Monday, August 10, 2020

कथा - थाट

: कथा
.
.
थाट
.
.

          निदान हे दहावीच वर्ष तरी पूर्ण कर. मी शाळेच काय झालं असेल ते नुकसान देतो. मास्तरांस्नी सांगतो खरं शाळेला जा." देवाप्पाच्या समजावणीचा किसन वर काहीच परिणाम होत नव्हता.
    " मला या शाळेला जायचं नाही म्हणजे नाही.''
     " आरं या शाळेला जायचं न्हायी तर मग दुसरीकडं जा. तिथं दाखला घालूया. खरं शाळेला न्हाई म्हणू नकोस. " देवाप्पा मायेन समजावण्याचा प्रयत्न करत होता.
      "नकोच.मी तुझ्याबरोबर शेताकडं येतो. ढोरं राखतो.  खरं आता मला शाळाच नको." किसनही हट्टाला पेटला होता.
      किसन देवाप्पाचा मुलगा. मुलीच्या पाठीवरचा एकुलता एक म्हणून घरातल्यांचा लाडका. किसननं शाळा सोडली आणि कामधंदा सोडून गावातल्या उनाड पोरां बरोबर बाहेरच हुंदडायला सुरवात केली होती.शाळाही नाही आणि घरातलंही काम नाही.किसनच्या असल्या वागण्यामुळं मात्र देवाप्पाला खुपच काळजी लागून राहिली होती.  'थोडी शाळा शिकला असता म्हणजे बरं झालं असतं.' देवाप्पाच्या डोक्यात सदानकदा किसनचाच विचार.  
       गेला महिनाभर देवाप्पाच कशातच मन लागत नव्हतं. सध्या शेतीचीही काही कामं नव्हती. कधी तरी शेताकडं एक फेरी मारली न मारली असंच.सकाळचं चार म्हशींच दुध काढून डेअरीला घालून दोन गवताचे भारे आणले की झालं. मग दिवसभर वेशीवर वडाखालच्या पारावर बसुन गप्पा मारायला रिकामा.
     वेशीवरचा पार नेहमी दोन चार म्हाताऱ्या माणसांबरोबरच इतर गप्पा मारत बसणाऱ्या, रिकामटेकडया  लोकांनी भरलेला असायचा. सध्या देवाप्पाही जवळ जवळ रोज असायचा. पण आज देवाप्पा एकटाच बसला होता.  संध्याकाळचे सहा वाजून गेले होते.सुर्य मावळतीला झुकला होता. लोकांची वर्दळही थोडी कमी झाली होती. बराच वेळ देवाप्पा शुन्यात नजर लावून तसाच बसला होता. धुरळा उडवत आणि खाडखाड आवाज करत सहाची एसटी नुकतीच आली होती. त्याच गाडीतून उतरुन घराकडे चाललेल्या  रामभाऊला पारावर बसलेला आणि विचारात गढलेला देवाप्पा दिसला. रामभाऊंनं जाता जाता देवाप्पाला हाक मारली.
   "देवाप्पा,असं रे का गप्प गप्प बसलाईस?"
    " आं? काय? '' तंद्री तुटलेला देवाप्पा काचबारुन बोलला.
    "एवढया कसल्या तंद्रीत हैस रे ?" रामभाऊ देवाप्पाकडं बघत हलकंस हसतच विचारलं. रामभाऊच्या प्रश्नानं देवापा भानावर आला. पाय लांब सोडून ऐसपैस बसलेल्या देवाप्पानं एक लांब उसासा सोडला. आपले दोन्ही पाय खाली सोडले आणि कट्टयावरच पुढं सरकून बसला. जांभई देतच आपला उजवा हात आपल्या काळ्यापांढऱ्या बारीक केसाच्या डोक्यावरनं फिरवला. तोच हात शर्टाच्या वरच्या खिशात घातला. खिशातली चुना आणि तंबाखुची पुडी काढली.आपल्या जाड भूवया वर ताणून कपाळावर आठ्या आणल्या आणि परवल्यासारख बोलला,
       " काय सांगू बाबा, पोरानं तर डोकं खाल्लय नुस्त.. कुणाचं एक ऐकना झालंय !"
