हाय बघ गोव्याला. तिथं कामाला जावं लागल.'' रामभाऊ निर्वाणीच्या सुरात बोलला.
   "गोव्याला? जातो की मग."   गोव्याचं नाव काढताच किसन हरकून म्हणाला.
       " खरं हॉटेलात कपबशा धूवाय लागणार बघ."
कपबशा धुवायचं काम म्हटल्यावर तरी किसन शाळेला जायला तयार होईल म्हणून रामभाऊनं आणखी एक खडा टाकून बघितला. किसन थोडा नाराज झाला पण त्यानं  एक पर्याय ठेवला,
        "हॉटेलात राहतो खरं वेटरचं न्हायतर दुसरं कुठलं तरी काम देत्यात काय बघा की." उंबऱ्यावर उभारलेला किसन आत येत म्हणाला.
        " आरं म्हणून शाळा शिक म्हनतोय. असं हॉटेलात भांडी धुण्यापेक्षा दुसरं कुठलं तरी चांगलं काम मिळालं असतं का न्हायी?" रामभाऊंचा शाळेबद्दलचा अट्टाहास सुरूच होता.
      गोव्याचं नाव काढताच हरकलेला किसन शाळेचं नाव काढताच पुन्हा गप्प झाला.एकंदरीत त्याच्या चेहऱ्यावरुनच आता याला शाळा शिकायचीच नाही याची रामभाऊला खात्रीच झाली.
      " बर आत्त शाळा न्हाई म्हणतोईस तर न्हाई.मग गोव्यात कामाबद्दल तरी नक्की विचारु काय?नंतर आणि न्हाई म्हणशील."
      " न्हाई,जातो की, विचारा." किसननं अगदी आनंदानं होकार दिला. किसनचा होकार ऐकून रामभाऊनं देवापाकडं नजर वळवली. देवाप्पाचाही आता नाइलाज असल्याचं त्याच्या चेहऱ्यावरूनच समजत होतं. देवाप्पाची ती मूक संमतीच समजून रामभाऊ किसनला म्हणाला,
      " बरं मी उद्या फोन करतो. मला न्हाई म्हणनार न्हाई तो. तू दोन चार दिवसात जायची तयारी कर." रामभाऊ खुर्चीवरून उठून जाता जाता म्हणाला,
     "बर देवाप्पा. मी येतो आता. सकाळपास्न लई कंटाळा आलाय. जाऊन आडवं पडतो जरा."
      " बर. ये ये. मी बी जरा टीव्ही बघून आडवं पडतो. "
    रामभाऊ गेला तसं किसनंही मित्रांकडं आनंदानं  पळतच गेला.
     सकाळी रामभाऊनं डेअरीला दुध घातलं.आणि डेअरीकडून येता येताच एसटीडीत गेला. खिशातल्या डायरीतला नंबर शोधला आणि आपला गोव्यातला वर्गमित्र विजयला फोन लावला. फोन लागताच इकडची तिकडची थोडी ख्यालीखुशाली विचारली. बोलता बोलता रामभाऊंनं किसनच्या कामाबद्दल विषय काढला. विजयनं रामभाऊला नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. रामभाऊमुळं किसनच्या कामाचं नक्की झालं होतं.
     रामभाऊच्या शब्दाखातर किसनला आता एका चांगल्या हॉटेलात काम मिळालं होतं. तेही अगदी गोव्या सारख्या त्याच्या आवडत्या ठिकाणी. किसन यापूर्वी एकदा शाळेच्या सहलीतून गोव्याला गेला होता. आणि सध्या गावातली काही पोरंही गोव्यात कामाला होती. त्यांच्याकडूनही तो गोव्याविषयी बरंच ऐकून होता.त्यामुळं किसनला गोव्याचं खुपच आकर्षण वाटत होतं. 
     ओळखीमुळं किसनला जास्त त्रासाचं काम न मिळता थेट किचनमध्ये मदत करायचं काम मिळालं होतं. कुकला बारीकसारीक कामात मदत करायचं, ऑर्डरीप्रमाने प्लेट लावणे यासारख्या कामासोबत हॉटेलसाठी लागणारा किराणा व भाजीपाला खरेदी करायचं कामही मालकांनी किसनवरच सोपवलं होतं. आपल्या मनासारखं काम मिळाल्यामुळे किसनही आता  खुश होता. तो मन लावून काम करत होता.एक दोन वर्षात  मालकाचाही किसनवर चांगलाच विश्वास बसला होता. या एकदोन वर्षात मालकाच्या विश्वासाला तडा जाईल असं तो कधी वागला नव्हता. पण एक दिवस विजयच्या आलेल्या फोननं रामभाऊला धक्काच बसला,
     "अरे रामभाऊ तुझा माणूस एकदम लोफर निघाला ना.. "
     '' का?काय झालं? काय केलं त्यानं?" नेमकं काय झालं हे न समजल्यामुळं रामभाऊचा चेहरा प्रश्नार्थक झाला.
     " अरे काय सांगायचं. विश्वासानं त्याला मी किचनचा कारभार त्याच्यावर सोपवला होता पण तो तर अफराताफर करायला लागला ना." तक्रारीच्या सुरात विजय सांगत होता.
      " म्हणजे? मला नाही समजलं "
      " अरे हा किसन बाजार करताना माल कमी आणून दर जास्त दाखऊन पैसे काढत होता.पण ज्यांच्याकडून माल घ्यायचा ते आमच्या संबंधीतच आहेत. त्यानीच त्याची ही चलाखी सांगितली म्हणून कळली आम्हाला.''
   विजयच्या म्हणण्यावर रामभाऊला मात्र काहीच बोलता आलं नव्हतं. इतक्या विश्वासानं आपल्या शब्दाखातर विजयनं कामावर  ठेऊन घेतलं होतं. पण किसनच्या या वागण्यामुळं रामभाऊला वाईट वाटलं. किसनमुळं त्याला खजिल व्हावं लागलं होतं. रामभाऊ गप्पच झालेला बघून विजयच म्हणाला.
   " मी त्याला उद्यापासुन येऊ नको म्हणून सांगितलय... " विजयनं आपला निर्णय सांगितला.
   " अरे विजू तसं करु नको. मी त्याच्याशी बोलतो. हवं तर तू त्याला पैशांचं, व्यवहाराचं काम सोडून बाहेरचं कायतरी काम लाव पण कामावरुन काढू नको. त्याचे आई बाबा बिचारे खुप चांगले आहे. या नालायकालाच कशी काय दूर्बूद्धी सुचली  कुणास ठाऊक. "
    " हो ना रे.अरे त्याला मी तुझ्या भरवशावरच ठेवलं होतं. ''
    " एकदा मी त्याच्या वतीनं माफी मागतो. पण त्याच्या आई बाबाकडं बघून एक वेळ ठेव.मी त्याला समजावतो. "
  " अरे तू कशाला माफी मागतोस त्याच्यासाठी?बरं असु दे.तुझ्या शब्दा खातर पुन्हा एकदा ठेवीन त्याला पण हॉटेलात नाही.आमच्या बीचवरील कस्टमरना सर्विस द्यायच्या कामावर ठेवीन." 
   "कुठं पण ठेव खरं ठेव."
     " हो रे. हुशार आहे म्हणून किती विश्वासानं त्याच्याकडं महत्वाचं काम दिलेलं. पण तो असं करायला लागला ना. मग काय करणार? "
     " मी बोलतो त्याला.एवढी वेळ सांभाळून घे. "
     "'बरं . तू काय तितका मनाला लावून घेऊ नकोस. बघू ठेवून एकदा... बर, ते असू दे.. तुझं कसं काय चाललंय..?? "
       " काय नाही.. नेहमीचच शेती, गुरेढोरं सांभाळायचं. आपलं रोजचच रुटीन "  रामभाऊ हसतच म्हणाला..
     " मग येना एक दिवस फॅमिलीसह. रोजच्या रुटीनपेक्षा कधीतरी एक दिवस वेगळं जीवन जगायचं ना रे. "
" हो रे पण गुरं आणि शेतीच्या कामातून वेळच मिळत नाही. "
   " कामातून एक दिवस सवड काढून ये .. अरे प्रत्येक्ष भेटून खुप दिवस झाले. फक्त फोनवरुन बोलनं नको.. "
    "बघू. एकदा नक्की येतो."
    " हा ये ये. नक्की ये. बर, त्या तुझ्या माणसाला येवढं समजून सांग बरं. "
    " हा सांगतो त्याला. ''
    " बर बर. ठेऊ आता..? "
    '' हां हां ठेव. .. "
    "  चल बाय.. "
   मालकाचं हिशेबातील दुर्लक्षाचा गैरफायदा घ्यायची हाव किसनला रोखता आली नव्हती. कमी माल आणून जादाचा दर लावणं आता त्याच्या नित्याचं झालं होतं.पण त्याला लागलेली ही चटक खुप दिवस चालली नव्हती.तीन चार महिन्यातच ती उघडकीस आली होती.
