कवी जयवंत जाधव । कविता कथा साहित्य kavi Jayvant jadhav
बुधवार, ४ फेब्रुवारी, २०२६
सोमवार, १४ जुलै, २०२५
कविता - गडी चंदगडी
(चंदगड तालुका गौरव गीत )
*गडी चंदगडी*
गाजला चंदगड,सजला चंदगड,
मनात चंदगड, जनात चंदगड
जिल्ह्यात राज्यात देशात जगात
चंदगड गाजतोय हा हरघडी
आम्ही चंदगडी , गडी चंदगडी...
चंदगडी चंदगडी चंदगडी
मी चंदगडी चंदगडी चंदगडी
चंदगडी चंदगडी चंदगडी
आम्ही चंदगडी चंदगडी चंदगडी ॥ धृ ॥
चंदगड नगरीत भव्य मंदिर
कलाकुसर आहे किती सुंदर
वसला देव रवळनाथ युगंधर
गर्दहिरवी झाडी भोवताली
कोदाळीस्थित देवी माऊली
भक्तांच्या नवसाला पावली
जागृत दैवत देव वैजनाथ
भक्त जमतो इथे गुणगात
भक्तांच्या डोईवर सदा हात
भजन किर्तनी रममान वारकरी
अध्यात्मिक आम्ही गडी चंदगडी ॥ १ ॥
किटवाड सुंडी धबधबा धवल
स्वप्नवत आहे पाँईट स्वप्नवेल
महाबळेश्वर सिमलाही इथे फेल
ऐतिहासिक कलानिधीगड
स्वराज्यांत गणती गंधर्वगड
राजा महिपाळाचा महिपाळगड
नाव मोठे स्वराज्यात पारगडाचे
वास्तव्य होते इथे शिवरायांचे
वंशज शेलारमामा तानाजीचे
सर्प प्रदर्शनात प्रसिद्ध ढोलगरवाडी
स्वातंत्र्यसेनानी,सैनिक हुतात्मे चंदगडी ॥ २ ॥
पश्चिमपट्टा लाललाल माती
काळी सुपिक जमीन कर्याती
पिकतात धनधान्याचे मोती
तालुक्यात होते वतनदार
हेऱ्याचे सांवत इनामदार
कोवाडकर देसाई सरकार
ज्यांनी त्यांची जमीन कसली
सात बाराला नावे डसली
कुळकायद्याने जनता हसली
उताऱ्यासाठी डायरी केली उघडी
शेतीने समृद्ध आम्ही गडी चंदगडी ॥ ३ ॥
सीमेला खेटली राज्य दोन
शेजारी आहेत जिल्हे तीन
सात तालुके आहेत लागून
कोल्हापूर टाईप खुप बंधारे
धरणे जंगमहट्टी तिलारी जांबरे
कैक ठिकाणी लघु पाटबंधारे
हिरण्यकेशी घटप्रभा ताम्रपर्णी
मार्कंडेय तिलारी नदींचे पाणी
फिरले इथल्या सुपिक रानोरानी
निसर्ग हवापाणी जगात लै भारी
शेतीवाडीत रमतो गडी चंदगडी ॥ ४॥
टपोरे दाणे भाताच्या तुर्यात
ऊस डोलतो कसा कुऱ्यात
असतो एक नंबर उताऱ्यात
वाटाना भुईमूग बिनिस हरभरा
प्रसिद्ध सोले दिडघे नि मसुरा
मिरची गहू मका नाचना साजरा
इथल्या काजूची चव आगळी
पिकली पौष्टीक गोड रताळी
कुठे नारळ कुठे पिकते केळी
आंबे फणस करवंदाची झाडी
रानमेवा चाखतो गडी चंदगडी ॥ ५ ॥
'ओलम','इको'ला खाजगी सवलत
शेतकऱ्यांचाही सहकारी दौलत
तिन्ही कारखाने कसे उभे डौलत
शिनोळी हलकर्णी एमआयडीसी
जुळली नाळ आधुनिक उद्योगाशी
जलविद्युत प्रकल्प तिलारी पायथ्याशी
तेल राईसमील,पोल्ट्री जोरदार
चिकण,काजूफॅक्टरीत रोजगार