     " अरे, पोरांची जातच ती.एकदा सांगून ऐकतील ती पोरं कसली? तेंच आणि कशा एवढं मनावर घ्यायलाईस. '' रामभाऊ हातातली बाजार भरलेली पिशवी सावरत म्हणाला.
    " काय बाकीची पोरं न्हाईत काय? काय हे एकटच हाय." देवाप्पा वैतागल्या सुरात बोलला.
     " ते व्हय खरं, एवढं झालं तरी काय  त्याच्यावर वैतागण्यासारखं?"
     " आरं ते शाळेलाच जाईना न्हवं." डबीतला तंबाखु डाव्या हातावर ओतत देवाप्पा म्हणाला.
     " का? जाईल की.. "
     " काय जातंय.डोकं आपटून घेऊन सांगितलं तरी ते काय ऐकना.गावातल्या उंडग्या पोरांतंन फिराय सवाकलय. आता तेला शाळेत कुठली गोडी वाटल. ते शाळेस जाईल असं मला तरी काय वाटत नायी बा." हाताच्या उजव्या अंगठयाच्या नखानं टोकरुन घेतलेला डबीतला चुना  हातातल्या तंबाखुला लावता लावता देवाप्पा  नाराजीच्या सुरात बोलला. 
   " तरी बी समजाऊन सांगूया घे आणि एकदा.. " हातातली पिशवी कट्टयावर ठेऊन देवाप्पानं ठेवलेल्या डबीतला तंबाखु चूना घेत रामभाऊ म्हणाला.
     " तरीबी आत्त ते काय ऐकील असं काय मला वाटत न्हायी.तवा मी काय म्हणतो..." देवाप्पा तोंडात तंबाखु कोंबत जरा संकोचूनच बोलला, " रामू तू गोव्याला शाळा शिकलाईस. बरंच दिवस तिथं ऱ्हायलाईस तवा तुझ्या तिथ वळखी असतीलच की. कुणाची वळखबिळख असेल तर त्या वळखीनं किसनला कुठंतरी कामाबिमाला चिकटीवतस काय बघ.आरं,शाळा न्हाई ते न्हाई. निदान कामधंदा तरी शिकल. "
    " आरं शाळा नायतर मग काम तरी कसलं मिळणार तेला? '' मळलेला तंबाखू तोंडात टाकून उरलेल्या तंबाखुचा हात झटकत रामभाऊ म्हणाला.
    " कुठं तरी दुकानात नायतर  हॉटेलातबिटेलात बघ कुठल्या तरी. तेला आता काय सरकारी नोकरी मिळणार हाय?" देवाप्पा कावून गेल्यासारखं म्हणाला.
    " आरं कामाचं काय लावलाईस. माप कामं हाईत. माझा एक मित्र हाय तिथं  .माझ्या वर्गातलाच हाय. त्येंच मोठं हॉटेल हाय. हॉटेलात  काम मिळल खरं तुझं पोरगं करतंय  काय ते आधी बघाय पायजे."
    " न कराय काय झालंय. तू ये संध्याकाळी जरा आमच्या घराकडं.जरा तूच समजाऊन सांग. बघू तुझं तरी ऐकतय काय ते ."
     " बर, येतोघे नंतर.बघूया कसं ऐकत न्हाई ते." रामभाऊ कट्टयावर ठेवलेली बाजारची पिशवी हातात घेत जाता जाता म्हणाला,
     "बर घराकडे येणार काय इथंच बसणार ?" 
     " व्हय येणार तर. इथं बसुन आणि काय करू? मी बी आत्त घराकडच  चाल्लोतो. दुधाचा येळ झालाय. दुधबी काढाय पायजेच की.''  म्हणत देवाप्पानं पारावरची तंबाखुची डबी खिशात ठेवली आणि रामभाऊबरोबर गप्पा मारत घराकडं निघाला.