      किसनला त्याच्या या असल्या करामतीमुळं त्याला आता हॉटेलमार्फतच कलंगुट बीच वर हॉटेलच्या कस्टमरना सर्विस द्यायचं काम करावं लागत होतं. पण किसनला हे काम किचनपेक्षा चांगलंच वाटत होतं.
     कलगुंट गोव्यातलं एक सुंदर ठिकाण. किनाऱ्यावर देशी,विदेशी पर्यटकांची  रेलचेल. रंगीबेरंगी मोठ्या छत्र्यांखाली असलेल्या बेड व आरामखुर्च्यावर सुर्याची किरण घेत पहुडलेले तोकड्या कपडयांतील गेारे पर्यटक. अशा या विदेशी स्त्री पुरुषाकडं डोळे विस्फारुन आणि कुतूहलानं पाहणाऱ्या आपल्या भारतीय पर्यटकांच्या नजरा.किनाऱ्यावर पसरलेली मऊ,मुलायम आणि सोनरी, पिवळसर वाळू. दूरवर पसरलेलं निळंशार खारं पाणी. आणि त्यावर फेसाळत येणाऱ्या शुभ्र लाटा. 
   अशा या सुंदर आणि आल्हाददायक वातावरणात  किसन आता बराच रुळला होता.किसनला गोव्याचे खारं दमट हवामान आणि खाणं, पिणं चांगलंच मानवलं होतं.आधीच उंचपुरा, देखणा आणि गोऱ्या रंगाचा असणारा किसन तर आता एखाद्या हिरोसारखाच दिसत होता.गेले तीन चार वर्ष बीचवर काम करत असलेला किसन इंग्रजीही बऱ्यापैकी बोलायला शिकला होता. हॉटेल मॅनेजरनी नेमून दिलेल्या विदेशी पर्यटकाना सर्विस द्यायचं काम तो चोख बजावत होता. मॅनेजमेंटच्या सुचनेनुसार त्यांना हवं नको ते पाहत होता.गेल्या तीन चार वर्षात अशा कितीतरी नाना तऱ्हेच्या, स्वभावाच्या  विदेशी स्त्री पुरुष पर्यटकाना आपली सेवा दिली होती. पण त्यातही त्याला जेनी मात्र इतरांपेक्षा जरा वेगळीच वाटली होती.
         जेनी पोर्तुगालची असली तरी तिची चालढाल,रंगरुप थोडं भारतीयच वाटत होतं. त्याला कारणही तसंच होतं.खरं तर जेनीची आजी मूळची गोव्याचीच.घरच्यांचा विरोध झुगारुन एका पोर्तूगिज अधिकाऱ्याबरोबर प्रेमविवाह केला होता. पण गोवा मुक्तीच्या वेळी जेनिफरच्या आजीला  आपल्या  पतीबरोबर पोर्तगालला जाणं भाग पडलं होतं. तेंव्हापासुन घरच्यांनी तिच्याशी आणि तिनं घरच्यांशी कधी संपर्क केला नव्हता. आज कित्येक वर्षानं जेनी अगदी ठरवून आपल्या आजीच्या गावी आली होती.आजी सध्या हयात नव्हती पण आजीनं गोव्या विषयी सांगितलेल्या गोष्टी,आठवणी अजून ताज्या होत्या..आजीनं शिकवलेले कांही कोकणी शब्दही ती अजून विसरली नव्हती.गोव्यात आल्यापासुन तर जेनी आवडीने आणि जाणिवपूर्वक काही कोकणी शब्द वापरण्याचा प्रयत्न करत होती. किसनलाही ती कोकणी भाषाच बोलण्यासाठी आग्रह धरत होती.आजीमुळं तिला भारताविषयी आणि गोव्या विषयी खुपच आकर्षण वाटत होतं. आजीनं सांगितलेल्या आठवणी आपल्या डोळ्यांनी बघताना तिचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. प्रत्येक भारतीय गोष्टीत तिला आपलेपणा वाटत होता. तिला भारताविषयी  अभिमान वाटत होता.आपल्या आजीचं सौंदर्य थोड्याअंशी का होईना पण आपल्यातही उतरल्याचा तिला आनंद वाटत होता. ती आपल्या आजी विषयी, तिनं सांगितलेल्या आठवणींविषयी किसन बरोबर भरभरून बोलत होती. किसनकडूनही 
भारत आणि गोव्याविषयी माहिती जाणून घेत होती. यामुळं गेल्या सातआठ दिवसात दोघांची खुपच मैत्री जमली होती. मनानं दोघंही  एकमेकांच्या खुपच जवळ आले होते.जेनीला तर किसन सोबत राहणं खुप आनंददायी वाटत होतं. किसनलाही तिचा मनमोकळा, निखळ स्वभाव खुप भावला होता. त्यांच्या मनात एकमेकांविषयी ओढ असली तरी त्यांनी मात्र तसं त्यानी एकमेकांना कधी जाणवू दिलं नव्हतं. जेनी किसन  बरोबर गाईडपेक्षाही एक मित्र म्हणूनच जवळीकतेनं वागत होती.तिने किसन सोबत  जवळ जवळ पंधरा वीस दिवसात वेगवेगळ्या चर्च, म्युझियमना भेट दिली होती. वेगवेगळ्या बीचवर पॅरा सेलिंग, डॉल्फिन टूर्स, वॉटर स्पोर्टसच्या थ्रीलचा आनंद लुटला होता., गोवन फुडचा आस्वाद चाखला होता. गोव्यातील शॉपिंग एन्जॉय केला होता.गोव्यातले किसन सोबतचे दिवस किती भर्रकन निघून गेले हे तिला समजलच नव्हतं.
      आज जेनीचा गोव्यातला शेवटचाच दिवस होता. उद्याच्या फ्लाईटनं ती पोर्तुगालला जायचं होतं. परत जाण्याच्या कल्पनेनं दोघांचंही मन अस्वस्थ झालं होतं. हळवं झालं होतं. दोघंही आज खुपच नाराज दिसत होते. नेहमीच उत्साहानं उसळ्या घेणाऱ्या लाटा आज अगदी संथ आणि उदास भासत होत्या.वरकरणी उत्साह, चैतन्य दाखवण्यासाठी त्या लाटा उगाचच मोठ्यानं घोंघावत उसळ्या घेत आहेत असं त्याना वाटत होतं. खळखळणाऱ्या समुद्रासारखी नेहमी बडबड करणारी  जेनी आज मात्र  बेडवर  गप्पच पहुडलेली होती.जेनीच्या बाजूला बसलेल्या किसनची अस्वस्थता लपत नव्हती.काय बोलांव दोघांनाही सुचत नव्हतं.जेनी आणि किसन दोघंही दुर आणि धुसर क्षितिजाआड लपू पाहणाऱ्या सुर्याकडं एकटक नजर लावून बसले होते. लालभडक सुर्याला हा अथांग निळाशार सागर आपल्या पोटात सामावून घेतानाचं विहंगम दृष्य पाहत होते. सुर्याच्या तेजामुळं नेहमी चमचमणाऱ्या पाण्याचं तेजही आता सुर्य मावळल्यामुळं कमी झालं होतं.सुर्य अस्ताला गेला असला तरी त्याचं अस्तित्व मात्र मावळतीकडच्या आकाशात पसरलेल्या केशरी रंगाच्या रुपानं बराच उशिर टिकून होतं. नेहमीच निळं भासणारं आकाश,पाणी, आणि सारं वातावरणजणू केशरी रंगानं न्हाऊन निघालं होतं. काही वेळानं तोही रंग गडद होत अंधारलेल्या क्षितिजाआड गडप झाला होता.