आली धवलक्रांती दुधाची धार
विकासात घेतोय आता आघाडी
कष्टकरी उद्योगी गडी चंदगडी ॥६॥
साहित्यात झाले नाव देशभर
पद्मश्री रणजित देसाई स्वामीकार
सिनेनिर्माता दळवी विजयकुमार
पाडूरंग जाधव,पांडूरंग कुंभार
शंकर हदगल,पारु नाईक,केसरकर
साबळे,नामदेव कांबळे,चांदेकर
शि तु गावडे,बी एन,हणमंत, के जे
शिवणगेकर,कोकीतकर,खाडे बिर्जे
एकनाथ तात्यांचाही 'ठोकळा' गाजे
नंदकुमार मोरेंचा प्रबंध 'भाषा चंदगडी'
या कवितेचे कवी जयवंत जाधव चंदगडी ॥ ७ ॥
सुर्यकांत दळवी एक नट थोर
प्रसिद्ध नामदेव निकम शाहीर
विकास 'जलवा' टीव्ही स्टार
इथे मिळते सारे शिक्षण दर्जेदार
घडले क्लासवन अधिकारी फार
खेळाडूही जिद्दी आणि उर्जेदार
वल्लभ नि मनवाडकर राष्ट्रीय विनर
सुरज सिद्धार्थ प्रो कब्बडी स्टार
गोळा फेकीत बेनके किर्तीकुमार
शिवछत्रपती क्रीडा पुरकार पै.नाईक मारुती
महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर चंदगडी ॥ ८ ॥
प्रसिद्ध हाफ चड्डी चंदगडी
डोकीस शोभे टर्कीनची घडी
असा रुबाबदार गडी चंदगडी
नऊवारी साडी चंदगडी कास
गोलमोठा कुंकू कपाळी खास
आता नव्या फॅशनची मिजास
आहे मायेचा ओलावा खोल
असते पाहुणचारालाही मोल
चंदगडी भाषेतील प्रेमळ बोल
सुर पश्चिमेला कोकणी, पूर्वेला कानडी
प्रमाण भाषेतही खुलतो गडी चंदगडी ॥ ९ ॥
नाट्य आणि सांस्कृतिक चळवळ
कामगार,भूमीहीनांचीही कळकळ
तरुण रक्तात राजकारण सळसळं
जेष्ठ,तरुण नेत्यांत मोठी धडाडी
कुठे आघाडी,आहे कुठे बिघाडी
कांही प्रामाणिक,कांहीत लबाडी
आमदार झाले व्हीबी, व्ही.के .
नरसिंगराव पाटील नावाचे दोघे
राजेश आणि शिवाजीराव खमके
मंत्री भरमूआण्णांना लाल दिव्याची गाडी
दर्दी राजकारणी आम्ही गडी चंदगडी ॥ १० ॥
गाजला चंदगड,सजला चंदगड,
मनात चंदगड, जनात चंदगड
जिल्ह्यात राज्यात देशात जगात
चंदगड गाजतोय हा हरघडी
आम्ही चंदगडी
मी गडी चंदगडी
आम्ही चंदगडी
मी गडी चंदगडी
चंदगडी चंदगडी चंदगडी
मी चंदगडी चंदगडी चंदगडी
चंदगडी चंदगडी चंदगडी
आम्ही चंदगडी चंदगडी चंदगडी ॥ धृ ॥
©जयवंत जाधव,कोवाड
ता.चंदगड जि.कोल्हापूर
मोबाईल 9403463881
सोमवार, ७ जुलै, २०२५
कविता - वारी
आली चला वारी
गाठूया पंढरी
भेटूया मुरारी
प्रेमरूपी
रंक आणि राव
चोर आणि साव
सर्वां भक्तीभाव
भरलेला
गळ्यामध्ये माळ
हातामध्ये टाळ
गंधाने कपाळ
सजलेले
भिमा चंद्राकृती
धुवुया विकृती
सत्याची स्विकृती
करण्याला
पाहु सारे संत
सावळा अनंत
मिटतील भ्रांत
मनातील
ऐकू संत उक्ती
वाढो भाव भक्ती
मना मिळो शक्ती
सर्वांच्याच....