      आकाश टिपूर चांदण्यानं भरुन गेलं होतं.चंद्राच्या शुभ्र उजेडात रात्र अगदी दिवसासारखी भासत होती.गावच्या बाहेर रानात घर असलेला रामभाऊ या  पडलेल्या टिपूर उजेडातून  देवाप्पाकडं निघाला होता. देवाप्पाला बोलल्यासारखं आपलं जेवण आटपून रामभाऊ नऊलाच देवाप्पाच्या घरी आला होता..देवाप्पाच्या घरात आताच जेवण चाललं होतं.रामभाऊनं बाहेरुनच देवाप्पाला हाक मारली. हाक ऐकून देवाप्पानं रामभाऊलाच घरात बोलावलं, "रामू ये की. जरा जेव ये."
     "जेव जेव, मी आताच जेऊन आलोय. तू जेवस्तवर मी बसतो बाहेर कट्टयावर. तपकिर लावत.''     खिशातली तपकिरीची डब्बी काढत रामभाऊ म्हणाला.
    '' मग बस बस तर.जेऊन येतोच पाच मिनटात." 
    "ये शिस्तात. काय गडबड न्हायी." डबी खोलत रामभाऊ कट्टयावर बसला.डबीतली तपकिर हातावर ओतून घेतली आणि तपकिर लावत बसला.
      रामभाऊ आणि देवाप्पा अगदी जिवलग मित्र.देवाप्पाचं कुटुंबही अगदी छोटं,चौकोनी आणि बऱ्यापैकी खाऊनपिऊन सुखी होतं .बायको अनुसया, मुलगा किसन आणि मुलगी सरिता.पोटापुरती शेती.शेतीला जोडधंदा म्हणून चार दुधाच्या म्हशी होत्या. सगळं बरं चाललेलं पण 'पोरगं थोडं शिकलं असतं तर बरं झालं असतं' एवढी एकच चुटपुट देवाप्पाच्या मनाला लागली होती. 
    देवाप्पाचं जेवण होईपर्यंत रामभाऊचीही तपकिर लावून संपली होती. देवाप्पा जेऊन बाहेर येताच त्याच्याकडून थोडं पाणी मागून घेतलं. तांब्यातल्या पाण्यानं खळाळा चूळ भरली. उरलेलं पाणी तपकिर घेतलेल्या हातावर ओतून घेतलं. रिकामी तांब्या देवाप्पाकडं दिला. आपल्या खिशातला हातरुमाल काढला. हात,तोंड पुसलं आणि आत येऊन खुर्चीवर बसला. इतक्यात किसनही जेवण आवरुन बाहेर मित्रांकडं जाण्यासाठी बाहेर जात होता. तोच रामभाऊनं किसनला हाक मारली.
     " अरे ए किसना. अरे तुझ्याकडच काम हाय म्हणून आलोय आणि तू कुठं चाललाईस?" 
किसना बाहेर जाता जाता उंबऱ्यावरच थबकला.
        " मग सध्या काय चाललंय तुझं?" रामभाऊनं खोचक स्वरात विचारलं.
      " काही नाही बाहेर मित्रांकडं चाल्लोय." 
       " आरं आत्ताचं नाही विचारत. तुझ्या शाळेबद्दल विचारतोय." रामभाऊनं सरळ मुद्द्यालाच हात घातला.
      शाळेचं नाव काढताच किसन थोडं गडबडला. काहीच न बोलता भूवया ताणत कपाळावर आठ्या आणून  उंबऱ्यावरच अडखळल्यासारखा थांबला.
     रामभाऊचं  बोलणं ऐकून अनुसया जेवणांची ताटं आवरत आतूनच बोलली.
    " बघा जरा तुम्ही तरी सांगून. काय ऐकतंय काय. शाळा सोडून काय करणार हाय कुणास ठाऊक... "
      "हे बघ आत्त झालं ते झालं. आम्ही शाळेत काय सांगायचं ते सांगतो. तू तेची काळजी करु नको. उद्यापास्न तू शाळंला जा."  रामभाऊ किसनला शाळेला जाण्यासाठी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता.