       किसन इतक्या पर्यटकांच्या सहवासात राहिला पण जेनीला निरोप देण्यासाठी विमानतळावर आलेला किसन आजच्या इतका भाऊक कधीच झाला नव्हता. निरोप देताना दोघांच्या सुरातला कातरपणा स्पष्ट जाणवत होता. आता जायची वेळ आली होती.नको वाटत असलेली पण प्लेन सुटायची वेळ झाल्याची सूचना झाली. सुचना ऐकताच बराच वेळ किसनकडं एकटक पाहणाऱ्या जेनीनं अचानक किसनचा हात हातात घेतला आणि आवेगान आपल्या गुलाबी ओठांची मोहोर किसनच्या गोऱ्या आणि गोबऱ्या गालावर उमटवली. तिला आपल्या भावना रोखता आल्या नव्हत्या. पण किसन क्षणभर गडबडला,अचानक घडलेल्या घटनेनं त्याचं सारं अंग शहारलं.ओलसर, मऊ आणि ऊबदार ओठांचा स्पर्श किसनला कितीतरी सुखद वाटला. पण अगदी क्षणभरच. कारण या सुखद अनुभवातून भानावर येईस्तोवर एव्हाना जेनी प्लेनकडं घाईनं निघालीही होती. जाता जाता तिनं एकदा मागं वळून पाहिलं. तिच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. घाईने जाता जाता तिची पावलं एकाएकी जड झाली . तिच्या डोळ्यांतील आसवं पाहताच किसनही चलबिचल आणि अस्वस्थ झाला. त्या अवस्थेतही त्यानं हसत निरोप देण्याचा प्रयत्न केला. जेनी विमानात गेली तसं किसन आणखीनच अस्वस्थ झाला.विनानानं टेक ऑफ घेत आकाशात झेप घेतली तसं एक दिर्घ सुस्कारा सोडला आणि विमनस्क मनानं विमान दृष्टीआड होईपर्यंत कितीतरी वेळ एक टक पहातच राहिला.
       जेनी जाऊन दोन तीन आठवडे उलटून गेले होते. काही दिवस जेनीच्या अस्वस्थ करणाऱ्या आठवणी  विसरुन किसन आपल्या रोजच्या कामाला लागला होता. अचानक एक दिवस  हॉटेलच्या नंबरवर जेनीचा किसनसाठी फोन आला. बिचवर कामावर असलेल्या किसनला फोनसाठी मॅनेजरनी निरोप पाठवला. निरोप ऐकताच किसन जवळ जवळ धावतच हॉटेलकडं आला होता. जेनीन सांगितलेल्या वेळेत जेनीच्या येणाऱ्या फोनची उत्कंठतेनं वाट पाहत होता. आता आपल्याला  जेनीबरोबर बोलायचं आहे या कल्पनेनं मन कांही क्षण हुरहुरलं होतं. उत्सुकता ताणली होती. उत्कंठा लागून राहिलेल्या फोनची जशी वाजली रिंग  तसं  त्यानं चटकन कानाला रिसिव्हर लावला.उल्हासीत चेहऱ्यानं किसन बोलत होता.बोलता बोलता जेनीनं किसनला फोनवर दिलेल्या लग्नाच्या आणि पोर्तुगालला येण्यासाठी दिलेल्या अनपेक्षित ऑफरने मात्र तो अक्षरशः उडालाच. त्याच्या चेहऱ्यावर एकदम आनंद आणि आश्चर्य यांचं मिश्रण  पसरलं. जेनीनं केलेल्या प्रपोजमुळं किसनचे हात एकाएकी थरथरले, हाताचे तळवे घामेजले, आवाज एकाएकी घोगरा झाला. त्याला काय बोलावे तेच कळेना.त्याला स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. क्षणभर मनाची चलबिचल झाली. थोडा गडबडला पण लगेच स्वतःला सावरत त्यानं मागचा पुढचा विचार न करता सरळ होकार देऊन टाकला. होकार देताना त्याच्या सुरात जाणवणारा कंप तो थांबवू शकला नव्हता.
     जेनीचा फोन आल्यापासुन किसनला आता जणू हवेत तरंगत असल्याचा भास होत होता. किसननं पोर्तुगालला जायचा निश्चय तर केला होता. पण त्याला आता आईबाबांची संमती घ्यायची होती त्यांची समजूत घालायची होती. त्याला आता गावाकडं जाणं भाग होतं.त्यानं वेळ लावताच नाही. त्यानं गावाकडं जायची तयारी केली. किसन गावाकडं आला पण आपण परदेशात जाणार हे आईबाबांना सांगायचं कसं?रात्री जेवण करता करता संधी साधून किसननं आपला निर्णय कचरतच सांगितला.किसनचा हा निर्णय ऐकताच देवाप्पाच्या गळ्यातला घास गळयातच अडकल्यासारखा झाला. आईचा तोंडापर्यंत आलेला घास परत ताटात आला. किसन काय म्हणतोय यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिनं पुन्हा एकदा विचारलं.
      " काय म्हणलास? "
      " व्हय, मला जेंनी बरोबर लग्न करुन परदेशात जायचं हाय. "
        " आरं पण.. " देवापाला काहीच बोलता येईना.
        " बाबा, शाळा शिकून माणसं परदेशात नोकरीस जात्यातच की.मला शाळा न शिकता जायला मिळतंय. "
       " आरं त्यांचं वेगळं. तू तिकडी लग्न करुन घेतल्यावर आमच इकडं काय होणार याचा इचार केलास काय? " देवाप्पाची जेवणावरची वासना उडाली.देवाप्पानं भरलं ताट तसचं ठेऊन न्हाणीत जाऊन हातावर पाणी घेतलं. बहिण सरिता तर भावाच्या तोंडाकडच पाहत बसली. किसनला तिच्या घाबरलेल्या नजरेला नजर देता आली नव्हती. किसनची आई तर हादरुनच गेली होती. तिनं ही जेवणाचं ताट तसच ठेवलं.देवाप्पा आणि आईनं केवीलवान्या सुरात आम्हाला सोडून न जाण्यासाठी कितीतरी गळ घातली.
   " आरं ती ओळखीची ना पाळखीची. त्या परदेशी मुलखांत तुला फसवलंबिसवलं म्हणजे? " रामभाऊ आणि मित्रांनीही समजाऊन पाहिलं पण किसनच्या मनावर काहीएक परिणाम होत नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर फक्त जेनी आणि जेनी होती.
     शेवटी सर्वांचाच नाईलाज झाला. जड अंतःकरणानं होकार दिल्याशिवाय देवाप्पा आणि अनुसयासमोर पर्यायच नव्हता. परवानगी मिळताच किसननं जायची तयारी सुरू केली.जेनीनं पाठवलेल्या पैशातून त्यानं पासपोर्ट काढला. फ्लाईटच तिकीट बुक केलं.आणि एक दिवस गोव्याला आणि आपल्या माणसांना निरोप देत जेनीनं दिलेल्या पत्त्यावर पोर्तूगालला जाण्यासाठी  आकाशात उंच झेप घेतली.
     पोर्तूगालला गेलेला किसन जवळ जवळ आज दहा आकरा वर्षानी परतत होता. आपल्या माणसांच्या, गावच्या ओढीनं त्याला पुन्हा आपल्या मायदेशी खेचून आणलं होतं.जेनी बरोबर लग्न करून जेनीच्या बिझनेसला मदत करत तो तिथं आनंदानं राहत होता. असं असलं तरी आईबाबांना मात्र विसरला नव्हता. तो तिथूनच बाबांच्या खात्यावर पैसे पाठवून वेळोवेळी अर्थिक मदत करत होता. मध्यंतरी बहिण सरीताच्या लग्नाला, घर बांधण्यासाठीही पैसे पाठवले होते. असं असलं तरी त्याला गावची, मित्रांची आठवण  त्याला गप्प बसु देत नव्हती. प्रत्यक्ष भेटीशिवाय त्याचं समाधान होणं शक्यच नव्हतं.
     म्हणून जेनी आणि आपल्या आठ वर्षाचा मुलगा रोहनला घेऊन किसन फ्लाईटनं थेट गोव्यात उतरला होता. ज्या हॉटेलमुळं आपलं आयुष्य बदललं त्या हॉटेलचा मालक विजयला आणि हॉटेलमधल्या सहकाऱ्याना भेटण्याची ओढ त्याला रोखू शकत नव्हती. त्यानं  सर्वाची आनंदान भेट घेतली. काही वेळ त्यांच्या सोबत जुन्या आठवणी आणि गप्पात रंगला.