_____ जयवंत जाधव, कोवाड
ता चंदगड जि कोल्हापूर
मोबा. ९४०३४६३८८१
ता चंदगड जि कोल्हापूर
मोबा. ९४०३४६३८८१
रविवार, ६ जुलै, २०२५
कोवाड गावची कविता
कोवाड: 🙏🏼🙏🏼"गाव भक्तीगीत "🙏🏼🙏🏼
*महती कोवाड नगरीची*
घडली ताम्रपर्णीच्या मूशीत l वसली टेकडीच्या कुशीत ll
नेहमी नांदते खुशीत l माझी नगरी कोवाडची ॥१॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
ताम्रपर्णीचे पाणी लाल l संथ आहे तिची चाल ll
उजाळले गावचे भाल l कृपा या अमृतजलाची ॥२ ॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
होती इथे इनामदारी l नांदली बारा बलुतेदारी ll
सुखशांती घरोघरी l नोंद असे इतिहासाची ॥३॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
पिक भूईमूग.ऊस,भात l चव इथल्या कडधान्यात ll
सुपिकता काळ्या शेतात l आई बळीराजाची ॥४॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
पूर्वी नदीवर होत्या नावा I मग जुनेधरण बेळगावकडचा दुवा ॥
आता पर्याय पूल नवा | सोय झाली प्रवाशांची ॥५॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
गायरान आहे तळीमाळ l रंगतात इथे विविध खेळ ll
गुरांसोबत बाळगोपाळ l सावली भीम मंदिराची ॥६॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
श्रीरामाचे मंदिर l देखणे खुप सुंदर ll
त्यावर श्रद्धाही अपार l भोळ्या रामभक्तांची ॥७॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
मंदिर मारुती, बसव,कल्लाप्पाचे l जोतिबा,माऊली,विठ्ठलाचे ll
दत्त,सिद्धीविनायकाचे l कृपा दुर्गामाता,लक्ष्मीची ॥८॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
सप्ताह हनुमान जयंतीला l पारायण महाशिवरात्रीला ll
उधान भावभक्तीला l गोडी आहे अध्यात्माची ॥९॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
कलावतीआईं उपासना सुंदर | अनिरुद्धबापूंचा घुमतो गजर ॥
रोज अभंग,भजने मधूर I हरिविठ्ठल भक्तांची ॥१०॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
दसरा, गणपती मोठा सण l नाग,दिवाळीला फराळ छान ll
रामनवमीलाही मान l धमाल इथे उत्सवांची ॥११॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
शिवपुतळ्याचा आम्हा अभिमान l आंबेडकरांचे गुणगान ll
इथे मास्जिदेलाही मान l इथे घृणा जातधर्मभेदाची ॥१२॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
साहित्यिकांची ही खाण l 'स्वामी'चे दिल्लीत झाले गुणगान ll
'श्रीमानयोगी'ही महान ll पद्मश्री रणजितदादांची ॥१३॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
माधवीताईंची प्रित जिथे जडली l
तिथेच 'नाच ग घुमा'ही घडली ll
नारी शक्तीही किती रडली l वाचून सल वेदनांची ॥१४॥
गातो महती कोवाड नगरीची
गुरुजी पांडूरंग कुंभार l लेखनिक अक्षरही सुंदर ll
साहित्यातही त्यांची भर l असे खुप मोलाची ॥१५॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
लेखक जाधव पांडूरंग l गाजली कांदबरी त्यांची 'भोग ll
वक्तृत्वाचा जुळला योग lअसे जाण लेखणीची ॥१६॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
कवी बिर्जे रामदास l नवकवितांचा ध्यास ll
कादंबरी आहे खास l लेखिका पारुताईंची ॥१७॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
गाव आले सिनेमात l आनंद भरला मनात ll
अजूनही अनेकजणात l असे स्मृती भालूची ॥१८॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