      " अं हं. मी काय शाळेला न्हाई जात आता.'' रामभाऊशी नजर न भिडवता  किसननं नकारार्थी मान हलवली.
      " अरे मग असच उपटसुंब्यासारखं फिरणार काय? " किसनच्या उत्तरानं रामभाऊचा राग एकदम उफाळून आला. पण लगेच रागाचा सुर खाली घेत समजावणीच्या सुरात म्हणाला, "अरे बाबा,शाळेशिवाय जगायचं इथनं पुढ लई अवघड हाय बघ या जगात. शाळा हाय तर सगळं हाय.माझं ऐक. शाना हो.नंतर पश्चाताप करत बसशील. खरं त्यावेळेस आपल्याकडची वेळ निघून गेलेली असल. म्हणून आणखी एकदा जरा थंड डोक्यानं विचार कर. घाईघाईनं काय पण करु नको."
      "मी न्हाई जात." किसन  निश्चयी सुरात बोलला. शाळेला न जाण्याच्या आपल्या शब्दावर तो ठाम होता. किसनचा हा निश्चय बघून देवापा आणि रामभाऊ एकमेकांकडं बघितलं.आता काही इलाज नसल्याचं दोघांच्या चेहऱ्यावरूनच एकमेकांनी ओळखलं होतं. शेवटी नाईलाजानंच रामभाऊनं विचारलं,
       " शाळा न्हाय तर मग कामाला जावं लागल बघ." कामाची भिती दाखवावी म्हणून रामभाऊ बोलला.
    पण किसन काहीच न बोलता पुन्हा तसाच गप्प उभा राहिला.
   " काम नको तर शाळंला जा. आणि शाळा न्हायीच म्हणतोस तर मात्र एक  काम हाय बघ गोव्याला. तिथं कामाला जावं लागल.'' रामभाऊ निर्वाणीच्या सुरात बोलला.
   "गोव्याला? जातो की मग."   गोव्याचं नाव काढताच किसन हरकून म्हणाला.
       " खरं हॉटेलात कपबशा धूवाय लागणार बघ."
कपबशा धुवायचं काम म्हटल्यावर तरी किसन शाळेला जायला तयार होईल म्हणून रामभाऊनं आणखी एक खडा टाकून बघितला. किसन थोडा नाराज झाला पण त्यानं  एक पर्याय ठेवला,
        "हॉटेलात राहतो खरं वेटरचं न्हायतर दुसरं कुठलं तरी काम देत्यात काय बघा की." उंबऱ्यावर उभारलेला किसन आत येत म्हणाला.
        " आरं म्हणून शाळा शिक म्हनतोय. असं हॉटेलात भांडी धुण्यापेक्षा दुसरं कुठलं तरी चांगलं काम मिळालं असतं का न्हायी?" रामभाऊंचा शाळेबद्दलचा अट्टाहास सुरूच होता.
      गोव्याचं नाव काढताच हरकलेला किसन शाळेचं नाव काढताच पुन्हा गप्प झाला.एकंदरीत त्याच्या चेहऱ्यावरुनच आता याला शाळा शिकायचीच नाही याची रामभाऊला खात्रीच झाली.
      " बर आत्त शाळा न्हाई म्हणतोईस तर न्हाई.मग गोव्यात कामाबद्दल तरी नक्की विचारु काय?नंतर आणि न्हाई म्हणशील."
      " न्हाई,जातो की, विचारा." किसननं अगदी आनंदानं होकार दिला. किसनचा होकार ऐकून रामभाऊनं देवापाकडं नजर वळवली. देवाप्पाचाही आता नाइलाज असल्याचं त्याच्या चेहऱ्यावरूनच समजत होतं. देवाप्पाची ती मूक संमतीच समजून रामभाऊ किसनला म्हणाला,
      " बरं मी उद्या फोन करतो. मला न्हाई म्हणनार न्हाई तो. तू दोन चार दिवसात जायची तयारी कर." रामभाऊ खुर्चीवरून उठून जाता जाता म्हणाला,
     "बर देवाप्पा. मी येतो आता. सकाळपास्न लई कंटाळा आलाय. जाऊन आडवं पडतो जरा."