       आता त्याला गावाला जायची उत्कंठा लागली होती. मन आतूर झालं होतं. त्यानं सहकाऱ्यांचा निरोप घेतला. जेनी आणि रोहनला सोबत घेतलं.गावाला जाण्यासाठी तिथलीच एक भाड्याची टॅक्सी बुक केली. सोबत आणलेलं साहित्य डिक्कीत भरलं. जेनी आणि रोहन आत बसताच किसननं टॅक्सीचा ताबा घेतला. त्यानं सरळ गावाकडचा मार्ग धरला. गावी जाताना त्याला गेल्या दहा वर्षात झालेले कितीतरी बदल अगदी प्रकर्षानं दिसत होते.आपला भाग पून्हा पून्हा डोळे भरुन न्याहाळत होता.आपण पुन्हा आपल्या गावी जातोय या कल्पनेनं त्याचं मन हर्षून गेलं होतं. गाव जवळ येईल तसं त्याला आपलं गाव,आई बाबा, बहिण, मित्रांचे चेहरे डोळयांसमोर तरळू लागले. त्याना भेटायची त्याला हुरहुर लागली होती. त्याना भेटण्याचं स्वप्न रंगवता रंगवता गाव कधी आलं हे त्याला कळलंच नाही.टेकडी उतरुन खाली आलं की सुरवातीलाच हायस्कूलच दर्शन व्हायच.गावच्या थोडं बाहेर आणि वाटेवर असलेल्या शाळेच्या इमारतीनंच गाव सुरु होतं. समोर आपली शाळा दिसताच किसननं टॅक्सीचा वेग कमी केला. काही वेळ गाडी तिथंच थांबवली. शाळेची अगदीच दुरावस्था झाली होती.आधीच बाकलेला थाट अजूनच बाकल्यासारखा दिसत होता. शाळेकडं पाहताच  मागच्या सर्व आठवणी क्षणात सर्रकण डोळ्यासमोर आल्या तसं स्वतःच गालातल्या गालात हसला. हसता हसता डोळ्यांच्या कडा कधी ओल्या झाल्या त्याचं त्यालाच कळलं नाही.किसनच्या भावना जेनी आणि रोहनला कळणं शक्यच नव्हतं. किसननं त्याच अवस्थेत त्यानं टॅक्सी स्टार्ट केली आणि घरच्या दिशेनं वळवली.
       आज आपला मुलगा येणार म्हणून आई घरात अधिरतेनं वाट पाहत होती. सरिताही आपला भाऊ येणार म्हणून सासरहून दोन दिवस आधीच आली होती.
        किसननं टॅक्सी दारासमोर लावली आणि हॉर्न वाजवला. हॉर्न ऐकून देवाप्पानं बाहेर डोकावून पाहिलं. तो आपला किसनंच असल्याच देवाप्पानं ओळखलं. त्यानं चूलीजवळ बसलेल्या अनुसयाला सांगितलं. किसन म्हणताच ती लगबगीनं बाहेर आली. किसन बॅगा घेऊन आत येतच होता. किसनला बघताच आई आवेगानं किसकडं धावतच आली. लहान मुलाचे पापे घ्यावे तसे मटामटा गालाचे पापे घेतले. मायेनं हालावर हात फिरवला.नकळत तिचे डोळे भरुन आले.किसनला आईच्या मायेनं फिरवलेल्या हाताच्या स्पर्शाने एकदम भडभडू आले. हातातल्या बॅगा हातातनं केंहाच खाली पडल्या होत्या. किसनचे हातही आईला अलगत बिलगले. त्याची नजर बाजूलाच थांबलेल्या बाबांकडं गेली.आईच्या मिठीतून सुटका करून घेत किसननं बाबांना कडकडून मिठी मारली. दादाला बघून सरिताला आपले अश्रु रोखता आले नाहीत. तिनं आपल्या काखेतलं मूल खाली ठेवलं आणि भावाच्या मिठीत शिरली. बाबा, भाऊ आणि बहीण यांची एकच मिठी झाली होती.आईही अगदी कौतुकांनं पाहत होती.या प्रेमाच्या बरसातीत मात्र जेनी आणि रोहनकडं कुणाचचं लक्ष नव्हत. मात्र हे दोघंही आई बाबा आणि मुलाचं ओसंडून जाणारं प्रेम अनुभवत होते.जेनी आणि रोहन बाहेरच उभे होते. ते दोघे बाहेरच असलेले पाहून किसननं त्याना आत बोलवलं. कुणी कुणाला कधीच पाहिलं नव्हतं तरी कुणाला कुणाची ओळख करुन द्यायची कुणालाच गरज भासली नाही. प्रत्यक्ष कधी एकमेकाला पाहिलं नसलं तरी फोनवर अनेकवेळा बोलणं झालं होतं. त्यामुळं सर्वाना एकमेकांची ओळख व्हायला काहीच अडचण आली नव्हती.
       बऱ्याच दिवसानं आल्यामुळं गावात,घरात झालेले बदल किसनच्या नजरेतून सुटले नव्हते. गावात जसा बदल झाला तसं माणसांत झालेला बदलही त्याच्या नजरेतून सुटला नव्हता.आई बाबा थकलेले दिसत होते. सरिताही आता बरीच पोक्त बाई दिसत होती. जसा माणसात बदल दिसत होता तसा घरातही बराच फरक वाटत होता. आपल्या जुन्या घरांच्या जागी नवीन घरं उभारली होतं. किसननं पाठवून दिलेल्या पैशातून देवाप्पानंही चांगलं छानसं घर बांधून घेतलं होतं. बांधलेलं घर किसन कौतुकानं पहात होता. छोटंस,कौलारू पण छान घर. चौकटी, दारं, भिंती अगदी रेखीव.घर निरखून बघता बघता किसनच घराच्या थाटाकडं लक्ष गेलं. अगदी कुठ सुताचाही  फरक दिसणार नाही.अशा सुंदर थाटाकडं लक्ष जाताच  त्याला आपल्या हायस्कुल शाळेचा मोडकळीस आलेला थाट नजरेसमोर आला.शाळेचा बाकलेला थाट आठवताच थोडा अस्वस्थ झाला.मनात काहीतरी निश्चय करुन तो देवाप्पाजवळ आला. देवापा म्हशीना गवत घालत होता.
    " बाबा,आपल्या घराचा थाट कुणी बनवलाय? ''
    " सुतारच्या नाम्यानं बनिवलाय."  म्हशी समोर गवताची पेंडी टाकता टाकता देवाप्पानं सांगितलं.
    "नाम्यानं?'' किसनला आश्चर्य वाटलं.सुतारचा नाम्या किसनच्याच वर्गातला मित्र. अभ्यासात जेमतेम असलेल्या नाम्यानं हा थाट बनवलाय याचं त्याला कौतूक वाटलं.नाम्याचं नाव घेताच त्याला नाम्याबरोबरच शाळेतल्या अनेक मित्रांचे चेहरे, त्यांच्यासोबत केलेल्या करामती,आठवणी डोळ्यास समोर चमकल्या.
          " बाबा नाम्या गावातच असतोय. "
         "व्हय. कुठं आणि जातोय तो दुसरीकडं.गेला असलं कामावर कुठंतरी. येईल संध्याकाळी."
किसनला साऱ्या मित्रांना केव्हा एकदा भेटतोय असं झालं होत. किसननं दुपारी थोडी विश्रांती घेतली आणि मित्रांना भेटायचं म्हणून तो बाहेर पडला. जेनी आणि रोहन अजून झोपले होते.किसन पहिल्यांदा नाम्याकडंच गेला.नाम्या दारात लाकूड रंध्यानं  तासत बसला होता.किसन नाम्याला बऱ्याच दिवसानं पहात होता. खाली मान घालून रंधा मारत असलेल्या नाम्याला कुणीतरी आल्याची चाहूल लागली तसं त्यानं मान वर केली. पाहिल्यांदा त्याला ओळखता आलं नाही. त्यानं थोडं निरखून बघितल. बघतो तर काय किसन..! किसनला पाहताच नाम्यानं हातातला रंधा तिथंच टाकला आणि किसनकडं धावतच आला. नाम्याला बघताच किसननंही कडकडून मिठीत घेतलं.  आपला लंगोटी यार खुप दिवसानी भेटल्याचा चेहऱ्यावरचा आनंद दोघांनाही लपवता येत नव्हता.नाम्यानं किसनला घरात घेऊन गेला. घरात असलेल्या आपल्या बायकोला चहा ठेवण्यासाठी फर्मान सोडलं.
     चहा होईपर्यंत दोघं मित्र जुन्या आठवणीत हरवून गेले. जणू पुन्हा एकदा दोघांमध्ये शालेय जीवन शिरलं होतं. शाळेत केलेल्या खोड्या, आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. तेच खळखळतं हास्य पुन्हा ओसंडून वाहत होतं. दोघांनाही कशाचच भान नव्हतं. बोलता बोलता किसनच्या शाळेच्या शेवटच्या दिवसाची करामत आठवली नसती तरच नवल. ज्या कारणामुळं किसनला शाळा सोडावी लागली तो प्रसंग आठवताच किसन गंभीर झाल्यासारखा झाला. किसनला आपल्या मनातला निश्चय नाम्याला सांगायचा होता.
     "नाम्या, आपल्या अजानतेपनानं का होईना पण.नको त्या चुका झाल्यात हे खरं. पण आता मला त्याची भरपाई करायची हाय. पण मला आता तुझी मदत पायजे "
     " अरे हे काय बोलणं झालं?तुला काय मदत पायजे ती फक्त सांग. गरिब असलो तरी बसल्या जागी लाखं रुपय गोळा करीन."
