Friday, July 24, 2020

कविता - कोरोनाचा धडा

कविता -  कोरोनाचा धडा

माझं माझं म्हणू नको माणसा  
अरे,आता तरी हो तू  जागा
शिकवून गेला धडा 'कोरोना' 
दाखवून गेला आपली जागा ॥ धृ॥

वनराई सारी तोडून टाकून
केली भकास इंच इंच जागा
जल, वायुही प्रदुषित करुनी
केले बेघर प्राणी आणि खगा
      विकास नव्हे ही अधोगतीच
      याची  फळे आता सारे भोगा ॥१॥
      शिकवून गेला धडा कोरोना 
      दाखवून गेला आपली जागा ॥ धृ॥

खुपच कमी आपल्या गरजा
अन्न निवारा आणि वस्त्रधागा
नेट मध्ये हरवली सुख शांती
त्याच्यासाठी होतो संताप त्रागा
     अभासी जगात वावरु नका
     खरे वास्तव जीवन जगा  ॥२॥
     शिकवून गेला धडा कोरोना 
     दाखवून गेला आपली जागा ॥ धृ॥


विसरून गेला सात्विक आहार
विसरला कसरत आणि योगा
फास्टफुडच्या मोहात गुंतून
देतोय निमंत्रण भयानक रोगा
      भारतीय जीवनपद्धतीच भारी
      पाश्चिमात्यांचे अनुकरण त्यागा ॥३॥
      शिकवून गेला धडा कोरोना 
      दाखवून गेला आपली जागा ॥ धृ॥

आई,बाबा,भावंडे त्यागून
तोडला नात्याचा नाजूक धागा 
फोर बीएचके बंगल्यात त्याना
नाही ठेवली चटईएवढीही जागा
     माणूस म्हणून माणसासंगे तुम्ही
     आता तरी माणसासारखे वागा ॥४॥
     शिकवून गेला धडा कोरोना 
     दाखवून गेला आपली जागा ॥ धृ॥

ब्रम्ह,बुद्ध आणि येशु,आल्ला
म्हणे हे तारतात साऱ्या जगा 
डॉक्टर,नर्स,सैनिक,पोलिस
यानी घेतलीय त्यांची जागा
     अरे, कोण येतोय मदतीला
     आता तरी डोळे उघडून बघा ॥५॥
     शिकवून गेला धडा कोरोना 
     दाखवून गेला आपली जागा ॥ धृ॥

माझ्यासारखा मीच अशी
नको मारु फुशारकी उगा
जीवन आपले आळवावरचं पाणी
आणि जसा काट्यावरचा फुगा
       जाणिव ठेवा निसर्गाची या
       आता माणसासारखे वागा  ॥६॥
       शिकवून गेला धडा कोरोना 
       दाखवून गेला आपली जागा ॥ धृ॥     

         जयवंत जाधव, कोवाड
          ता. चंदगड जि. कोल्हापूर
          मोबाईल. 9403463881

No comments:

Post a Comment