      " बर. ये ये. मी बी जरा टीव्ही बघून आडवं पडतो. "
    रामभाऊ गेला तसं किसनंही मित्रांकडं आनंदानं  पळतच गेला.
     सकाळी रामभाऊनं डेअरीला दुध घातलं.आणि डेअरीकडून येता येताच एसटीडीत गेला. खिशातल्या डायरीतला नंबर शोधला आणि आपला गोव्यातला वर्गमित्र विजयला फोन लावला. फोन लागताच इकडची तिकडची थोडी ख्यालीखुशाली विचारली. बोलता बोलता रामभाऊंनं किसनच्या कामाबद्दल विषय काढला. विजयनं रामभाऊला नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. रामभाऊमुळं किसनच्या कामाचं नक्की झालं होतं.
     रामभाऊच्या शब्दाखातर किसनला आता एका चांगल्या हॉटेलात काम मिळालं होतं. तेही अगदी गोव्या सारख्या त्याच्या आवडत्या ठिकाणी. किसन यापूर्वी एकदा शाळेच्या सहलीतून गोव्याला गेला होता. आणि सध्या गावातली काही पोरंही गोव्यात कामाला होती. त्यांच्याकडूनही तो गोव्याविषयी बरंच ऐकून होता.त्यामुळं किसनला गोव्याचं खुपच आकर्षण वाटत होतं. 
     ओळखीमुळं किसनला जास्त त्रासाचं काम न मिळता थेट किचनमध्ये मदत करायचं काम मिळालं होतं. कुकला बारीकसारीक कामात मदत करायचं, ऑर्डरीप्रमाने प्लेट लावणे यासारख्या कामासोबत हॉटेलसाठी लागणारा किराणा व भाजीपाला खरेदी करायचं कामही मालकांनी किसनवरच सोपवलं होतं. आपल्या मनासारखं काम मिळाल्यामुळे किसनही आता  खुश होता. तो मन लावून काम करत होता.एक दोन वर्षात  मालकाचाही किसनवर चांगलाच विश्वास बसला होता. या एकदोन वर्षात मालकाच्या विश्वासाला तडा जाईल असं तो कधी वागला नव्हता. पण एक दिवस विजयच्या आलेल्या फोननं रामभाऊला धक्काच बसला,
     "अरे रामभाऊ तुझा माणूस एकदम लोफर निघाला ना.. "
     '' का?काय झालं? काय केलं त्यानं?" नेमकं काय झालं हे न समजल्यामुळं रामभाऊचा चेहरा प्रश्नार्थक झाला.
     " अरे काय सांगायचं. विश्वासानं त्याला मी किचनचा कारभार त्याच्यावर सोपवला होता पण तो तर अफराताफर करायला लागला ना." तक्रारीच्या सुरात विजय सांगत होता.
      " म्हणजे? मला नाही समजलं "
      " अरे हा किसन बाजार करताना माल कमी आणून दर जास्त दाखऊन पैसे काढत होता.पण ज्यांच्याकडून माल घ्यायचा ते आमच्या संबंधीतच आहेत. त्यानीच त्याची ही चलाखी सांगितली म्हणून कळली आम्हाला.''
   विजयच्या म्हणण्यावर रामभाऊला मात्र काहीच बोलता आलं नव्हतं. इतक्या विश्वासानं आपल्या शब्दाखातर विजयनं कामावर  ठेऊन घेतलं होतं. पण किसनच्या या वागण्यामुळं रामभाऊला वाईट वाटलं. किसनमुळं त्याला खजिल व्हावं लागलं होतं. रामभाऊ गप्पच झालेला बघून विजयच म्हणाला.
   " मी त्याला उद्यापासुन येऊ नको म्हणून सांगितलय... " विजयनं आपला निर्णय सांगितला.