      " तू पैशाची काय काळजी करु नको खरं मी सांगतो ते काम मी पोर्तुगालला जायच्या आत करायचं. "
     " करतो खरं काय सांग तरी आधी."
      " हे बघ... "  म्हणत किसननं नाम्याला आपल्या मनातलं काम सांगितलं. नाम्यालाही ते एकदम पसंद पडलं. नाम्यानंही अगदी आनंदात आठ दिवसातच काम संपवलं.
      किसननं शाळेसाठी केलेल्या कामाची कृतज्ञता म्हणून आज शाळेनं किसनच्या सत्कार आयोजित केला होता. या सत्कार कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, शाळा संस्था अध्यक्ष आणि मान्यवरांना बोलवलं होतं. किसन सोबत जेनी, रोहन, देवाप्पा आणि किसनची आई सुद्धा आली होती. नाम्या त्याचे मित्रही आले होते.
      गोंगाट करणाऱ्या मुलांना शांत बसवत मुख्याध्यापक सत्काराचा उद्देश सांगण्यासाठी उभे राहिले. सर्वांच स्वागत करुन मूळ विषयाला हात घातला,
     "खरं तर विश्वास बसत नाही की ज्या मुलानं दहावीच्या सहामाही परिक्षेच्या प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी त्या ज्या वर्गात ठेवल्या होत्या त्या वर्गाची कौलं काढून,थाट मोडून पेपर फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी शाळेचा थाट मोडल्यानं त्याची करामत उघडकीस आली. यामुळं आपल्याला शिक्षा होईल या क्षुल्लक कारणानं ज्याला शाळा अर्धवट सोडावी लागली त्याच विद्यार्थ्याला आज आपल्या शाळेची करुणा वाटते. आपल्या शाळेकडं  वळून बघावसं वाटतं. शाळेचं रुप बदलावसं वाटतं. ही खरच एक चांगली आणि कौतूकाची गोष्ट आहे. त्याच्या हातून त्यावेळी अजाणतेपणानं चूक झालीही असेल पण ती चुक सुधारण्याचं प्रत्येकाला जमतंच असं नाही. पण किसनंन ते करुन दाखवलं. त्यानं आमच्या शाळेच्या चारही खोल्यांचा मोडकळीस आलेला थाट नवीन बनवून दिला.शाळेची रंगरंगोटी करुन दिली.आज बऱ्याच दिवसानं आमच्या शाळेचं रुप बदललं ते फक्त किसनमुळं. किसनसारखे मागं वळून बघणारे विद्यार्थी तयार व्हावेत, आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही आज हा छोटासा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.आमच्या संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते त्याचा आता आम्ही शाल, श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करीत आहोत."
मुख्याध्यापक सरांच्या या गुणगानामुळं किसनला भरुन आलं. देवाप्पा आणि आईलाही आनंद झाला. जेनी आणि रोहननंही विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात आपल्याही टाळ्याचा आवाज मिळवला.
      आपल्या शाळेतील  सत्कारानं भारावून गेलेल्या किसनंला मात्र आपल्या या छोट्या का होईना पण केलेल्या कामानं कृतकृत झाल्यासारखं वाटत होतं. त्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचा आणि या सत्कार कार्यक्रमाचा थाट शाळेच्या नवीन थाटाइतकाच उठून दिसत होता....


   जयवंत जाधव, कोवाड
    ता.चंदगड जि कोल्हापूर
   ९४०३४६३८८१

कथा - देवाचा न्याय

कथा..
.
.
देवाचा न्याय

पावसाचा जोर वाढतच होता. गेले दोन महिने पावसाची अखंड सुरु असलेली बरसात अजूनही सुरुच होती. सर्व नद्या,नाले ओहोळ .तलाव, धरणं अगदी ओथंबून वाहत होती.नद्यांनी तर आपली पातळी केंहाच ओलांडली होती. नदीच पाणी साऱ्या शेतशिवारात पसरलं होतं. पाऊस तर थांबायचं नाव घेत नव्हता.नदीकाठच्या गावातील लोकांची मात्र खुपच तारांबळ उडाली होती.
    चिंचेवाडी सुद्धा असंच नदीच्या काठावर वसलेलं सुंदर टुमदार गाव.गावाजवळून वाहणाऱ्या नदीमुळं गावाला एक वेगळाच बाज आणि सौंदर्य प्राप्त झालं होतं. गावाजवळच असलेल्या नदीवरच्या बंधाऱ्यामुळं नदीला बारमाही पाण्याचं वरदान लाभलं होतं. बंधाऱ्यामुळं साठलेल्या नितळ व शांत पाण्यात डोकावणारी गावची लख्ख छबी तर बघत बसावं अशीच. शेतीसाठी, पिण्यासाठी नेहमीच पाणी पुरवणारी नदी पोहणाऱ्यांसाठीही तितकाच भरभरून आनंद देत होती. नदी  कोरडी पडली असं बहुदा कधी घडलंच नव्हतं. पण प्रत्येक पावसाळ्यात एक दोनदा पुराचा अनुभव हमखास द्यायची. दरवर्षी पुर यायचा पण सहसा कधी कुणाचं  नुकसान केलेलं कुणाला माहितच नव्हतं.अशा या आपल्या सुंदर नदीबद्द्लचा अभिमान गावातल्या प्रत्येकाच्या मनामनात नदीतल्या पाण्यासारखाच अगदी तुडूंब भरला होता. 
   यावर्षी पुरानं मात्र आपल्या नेहमीच्या पातळीपेक्षा बरीच उंची गाठली होती.बंधाऱ्यावरुन पाणी ओसंडून वाहत होतं. काही पाणी नदीकाठा जवळून गेलेल्या रस्त्यावरही पसरलं होतं. रस्त्यावरच्या आणि बंधाऱ्यावरच्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यात खेळण्याचा,चालण्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या मुलांबाळांसह अनेकजण बंधाऱ्यावर येत होते. शाळेतली मुलं बंधाऱ्यावर आणि रस्त्यावर आलेलं पाणी एकमेकांवर उडवत भिजण्याचा आनंद घेत होती.तरुणांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता.
    नेहमी एक दोन दिवसात उतरणारं पाणी या वर्षी मात्र तीन चार दिवस झाले तरी कमी होत नव्हतं. सुरवातीला पुराचा आनंद घेणाऱ्या  लोकांच्या मनात मात्र आता पुराच्या सतत वाढणाऱ्या पाण्यासारखीच भितीही वाढत होती. घरांपासुन काठावरच्या  पाणी अगदी लांब वाटत होतं.पण भरभर वाढणारं पुराचं पाणी पायऱ्यापर्यंत येऊन कधी थडकलं हे समजलच नव्हतं. घरं,पिकं पाण्याखाली जात असलेली पाहुन अनेकांच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट पसरलं होतं.घरात, दारात,चौकात फक्त आणि फक्त पुराबाबतच चर्चा होत होत्या.जाणतीजूणती बाया माणसं पूराच्या आपल्या मागच्या आठवणी ताज्या करत होती.
    '' आमच्या आधी कधी एकदा आसा पूर आल्ता म्हणं बघा."
     " मला कळतंय तवापास्न मी तरी एवढा पुर कधी बघाय न्हायी बाबा .''
    एक ना अनेक आठवणी. या वर्षाचा पूर किती भयंकर आहे हे त्यांच्या बोलण्यातून  समजून येत होतं.पुरानं तर खरोखरच अगदी आक्राळविक्राळ रूप धारण केलं होतं. नजर टाकावी तिकडं फक्त पाणीच पाणी दिसत होतं. पाऊस तर उसंत घ्यायला अजिबात तयार नव्हता. नदीकाठावरच्या घरातील लोकं पाणी आज कमी होईल उद्या कमी होईल या आशेवर बसली होती.मात्र सतत वाढणाऱ्या पुराच्या पाण्यानं त्यांच्या तोंडावरचं पाणी  केव्हाच पळवलं होतं. संध्याकाळपर्यंत पायऱ्यावर असणारं पाणी रात्रीच अनेकाच्या घरात शिरलं होतं. अचानक घरात आलेल्या पाण्यानं तर अक्षरशः सर्वांचीच झोप उडवली होती.दिवसभर पाण्यात खेळणाऱ्या चिमूकल्यांचेही चेहरे घाबरुन इवलेसे झाले होते. घरातल्या सामानाची आवराआवर करता करता लहानमोठ्यांची धांदल उडाली होती.कांहीनी आपल्या घरातलं सगळं साहित्य माळ्यावर काढून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्यांचे माळे नव्हते त्यांची परिस्थिती तर खुपच केविलवाणी झाली होती.आपत्कालीन खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीनं शाळा आणि देवळात जागा मोकळी करुन दिली होती.आदल्या दिवशी तशा सुचनाही दिल्या होत्या. पण एक काय दोन ? अशा कितीतरी घरांत पाणी शिरलं होतं. आता एकदमच इतक्या लोकांची ऐनवेळी कुठं सोय करायची? सर्वानाच मोठा प्रश्न पडला होता.ज्याची आपापल्या भाऊबंदाच्या किंवा इतर संबंधिताच्यात सोय होती ते सकाळपर्यंत पाणी कमी होईल या आशेनं अंगावरच्या कपडयावरच बाहेर पडले होते. त्यांच्या घरांत तात्पूरता आसरा घेतला होता. ज्यांची सोय नव्हती त्यांना गावच्या शाळा, मंदिराशिवाय पर्याय नव्हता. यात लहान मुलाना मौज वाटत असली तरी मोठया आणि म्हाताऱ्या माणसांची मात्र यात खुपच ओढाताण झाली होती. इतरांसारखच लक्ष्मीही यातून सुटली नव्हती.