इथे आल्या मोठ्या विभूती l पावन झाली इथली माती ll
किती सांगू मी किर्ती l माझ्या या गावाची ॥१९॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
अभिनेते नाना,निळू फुले । मंत्री,साहित्यिकही आले ll
कुमारगंधर्व,वसंतराव गाऊन गेले l आठवण येते त्या दिवसांची ॥२०॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
इथे जूनी नाट्य परंपरा l अभिनयात आहे दरारा ll
लळीतालाही इथे थारा l किर्ती 'आदर्श प्रेक्षकांची'॥२१॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
नेहमी सांस्कृतिक रेलचेल l खेळातही केली कमाल ll
असते कलेतही मोठी धमाल l इथल्या तरुणाईची ॥२२॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
रणजित देसाई ग्रंथालय l आहे शिवनेरी वाचनालय ll
इथल्या बुद्धीचे खाद्यालय | ही श्रीमंती माझ्या गावाची ॥२३॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
चंदगडी बोली गोड I सोबत प्रमाणतेची जोड ॥
नाही तिल कुठे तोड l अशी भाषा अभिमानाची ॥२४॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
श्री हनुमान जूनी तालिम l गजबजून गेले नवे जीम ll
पैलवान जसे बलभीम l इथे उपासना शक्तीची ॥२५॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
कोवाड बाजारपेठ l आहे नाव लई मोठं ll
दर गुरुवारी बाजारहट l सोय साऱ्या कर्यातीची ॥२६॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
प्रसिद्ध इथली पुरीभाजी l पेढे, आम्लेट आणि भज्जी ll
रोज मिळते चायनिज ताजी l रेलचेल नव्या जून्या हॉटेलांची ॥२७॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
डेअरी,पतसंस्था आणि बँका l दोन्ही शेतकरी संघांचा डंका ll
मदत मिळते राव आणि रंका l सोबत सेवा सोसायटीची ॥२८॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
भव्य आरोग्य केंद्राची सेवा । पोलिस ठाण्याचीही हवा ॥
अनुभव एकदा तरी घ्यावा | संकटात मदतीची ॥२९॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
पुढारी इथले सारे कर्तबगार l त्याला धडाडीची आहे धार ll
विकासाची आहे किनार l जाणिव असे कर्तव्याची ॥३०॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
ग्रामपंचायत आहे मस्त l जागरुक इथले ग्रामस्थ ll
सदा कामात व्यस्त ll इथे चर्चा विकासाची ॥ ३१॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥
गावचा आहे मोठा अभिमान l जयवंत जाधव गातो गुणगान ll
ठेऊन लहानमोठ्यांचा मान ll चूकल्यास माफी सर्वांची ॥३२॥
गातो महती कोवाड नगरीची
॥धृ॥
© जयवंत जाधव, कोवाड
ता.चंदगड, जि. कोल्हापूर
मोबाईल 9403463881
कविता - वृद्धत्व
हबकून गेलंय मन
थबकून गेलीय बुद्धी
सावरत नाही तोल
नाही पहिल्या सारखी शुद्धी
पोखरून गेलंय काळीज
खाकरुन गेलाय गळा
सोसवत नाहीत खरंच
आता वृद्धत्वाच्या झळा
जखडून गेलेत पाय
आखडून गेलेत हात
सोबतीला जमले आता
कफ दमा आणि वात
बिचकून गेलोय मी
दचकून गेलीय ती
हेटाळणीशिवाय आता
काहीच नाही हाती
रिचवत नाहीत शिव्या
नि पचवत नाही अन्न
एकाकीच्या भावनेने
मन झाले आहे खिन्न
खिदळत ये रे यमा
उधळत तुझा रेडा
उचलून ने आम्हा
नकोच विलंब थोडा
©जयवंत जाधव,कोवाड
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मोबाईल 9403463881
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)