   " अरे विजू तसं करु नको. मी त्याच्याशी बोलतो. हवं तर तू त्याला पैशांचं, व्यवहाराचं काम सोडून बाहेरचं कायतरी काम लाव पण कामावरुन काढू नको. त्याचे आई बाबा बिचारे खुप चांगले आहे. या नालायकालाच कशी काय दूर्बूद्धी सुचली  कुणास ठाऊक. "
    " हो ना रे.अरे त्याला मी तुझ्या भरवशावरच ठेवलं होतं. ''
    " एकदा मी त्याच्या वतीनं माफी मागतो. पण त्याच्या आई बाबाकडं बघून एक वेळ ठेव.मी त्याला समजावतो. "
  " अरे तू कशाला माफी मागतोस त्याच्यासाठी?बरं असु दे.तुझ्या शब्दा खातर पुन्हा एकदा ठेवीन त्याला पण हॉटेलात नाही.आमच्या बीचवरील कस्टमरना सर्विस द्यायच्या कामावर ठेवीन." 
   "कुठं पण ठेव खरं ठेव."
     " हो रे. हुशार आहे म्हणून किती विश्वासानं त्याच्याकडं महत्वाचं काम दिलेलं. पण तो असं करायला लागला ना. मग काय करणार? "
     " मी बोलतो त्याला.एवढी वेळ सांभाळून घे. "
     "'बरं . तू काय तितका मनाला लावून घेऊ नकोस. बघू ठेवून एकदा... बर, ते असू दे.. तुझं कसं काय चाललंय..?? "
       " काय नाही.. नेहमीचच शेती, गुरेढोरं सांभाळायचं. आपलं रोजचच रुटीन "  रामभाऊ हसतच म्हणाला..
     " मग येना एक दिवस फॅमिलीसह. रोजच्या रुटीनपेक्षा कधीतरी एक दिवस वेगळं जीवन जगायचं ना रे. "
" हो रे पण गुरं आणि शेतीच्या कामातून वेळच मिळत नाही. "
   " कामातून एक दिवस सवड काढून ये .. अरे प्रत्येक्ष भेटून खुप दिवस झाले. फक्त फोनवरुन बोलनं नको.. "
    "बघू. एकदा नक्की येतो."
    " हा ये ये. नक्की ये. बर, त्या तुझ्या माणसाला येवढं समजून सांग बरं. "
    " हा सांगतो त्याला. ''
    " बर बर. ठेऊ आता..? "
    '' हां हां ठेव. .. "
    "  चल बाय.. "
   मालकाचं हिशेबातील दुर्लक्षाचा गैरफायदा घ्यायची हाव किसनला रोखता आली नव्हती. कमी माल आणून जादाचा दर लावणं आता त्याच्या नित्याचं झालं होतं.पण त्याला लागलेली ही चटक खुप दिवस चालली नव्हती.तीन चार महिन्यातच ती उघडकीस आली होती.
      किसनला त्याच्या या असल्या करामतीमुळं त्याला आता हॉटेलमार्फतच कलंगुट बीच वर हॉटेलच्या कस्टमरना सर्विस द्यायचं काम करावं लागत होतं. पण किसनला हे काम किचनपेक्षा चांगलंच वाटत होतं.
     कलगुंट गोव्यातलं एक सुंदर ठिकाण. किनाऱ्यावर देशी,विदेशी पर्यटकांची  रेलचेल. रंगीबेरंगी मोठ्या छत्र्यांखाली असलेल्या बेड व आरामखुर्च्यावर सुर्याची किरण घेत पहुडलेले तोकड्या कपडयांतील गेारे पर्यटक. अशा या विदेशी स्त्री पुरुषाकडं डोळे विस्फारुन आणि कुतूहलानं पाहणाऱ्या आपल्या भारतीय पर्यटकांच्या नजरा.किनाऱ्यावर पसरलेली मऊ,मुलायम आणि सोनरी, पिवळसर वाळू. दूरवर पसरलेलं निळंशार खारं पाणी. आणि त्यावर फेसाळत येणाऱ्या शुभ्र लाटा. 