      निदाकाठावर घर असलेल्यांत लक्ष्मीही होती. लक्ष्मी खुप खुप तर चाळीस पंचेचाळीशीतली विधवा. ती आपल्या वाटणीला आलेल्या दोन खोल्यांत रहात होती. तिच्या सोबतीला म्हातारी आणि आजारी सासू होती. लहान लहान खोल्यांतला दोघींचा छोटासा फाटका तुटका संसार. लक्ष्मीच्या नशिबी ऐन तारुण्यातच वैधव्य वाट्याला आलं होतं. एका पोरींना जन्माला घालून तिचा नवरा केदारीनं दारुच्या नादात जगाचा निरोप घेतला होता. कमवता धनी नको त्या वयात जग सोडून गेल्यामुळं घराची सगळी जबाबदारी लक्ष्मीवरच पडली होती. सासुबरोबरच  आपल्या लहानग्या मुलीला सांभाळण्यासाठी लक्ष्मीनं खुप कष्ट उपसले होते. मोलमजूरी बरोबरच परंपरेनं चालत आलेला झाडू बनवायच्या धंद्यानं तिला साथ दिली होती.  झाडूसाठी लागणाऱ्या रानातल्या शिंदीच्या झाडाच्या झावळ्या तोडून आणून त्यापासुन झाडू तयार करायची.तयार झालेले झाडू ती डोकीवर घेऊन खेडोपाडी जाऊन विकायची. आलेल्या पैशातून आपला संसारगाडा हाकायची. हे सारं लक्ष्मीच्या अंगवळणी पडलं होतं. गावातल्या पुरुषांनाही लाजवेल  असं ती राबत होती.आपल्या शेजाऱ्यासारखं कामधंदा न करता ऐतं बसुन खाणं, चैनीत राहणं तिला कधी जमलंच नव्हतं. आणि तसं तिला ते परवडणारंही नव्हतं
    लक्ष्मीच्या वागण्यातही कधी वावगेपणा डोकावला नव्हता.डोक्यावरचा पदर कधी ढळू न देणारी लक्ष्मी नेहमी सर्वांशी मिळून मिसळून रहायची. पण तिला कधी  वावगं खपत नव्हतं.स्वभावानं अतिशय प्रामाणिक पण त्यापेक्षाही जास्त भोळी होती. .लक्ष्मीच्या भोळेपणाचा गैरफायदा मात्र शेजारच्या भाऊबंदानी  अनेकवेळा  घेतला होता.तिच्याकडून ऊसनवारी घेतलेले किरकोळ पैसे  कित्येक वेळा बुडवले होते. असं असलं तरी लक्ष्मीनं मात्र कुणाशी वाद घातला नव्हता. आपलं काम कधी थांबवलं नव्हतं.बाईं माणूस असुन सुद्धा आपल्या वयस्क व आजारी सासूला सांभाळत तिनं आपल्या एकूलत्या एक मुलीचं लग्न लावून दिलं होतं. लेकीचंही आता बऱ्यापैकी चाललं होतं. पण अनेक वादळं झेलत कष्टानं दिवस कंठणाऱ्या लक्ष्मीसमोर मात्र या पूराच्या रुपानं नवीनच संकट ठाकलं होतं.
        गेल्या चार दिवसात महापुरानं अनेक घराना पाण्यानं वेढलं होतं. कित्येक घरांना तर आपल्यात सामावून घेतलं होतं. कधीकाळी बांधलेल्या जून्या रद्द्याच्या घराच्या मातीतला कस आणि चिकटपणा नाहीसा झाला होता. त्यामुळं ही माती पुराच्या पाण्यात  मिठासारखी विरघळून गेली होती. फक्त गोपाळचं गेल्याच वर्षी बांधलेल्या  दोन सोप्यांचं घर सोडलं तर  काठावरची  जवळजवळ सर्वच घरं जमीनदोस्त झाली होती. पुराच्या या पाण्यामुळं लक्ष्मीसारख्याच अनेकांच्या संसारावर  अक्षरशः पाणी फेरलं होतं.
      घरापर्यंत पाणी येईल पण इतकं  येईल हे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हतं.अजूनपर्यंत इतकं पाणी कधीच आलं नाही आणि आता कसं येईल?या  भ्रमात ज्यांनी सारं साहित्य तसच टाकून पुराच्या भितीने रात्रीच घर सोडलं होतं.निवाऱ्यासाठी जिकडं तिकडं विखुरले होते त्या लोकांना आपली घरं पडल्याची बातमी सकाळीसकाळीच समजली होती. ही बातमी कानावर पडताच त्यांनी आपल्या घरांकडं धाव घेतली होती.पुराच्या पाण्यानं घरांना पूर्ण वेढलं होतं. घरं कसली फक्त घरांची छप्परच दिसत होती. वेढलेल्या पाण्यामुळं धड घराकडंही जाता येत नव्हतं. मात्र घराची झालेली दुरावस्था स्पष्ट दिसत होती. भिंतिखाली घरातली भांडीकुंडी, अंथरुन पांघरून, टीव्ही, कपाटं सारं काही गडप झालं होतं. लांबूनच आपला बुडालेला संसार पाहून बायाबापड्यांचा एकच आक्रोश सुरु झाला होता. त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू  आणि झालेलं नुकसान पाहून बघणाऱ्यांची मनं मात्र हेलावून जात होती.लक्ष्मीनं तर पुराच्या पाण्याची तमा न करता आपला ऊर बडवून घेत आपल्या पडलेल्या घराकडं धाव घेतली. शेजारच्या गोपाळनं घाईनं  पाण्यात जात तिला अडवलं आणि  बाहेर ओढत आणलं. पण काळीज पिळवटून टाकणारा तिचा आक्रोश मात्र काही केल्या थांबवू शकला नाही.
   " आता जगून काय करू रे देवा. माझी सगळी भांडीकुंडी, धान्य, अंथरून सगळा संसार धूऊन गेला गं...पैपै गोळा करून उभा केल्ला संसार कसा काय न्हायनिप्पत झाला ग माझ्या आई."  लक्ष्मीसारखाच आक्रोश प्रत्येक घरातल्या बाया माणसांचा सुरु झाला होता. अनेकांची तर वाचाच बसल्यासारखी झाली होती.पोराबाळांच्या डोळ्यात डबडबून पाणी भरलं होतं.भांडया कुंडयाबरोबर पोटाला चिमटा काढून ठेवलेले लक्ष्मीचे तीन चार हजार रुपयेही पडलेल्या भिंतीत गाडून गेले होते.
    " कुणीतरी माझे पैसे काढून देवा गं.. " लक्ष्मीची आर्तता काळीज चिरुन जाणारी होती.आता एवढया पाण्यात पैसे शोधायचं कसं?  बघायला येणारे जाणारे मात्र पडलेली घरं आणि आर्त आक्रोश बघून हळहळण्याशिवाय काहीच करु शकत नव्हते. 
