काहूर
सारं का बदलतंय ? मनी उठलं काहूर ॥ धृ ॥
पै पाहुणे, सगे शेजारी
भरभरुन बोलायचे
मोबाईलमुळे अवघड झाले
तोंड आता खोलायचे
पूर्वी सर्व लोकांचे मस्त जुळायचे सूर
एकमेकांपासून आता खूप चाललेत दूर ॥ १ ॥
वडीलधाऱ्या जाणत्यांना
पूर्वी होता खुपच मान
गुरुंनाही होते एकेकाळी
देवापेक्षाही मोठे स्थान
सारे ते पाहून माझा भरायचा ऊर
सस्काराचा का होतोय आताच चक्काचूर ॥ २ ॥
पूर्वी कधी कव्हती अशी
झटपट लगीनघाई
उभयतांचा स्पर्शही होण्यास
वर्ष दीडवर्ष जाई
पाहतांच एकमेका लाजून होत चूर
ओंगळ आता रित नि जुळत नाहीत सूर ॥ ३ ॥
मैदानी नि ताकदीचे
होते छोटे मोठे खेळ
मोबाईलच्या खेळात सध्या
बरबाद होतोय वेळ
राकट सारे पूर्वी नि होता दमही भरपूर
साध्या थंडी वाऱ्यानेही आता होते कुरकूर ॥ ४ ॥
ज्या त्या ठरल्यावेळीच
पाऊस सर पडायची
आता का अवेळी नि
वेळ येते रजायची ?
नदी, नाले भरुन पूर्वी यायचा महापूर
आता का होत नाहीत कोरडे दुष्काळ दूर ॥ ५ ॥
No comments:
Post a Comment