   अशा या सुंदर आणि आल्हाददायक वातावरणात  किसन आता बराच रुळला होता.किसनला गोव्याचे खारं दमट हवामान आणि खाणं, पिणं चांगलंच मानवलं होतं.आधीच उंचपुरा, देखणा आणि गोऱ्या रंगाचा असणारा किसन तर आता एखाद्या हिरोसारखाच दिसत होता.गेले तीन चार वर्ष बीचवर काम करत असलेला किसन इंग्रजीही बऱ्यापैकी बोलायला शिकला होता. हॉटेल मॅनेजरनी नेमून दिलेल्या विदेशी पर्यटकाना सर्विस द्यायचं काम तो चोख बजावत होता. मॅनेजमेंटच्या सुचनेनुसार त्यांना हवं नको ते पाहत होता.गेल्या तीन चार वर्षात अशा कितीतरी नाना तऱ्हेच्या, स्वभावाच्या  विदेशी स्त्री पुरुष पर्यटकाना आपली सेवा दिली होती. पण त्यातही त्याला जेनी मात्र इतरांपेक्षा जरा वेगळीच वाटली होती.
         जेनी पोर्तुगालची असली तरी तिची चालढाल,रंगरुप थोडं भारतीयच वाटत होतं. त्याला कारणही तसंच होतं.खरं तर जेनीची आजी मूळची गोव्याचीच.घरच्यांचा विरोध झुगारुन एका पोर्तूगिज अधिकाऱ्याबरोबर प्रेमविवाह केला होता. पण गोवा मुक्तीच्या वेळी जेनिफरच्या आजीला  आपल्या  पतीबरोबर पोर्तगालला जाणं भाग पडलं होतं. तेंव्हापासुन घरच्यांनी तिच्याशी आणि तिनं घरच्यांशी कधी संपर्क केला नव्हता. आज कित्येक वर्षानं जेनी अगदी ठरवून आपल्या आजीच्या गावी आली होती.आजी सध्या हयात नव्हती पण आजीनं गोव्या विषयी सांगितलेल्या गोष्टी,आठवणी अजून ताज्या होत्या..आजीनं शिकवलेले कांही कोकणी शब्दही ती अजून विसरली नव्हती.गोव्यात आल्यापासुन तर जेनी आवडीने आणि जाणिवपूर्वक काही कोकणी शब्द वापरण्याचा प्रयत्न करत होती. किसनलाही ती कोकणी भाषाच बोलण्यासाठी आग्रह धरत होती.आजीमुळं तिला भारताविषयी आणि गोव्या विषयी खुपच आकर्षण वाटत होतं. आजीनं सांगितलेल्या आठवणी आपल्या डोळ्यांनी बघताना तिचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. प्रत्येक भारतीय गोष्टीत तिला आपलेपणा वाटत होता. तिला भारताविषयी  अभिमान वाटत होता.आपल्या आजीचं सौंदर्य थोड्याअंशी का होईना पण आपल्यातही उतरल्याचा तिला आनंद वाटत होता. ती आपल्या आजी विषयी, तिनं सांगितलेल्या आठवणींविषयी किसन बरोबर भरभरून बोलत होती. किसनकडूनही 
भारत आणि गोव्याविषयी माहिती जाणून घेत होती. यामुळं गेल्या सातआठ दिवसात दोघांची खुपच मैत्री जमली होती. मनानं दोघंही  एकमेकांच्या खुपच जवळ आले होते.जेनीला तर किसन सोबत राहणं खुप आनंददायी वाटत होतं. किसनलाही तिचा मनमोकळा, निखळ स्वभाव खुप भावला होता. त्यांच्या मनात एकमेकांविषयी ओढ असली तरी त्यांनी मात्र तसं त्यानी एकमेकांना कधी जाणवू दिलं नव्हतं. जेनी किसन  बरोबर गाईडपेक्षाही एक मित्र म्हणूनच जवळीकतेनं वागत होती.तिने किसन सोबत  जवळ जवळ पंधरा वीस दिवसात वेगवेगळ्या चर्च, म्युझियमना भेट दिली होती. वेगवेगळ्या बीचवर पॅरा सेलिंग, डॉल्फिन टूर्स, वॉटर स्पोर्टसच्या थ्रीलचा आनंद लुटला होता., गोवन फुडचा आस्वाद चाखला होता. गोव्यातील शॉपिंग एन्जॉय केला होता.गोव्यातले किसन सोबतचे दिवस किती भर्रकन निघून गेले हे तिला समजलच नव्हतं.