       निम्मं गांव पाण्याखाली गेलं होतं. वीस पंचवीस घरांनी तर अक्षरशः जलसमाधी घेतली होती.या विध्वंसकारी प्रलयाची बातमी प्रत्येक न्युजचॅनेलवर महाराष्ट्र आणि देशभर पसरली होती.पूरग्रस्तांचा आक्रोश टीव्हीवरुन महाराष्ट्रातील घराघरांत घूमू लागला होता. ऐकणाऱ्यांच्या काळजाचं पाणी होतं होतं. या पुराच्या संकटानं मात्र एक गोष्ट प्रकर्षानं पुढं आली होती. या पुरानं माणसातली  माणूसकी जागी केली होती. 'आजची तरुण पोरं काय कामाची नाहीत' म्हणणाऱ्यांची बोलती बंद होईल असं तरुण राबत होते. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तरुणांबरोबरच अनेक हात  पुढे येत होते.. गावातील अनेक मंडळं मदतीसाठी पुढं सरसावत होती.बेघर झालेल्या पुरग्रस्ताना जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य,कडधान्य जमा करुन  वाटप होऊ लागलं. पूर ओसरताच गावच्या मंडळाबरोबरच बाहेरच्या अनेक समाजसेवी संस्था, औद्योगिक कंपन्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. भांडीकुंडी, अंथरूनपांघरून, धनधान्य, तयार जेवणाचे पॅकबंद डबे याबरोबरच आर्थिक मदतचाही ओघ सुरू झाला होता. रोज कुणा ना कुणाची मदत येत होती.आलेली मदत ज्या त्या वेळी वाटप होत होती. मदत घेणाऱ्यांच्या रांगा वाढू लागल्या.पूरग्रस्त असलेले आणि नसलेलेही रांगेत दिसु लागले. मदतीची माहिती वेळीच मिळत नसल्यामुळं विखुरलेले खरे लाभार्थी मात्र बाजूलाच राहू लागले होते.
     दिवसेंदिवस अनेक ठिकाणाहून वेगवेगळ्या रुपात मदतीचा ओघ येतच होता. जसजसा मदतीचा ओघ वाढत गेला तसा मदत वाटपातील घोळाचं प्रमाणही वाढत गेलं. ढापाढापीची कुजबुज सुरु झाली. नंतर नंतर तर उघड तक्रारही सुरु झाली होती. शेवटी ग्रामपंचायतीच्या मदतीनं खऱ्या लाभार्थींची यादी केली गेली.ज्यांची घरं पडलीत आणि ग्रामपंचायतीत ज्यांच्या नावावर घराची  नोंद आहे अशांचीच एक यादी तयार केली होती. 
    पूरग्रस्तांच्या या नवीन यादीत मात्र लक्ष्मीचं नाव आलंच नव्हतं. त्यामुळं आतापर्यंत मिळत होती तशी मदत लक्ष्मीला मिळेनांशी झाली होती. मदतीसाठीच्या रांगेतून तिला बाहेर काढण्यात येऊ लागलं. आता मात्र  लक्ष्मी चांगलीच बिथरली होती.
    " माझं घर पडूनबी मला मला का मदत देईनासा?" रागासरशी लक्ष्मी मदत वाटप करणाऱ्यांसोबत भांडू लागली.
    " वहिणी, तुझं नाव यादीत न्हाय. तुझ्या नावावर घर न्हाय." 
     " घर न्हाय? मग मी काय इतकं दिवस काय मसणात ऱ्हाईत हुतो काय..?
     " आत्त आमी तरी काय सांगणार? ग्रामपंचायतीत चौकशी कर जा की. यादीत नाव का न्हाई ते.आमच्या बरोबर कशाला  वाद घालत बसलियास?" यादीनुसार वाटप करणारे समजावून सांगत होते. त्येंचही खरंच होतं.तिनं वेळ लावलीच नाही. ती तिथंनं तडक ग्रामपंचायतीच गेली. ग्रामपंचायत उघडीच होती. ग्रामपंचायतीत  ग्रामसेवक साहेबही होतेच.
   " अवो सायब, माझं घर पडूनबी माझं नाव यादीत का नाही? " घाईन आल्यानं धापा टाकतच लक्ष्मीनं विचारलं.
    " हं काय नाव म्हणालात? " ग्रामसेवकांनी आपलं काम करता करता मान वर न करताच निर्विकार चेहऱ्यानं  विचारलं
   " केदारी. केदारी सकपाळ.." लक्ष्मीनं आपल्या नवऱ्याचं नाव सांगितलं.साहेबांनी रजिस्टर काढलं. बराच वेळ नाव शोधलं पण नाव दिसलं नाही.
   "केदारी नावाचं खातेदार कुणी नाही आमच्या रजिस्टरात... " नाव शोधता शोधता साहेब उद्गारले.
लक्ष्मीला आता मात्र धक्काच बसला होता.
     "अवो साहेब माझ्या नवऱ्याचं नाव असायलाच पाहिजे. जरा नीट शोधून बघा की ." लक्ष्मी काकुळतीनं विनंतीच्या सुरात बोलली.
    " घरपट्टी भरलेली पावती आहे का तुमच्याकडे. नाव शोधायला बरं पडल.ती आणा. मग बघू."
    " माझ्याकडं नाही साहेब. आमचं दीरच घरपट्टी भरत्यात.. "
    " मग त्यांच्याकडनं आणा पावती."
     '' हुं साहेब आणतो थांबा मागून '' असं म्हणत जात असतानाच ग्रामपंचायतीचा क्लार्क लक्ष्मण तिथं आला. त्याला बघताच ग्रामसेवक म्हणाले, " लक्ष्मण या मावशी काय म्हणत्यात बघ. "
लक्ष्मण लक्ष्मीकडं बघत म्हणाला,
   " हं बोल लक्ष्मीकाकू. "
   " काय बोलू बाबा.आरं माझं नाव घरं पडलेल्याच्या यादीत न्हायी म्हणून आल्तो." लक्ष्मी  काकूळतीच्या सुरात बोलली.
   " तुझ्या नावावर घर नको काय?खोली विकतानं समजाय नव्हतं? आता विचारायला आलीस ते." लक्ष्मण खेकसल्यासारखच लक्ष्मीवर ओरडला.
    " आरं बाबा कोण विकलंय खोली.. ? कुणास आणि का विकू?'' धक्का बसलेल्या लक्ष्मीनं डोक्याला हात लावत हताश सुरात विचारलं.
     " तूच की आणि कोण? तुझ्या दिराला भरमूला इकाय न्हाईस?. " लक्ष्मणानंच लक्ष्मीला उलट प्रश्न केला.
     " न्हाई बाई. मी न्हाई कधी इकायला.'' लक्ष्मी दचकून म्हणाली.
     " स्टँप हाय आमच्याकडं. भरमूनं दिलाय. झाली सात आठ वर्स. अजून माहिती नाय व्हय तुला. काय इसरलीस एवढया लवकर."
        आता मात्र  लक्ष्मीचं अवसानच गळालं.डोळयांत टचकन पाणी भरलं. घळघळणारं पाणी पदरानं पुसत तोच पदर तोंडावर  घेत ती मटकण खालीच बसली. आपला दीर स्वतःच घरपट्टी भरतो का  म्हणत होता हे आता तिच्या  लक्षात येत होतं. विधवा पेन्शनसाठी सही पाहिजे म्हणून स्टँपवर आपला अंगठा घेऊन गेल्याचं तिला आठवताच पायाखालची जमीन सरकल्याचा तिला भास झाला. स्वतःला सावरत ती उठली. ती काहीच बोलली नाही. आता तिला तिथं थांबावंसही वाटलं नाही. ती ऊठली आणि आपल्या दीराला जाब विचारायचा असा मनात निश्चय करुन तिथंन तावानंच बाहेर पडली. 
         भरमू लक्ष्मीचा मोठा दीर. एकदम बिलंदर. जवळच्याच कारखान्यात हंगामी रोजंदारीवर होता. घरचं सगळं बऱ्यापैकी असुन सुद्धा भरमू मात्र आपल्या आईला कधीच सांभाळत नव्हता.लक्ष्मीच आपली सासु द्वारकाबाईची आपल्या आईसारखीच काळजी घेत होती.सांभाळत होती.आपला दीर आपल्या आईला सांभाळत नसल्याचा राग आधीच तिच्या मनात खदखदच होता. त्यात आता लबाडी करुन आपली खोलीही आपल्या नावावर करुन घेतल्यामुळे लक्ष्मी खुपच संतापली होती. भरमू आता ज्या घरात भाड्यानं रहात होता ती तडक  तिथंच गेली. भरमू कट्टयावरच तंबाखू मळत बसला होता.लक्ष्मीला बघताच त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. मनात राग असुन देखील तो न दाखवता आपल्या डोकीवरचा पदर सावरत लक्ष्मीनं समजूतीच्या सुरात म्हणाली.
   " माझ्या घराच्या घरपट्टीची पावती पायजे व्हती."
   " हाय की.कशा पायजे?" तंबाखू मळतच तिची नजर चूकवत भरमू बोलला.
   " माझं नाव यादीत न्हाई नव्हं. ते घालाय ग्रामसेवक मागत होता. " लक्ष्मी अजूनही आदबीनच बोलत होती.
