शुक्रवार, २४ जुलै, २०२०

कविता - सीमावासी मी मराठी

*सीमावासी मी मराठी*

अरे उठ मराठी माणसा तू
इरादा आपला नेक आहे
अखंड महाराष्ट्र लढ्यासाठी
सारा सीमावासी एक आहे. ॥ धृ॥

अत्याचारपिढीत मराठीची
येऊ दे तुला थोडी कळकळ रे
खारीचा वाटा असावा अशी
उराशी तुझ्या  ठेव तू तळमळ रे
हीच वेळ आली दाखवायची की,
मी या मराठी आईचा लेक आहे.
अखंड महाराष्ट्र लढ्यासाठी
सारा सीमावासी एक आहे. ॥१॥

अबालवृद्ध आणि  युवा,युवती 
सर्वांनीच उभारली चळवळ रे
मराठी द्वेष्ट्यांना भरेल धडकी
नि जागेवरच होईल चळचळ रे
'सीमाप्रश्न संपला'  वाल्गना त्यांची
दाखवून दे ती निव्वळ  फेक आहे.
अखंड महाराष्ट्र लढ्यासाठी
सारा सीमावासी एक आहे. ॥२॥

महाराष्ट्र शासना आता तुझ्या
धोरणात मुळीच नको डळमळ रे
ढाळू नकोस मकराश्रु आणि
नको फक्त दिखावू हळहळ रे
तुझ्या  नेभळटपणामुळेच इथे
'कर नाटकीं'चाच सारा देख आहे.
अखंड महाराष्ट्र लढ्यासाठी
सारा सीमावासी एक आहे. ॥३॥

हात जोडून करतो विनंती
किंवा घालतो तुम्हास गळगळ रे
विसरु नका त्या वेदना आणि
त्या जखमांवरची भळभळ रे
कन्नड आमची मावशी परंतू
'आई मराठीच' भाषा एक आहे.
अखंड महाराष्ट्र लढ्यासाठी
सारा सीमावासी एक आहे.॥४॥

दबलेला आवाज घुमू दे आणि
फुलू दे हास्याची खळखळ रे
मराठीचा जयजयकार आणि
घुमु दे स्वातंत्र्यांचा परिमळ रे
मागे नको आता मराठी माणसा 
इरादा आपला नेक आहे .
अखंड महाराष्ट्र लढ्यासाठी
सारा सीमावासी एक आहे.॥५॥

     © *जयवंत जाधव*, कोवाड
      ता. चंदगड जि. कोल्हापूर
      मोबाईल 9403463881

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा