Friday, July 24, 2020

कविता - महती कोवाड नगरीची

🙏🏼🙏🏼"गाव भक्तीगीत "🙏🏼🙏🏼

*महती कोवाड नगरीची*

घडली ताम्रपर्णीच्या मूशीत l वसली टेकडीच्या कुशीत ll
नेहमी नांदते खुशीत l माझी नगरी कोवाडची ॥१॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

ताम्रपर्णीचे पाणी लाल l संथ आहे तिची चाल ll
उजाळले गावचे भाल l कृपा या अमृतजलाची  ॥२ ॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

होती इथे इनामदारी l नांदली बारा बलुतेदारी ll
सुखशांती घरोघरी l नोंद असे इतिहासाची ॥३॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

पिक भूईमूग.ऊस,भात l चव इथल्या कडधान्यात ll
सुपिकता काळ्या शेतात l आई बळीराजाची ॥४॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

पूर्वी नदीवर होत्या नावा I मग जुनेधरण बेळगावकडचा दुवा ॥
आता पर्याय पूल नवा | सोय झाली प्रवाशांची ॥५॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

गायरान आहे तळीमाळ l रंगतात इथे विविध खेळ ll
गुरांसोबत बाळगोपाळ l सावली भीम मंदिराची ॥६॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

श्रीरामाचे मंदिर l  देखणे खुप सुंदर ll
त्यावर श्रद्धाही अपार l भोळ्या रामभक्तांची ॥७॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

मंदिर मारुती, बसव,कल्लाप्पाचे l जोतिबा,माऊली,विठ्ठलाचे ll
दत्त,सिद्धीविनायकाचे l कृपा दुर्गामाता,लक्ष्मीची ॥८॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

सप्ताह हनुमान जयंतीला l पारायण महाशिवरात्रीला ll
उधान भावभक्तीला l गोडी आहे अध्यात्माची ॥९॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

कलावतीआईं उपासना सुंदर | अनिरुद्धबापूंचा घुमतो गजर ॥
रोज अभंग,भजने मधूर I हरिविठ्ठल भक्तांची ॥१०॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥


दसरा, गणपती मोठा सण l नाग,दिवाळीला फराळ छान ll
रामनवमीलाही मान l धमाल इथे उत्सवांची ॥११॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

शिवपुतळ्याचा आम्हा अभिमान l आंबेडकरांचे गुणगान ll
इथे मास्जिदेलाही मान l इथे घृणा जातधर्मभेदाची ॥१२॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

साहित्यिकांची ही खाण l 'स्वामी'चे दिल्लीत झाले गुणगान ll
'श्रीमानयोगी'ही महान ll पद्मश्री रणजितदादांची ॥१३॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

माधवीताईंची प्रित जिथे जडली l
तिथेच 'नाच ग घुमा'ही घडली ll
नारी शक्तीही किती रडली l वाचून सल वेदनांची ॥१४॥
गातो महती कोवाड नगरीची

गुरुजी पांडूरंग कुंभार l लेखनिक अक्षरही सुंदर ll
साहित्यातही त्यांची भर l असे खुप मोलाची ॥१५॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

लेखक जाधव पांडूरंग l गाजली कांदबरी त्यांची 'भोग  ll
वक्तृत्वाचा जुळला योग lअसे जाण लेखणीची ॥१६॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

कवी बिर्जे रामदास l नवकवितांचा ध्यास ll
कादंबरी आहे खास l लेखिका पारुताईंची ॥१७॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

गाव आले सिनेमात l आनंद भरला मनात ll
अजूनही अनेकजणात l असे स्मृती भालूची ॥१८॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

इथे आल्या मोठ्या विभूती l पावन झाली इथली माती ll
किती सांगू मी किर्ती l माझ्या या गावाची ॥१९॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

अभिनेते नाना,निळू फुले |मंत्री,साहित्यिकही आले ll
कुमारगंधर्व,वसंतराव गाऊन गेले l आठवण येते त्या दिवसांची ॥२०॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

इथे जूनी नाट्य परंपरा l अभिनयात आहे दरारा ll
लळीतालाही इथे थारा l किर्ती 'आदर्श प्रेक्षकांची'॥२१॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

नेहमी सांस्कृतिक रेलचेल l खेळातही केली कमाल ll
असते कलेतही मोठी धमाल l इथल्या तरुणाईची ॥२२॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

रणजित देसाई ग्रंथालय l आहे शिवनेरी वाचनालय ll
इथल्या बुद्धीचे खाद्यालय | ही श्रीमंती माझ्या गावाची ॥२३॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

चंदगडी बोली गोड I सोबत प्रमाणतेची जोड ॥
नाही जिला कुठे तोड l अशी भाषा अभिमानाची ॥२४॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

श्री हनुमान जूनी तालिम l गजबजून गेले नवे जीम ll
पैलवान जसे बलभीम l इथे उपासना शक्तीची  ॥२५॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

कोवाड बाजारपेठ l आहे नाव लई मोठं ll
दर गुरुवारी बाजारहट l सोय साऱ्या कर्यातीची ॥२६॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

प्रसिद्ध इथली पुरीभाजी l पेढे, आम्लेट आणि भज्जी ll
रोज मिळते चायनिज ताजी l सोबत सोय दारु,मटणाची ॥२७॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

डेअरी,पतसंस्था आणि बँका l दोन्ही शेतकरी संघांचा डंका ll
मदत मिळते राव आणि रंका l सोबत सेवा सोसायटीची ॥२८॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

भव्य आरोग्य केंद्राची सेवा । पोलिस ठाण्याचीही हवा ॥
अनुभव एकदा तरी  घ्यावा | संकटात मदतीची ॥२९॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

पुढारी इथले सारे कर्तबगार l त्याला धडाडीची आहे धार ll
विकासाची आहे किनार l जाणिव असे कर्तव्याची ॥३०॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

ग्रामपंचायत आहे मस्त l जागरुक इथले ग्रामस्थ ll
सदा कामात व्यस्त ll इथे चर्चा विकासाची  ॥ ३१॥
गातो महती कोवाड नगरीची ॥धृ॥

गावचा आहे मोठा अभिमान l जयवंत जाधव गातो गुणगान ll
ठेऊन लहानमोठ्यांचा मान ll चूकल्यास माफी सर्वांची ॥३२॥
गातो महती कोवाड नगरीची
 ॥धृ॥

        © जयवंत जाधव, कोवाड
        ता.चंदगड, जि. कोल्हापूर
         मोबाईल 9403463881

No comments:

Post a Comment