    " तुला आणि एकटीस कशास पायजे? आमास्नी मिळतंय त्यातलं जरा जरा घे म्हणशील घे " डाव्या हातावर मळलेल्या तंबाखुवर उजव्या हातानं चापटी मारत भरमू म्हणाला.मारलेल्या चापटीने उडालेला तंबाखुचा खाट लक्ष्मीला सहन झाला नाही. तिला ठसका आला.ती खोकतच म्हणाली ,
    " ते धान्यबीन्य नसेना खरं. माझ्या घराचं काय? "
    " घराचं आणि काय?" काहीच माहित नसल्याच्या आविर्भावात भरमू म्हणाला.
    " तुमास्नी आणि काय माहित न्हाई काय?माझ्या खोल्या तुमच्या नावावर करून घेतलीया ते.'' राग आवरत लक्ष्मी बोलली.
    " तुला आणि कशास नावावर खोल्या पायजे. हाय तिथ ऱ्हा की." तंबाकू तोंडात कोंबता कोंबता भरमू बेदरकारपणे म्हणाला.
     " का? मी काय संसार इकून खाल्लाय काय? माझा वंस काय न्हाईसा झालाय? माझी खोली आधी माझ्या नावानं करायची.बाकीचं मला काय  सांगू नकासा." आपल्या दीराच्या बोलण्याचा राग आल्यानं त्याच तावानं ती बोलत होती.
     " न्हाय केलो तर काय करशील?" तंबाकू चोळलेला हात झाडत भरमू जरा गुर्मीतच  बोलला
     " काय करीन म्हणजे? रांडमुंड बाईस फसवून खाणाऱ्यास मी गप्प सोडीन काय.?? लक्ष्मीचे डोळे रागानं गरगर फिरत होते.
    "जा काय करायचं ते कर जा. कुणाकडं जायचं तिकडं जा. कागद माझ्यासारखा हाय." हात उडवत आणि चेहऱ्यावर विकट हास्य आणत भरमूनं लक्ष्मीला बेदखल केलं
     " खरं त्यो कागद खोटा हाय ते जगाला दाखवून देईन.'' भूवया ताणून हात वर करत लक्ष्मी तावानं म्हणाली.
     " खरं तुझा त्याच्यावरचा अंगठा तरी खरा हाय का न्हाई." भरमूच्या तोंडावर छद्मी हास्य तसच होतं.  
       भरमूच्या या लबाडीवर मात्र लक्ष्मीकडं काहीच उत्तर नव्हतं. ती गावात अनेकांकडं तक्रार घेऊन गेली. पण तिला कुठंच थारा मिळाला नाही. प्रत्येक वेळी भरमू पंचगिरी करणाऱ्यांना चहापाणी, पार्टी,पैसे देऊन त्यांची तोंडं बंद करत होता.. पैशापुढं मात्र लक्ष्मीचं काहीएक चालत नव्हतं. एका निराधार विधवेला कुणीच दाद देत नव्हतं.तिचे घर मिळवण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच होते. पण आता एकाकी पडलेली लक्ष्मी मात्र बरीच खचली होती. संतापून स्वतःलाच त्रास करून घेत होती.. 
       आता पाऊस बराच कमी झाला होता.पावसाचा जोर कमी झाला तसं काही दिवसातच पूरही हळूहळू ओसरला होता. आता शासन पातळीवरही युद्धस्तरावर मदतीचं काम सुरु झालं होतं.पुरग्रस्तांना मदत जाहिर झाली होती.ज्यांची नावे पूरग्रस्तांच्या यादीत होती त्यांच्या घरांचं सर्वेक्षण झालं होतं.पंचनामाही झाला होता.पंचनामा होऊन पुरग्रस्तांची नावं निश्चित केली. यादीत नाव असलेल्यांना शासनामार्फत घरकुलं मंजूर होऊन चांगली टुमदार घरं बांधून मिळाली होती.आज याच घरांची वास्तूशांती आणि आमदारांच्या हस्ते हस्तांतरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.एकीकडं कार्यक्रमासाठी धावपळ चालू होती.स्टेज बांधणी,सजावट,डॉल्बी सिस्टिमची जूळना पूर्ण झाली होती.स्वागत, सत्काराची तयारी सुरु होती. दुसरीकडं मात्र कार्यक्रमासाठी मोठ्यानं लावलेल्या डॉल्बीच्या हादरवून सोडणाऱ्या आवाजामुळं लक्ष्मीचा  संताप आणखीनच वाढला होता.डॉल्बीवर प्रल्हाद शिंदेंचं 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो तो ईश्वर' हे भक्ती गीत ऐकून तर तिच्या रागाचा पारा आणखीनच वाढला होता. हे गाणं जणू आपल्याला  डिवचण्यासाठीच लावलंय असं तिला  वाटत होतं. 
   " कसलं कर्म आणि कसलं फळ... " लक्ष्मीला आपला संताप मोकळा करायला गोपाळच्या सुमन शिवाय कोणच नव्हतं. 
      " लांडीलबाडी करणाऱ्यास्नीच चांगलं फळ आणि चांगलं वागणाऱ्यास्नी सजा. असला न्याय देणारा ह्यो देवबी कुठं जाऊन बसला असल बघ की. काय तेचंबी डोळं फुटलंबीटलं काय कुणास ठावूक. अगं, ज्यानं आपल्या आईलासुदीत कधी बघितलं नाही, कधी साधं च्याच पाणी इचारलं नाही तेच्या घराची कशीआयती सोय लावून दिली बघ तेनं. आणि माझं बघ.मला बघ कसं चांगल्या कर्माचं फळ मिळालं ते." लक्ष्मीचा उद्वेग उचंबळून आला.
  " व्हय गं सुमे. मला  या देवानं असं का वाऱ्यावर  सोडलं असल ? मी काय पाप केलं होतं ? या निष्ठूर देवास जराबी कशी दयामाया न्हाई?" लक्ष्मी देवावरचा आपला सारा संताप सुमन समोर काढत होती. इंगळावर फुंकर मारावी आणि इंगळ आग ओकावा तसं सुमनच्या मनातला ही देवाबद्दलचा संताप उफाळून आला होता.
   '' कसली दया येतीय बाई तेला? कुठलां देव आणि कुठलं काय.. ! " कपाळाला हात लावून बसलेली सुमनही आपला देवावरच्या रागाला वाट मोकळी करुन देत होती. " लक्ष्मीआक्का अगं  साध्यासुध्या माणसाची दुनया नव्हं ही. अगं आत्त आमचच बघ की. पोटास चिमटा काढून पै पै गोळा करुन दोन खोल्या बांधाय काढल्या. पैसं कमी पडलं म्हणून कर्ज काढलं. ते रातदिस काम करुन अजून फेडत बसलोय दोघंबी. आणि ह्या कामधंदा न करणाऱ्यांनाच तेवढा कसं आगतीनं पावला बघ तो देव . अगं त्येनला आमच्यासारकं कसलं कर्ज नाय की बिर्ज नाय. कशी चांगली, आयती घरं बांधून मिळाली त्यास्नी. म्हंजे फक्त राबणाऱ्यानी राबायचच खाणाऱ्यानी खायचय?असला कसला म्हणायचा ह्यो देवाचा अजेब न्याव ?"  सरकारी लाभापासुन वंचित रहावं लागलेल्याआणि कर्ज फेडता फेडता नाकेनऊ आलेल्या सुमलाही देवाच्या या अजब न्यायाची चिड रोखता आली नाही.
     " व्हय की. अगं दुसऱ्यांला मिळालं म्हणून मला वाईट वाटत न्हाई; खरं कष्ट करुन,म्हाताऱ्या माणसाची सेवा करणाऱ्या,सत्यानं वागणाऱ्या माझ्यासारख्या रांङमुंडबाईकडं जरा डोळं उघडून बघायचं काय नाही तेनं? काय असं डोळं झाकूनच बसायचं?त्यो देव डोळं झाकून बसला तर बसुदे खरं मीबी बघणारच हाय. त्यो दीर म्हणून घेणारा माझं घर कशी देत नाही ते."  देवाच्या न्यायावरचा विश्वास उडालेल्या लक्ष्मीचा आक्रोश मात्र डॉल्बीच्या दणदणाटात सुमनशिवाय कुणालाच ऐकू येत नव्हता... डॉल्बीवर मात्र सुरेल भक्तीगीत दणक्यात सुरूच होतं.  ' उद्धवा, अजब तुझे सरकार..उद्धवा, अजब तुझे सरकार...!' 

    जयवंत जाधव, कोवाड
    मोबा. 9403463881