      आज जेनीचा गोव्यातला शेवटचाच दिवस होता. उद्याच्या फ्लाईटनं ती पोर्तुगालला जायचं होतं. परत जाण्याच्या कल्पनेनं दोघांचंही मन अस्वस्थ झालं होतं. हळवं झालं होतं. दोघंही आज खुपच नाराज दिसत होते. नेहमीच उत्साहानं उसळ्या घेणाऱ्या लाटा आज अगदी संथ आणि उदास भासत होत्या.वरकरणी उत्साह, चैतन्य दाखवण्यासाठी त्या लाटा उगाचच मोठ्यानं घोंघावत उसळ्या घेत आहेत असं त्याना वाटत होतं. खळखळणाऱ्या समुद्रासारखी नेहमी बडबड करणारी  जेनी आज मात्र  बेडवर  गप्पच पहुडलेली होती.जेनीच्या बाजूला बसलेल्या किसनची अस्वस्थता लपत नव्हती.काय बोलांव दोघांनाही सुचत नव्हतं.जेनी आणि किसन दोघंही दुर आणि धुसर क्षितिजाआड लपू पाहणाऱ्या सुर्याकडं एकटक नजर लावून बसले होते. लालभडक सुर्याला हा अथांग निळाशार सागर आपल्या पोटात सामावून घेतानाचं विहंगम दृष्य पाहत होते. सुर्याच्या तेजामुळं नेहमी चमचमणाऱ्या पाण्याचं तेजही आता सुर्य मावळल्यामुळं कमी झालं होतं.सुर्य अस्ताला गेला असला तरी त्याचं अस्तित्व मात्र मावळतीकडच्या आकाशात पसरलेल्या केशरी रंगाच्या रुपानं बराच उशिर टिकून होतं. नेहमीच निळं भासणारं आकाश,पाणी, आणि सारं वातावरणजणू केशरी रंगानं न्हाऊन निघालं होतं. काही वेळानं तोही रंग गडद होत अंधारलेल्या क्षितिजाआड गडप झाला होता.
       किसन इतक्या पर्यटकांच्या सहवासात राहिला पण जेनीला निरोप देण्यासाठी विमानतळावर आलेला किसन आजच्या इतका भाऊक कधीच झाला नव्हता. निरोप देताना दोघांच्या सुरातला कातरपणा स्पष्ट जाणवत होता. आता जायची वेळ आली होती.नको वाटत असलेली पण प्लेन सुटायची वेळ झाल्याची सूचना झाली. सुचना ऐकताच बराच वेळ किसनकडं एकटक पाहणाऱ्या जेनीनं अचानक किसनचा हात हातात घेतला आणि आवेगान आपल्या गुलाबी ओठांची मोहोर किसनच्या गोऱ्या आणि गोबऱ्या गालावर उमटवली. तिला आपल्या भावना रोखता आल्या नव्हत्या. पण किसन क्षणभर गडबडला,अचानक घडलेल्या घटनेनं त्याचं सारं अंग शहारलं.ओलसर, मऊ आणि ऊबदार ओठांचा स्पर्श किसनला कितीतरी सुखद वाटला. पण अगदी क्षणभरच. कारण या सुखद अनुभवातून भानावर येईस्तोवर एव्हाना जेनी प्लेनकडं घाईनं निघालीही होती. जाता जाता तिनं एकदा मागं वळून पाहिलं. तिच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. घाईने जाता जाता तिची पावलं एकाएकी जड झाली . तिच्या डोळ्यांतील आसवं पाहताच किसनही चलबिचल आणि अस्वस्थ झाला. त्या अवस्थेतही त्यानं हसत निरोप देण्याचा प्रयत्न केला. जेनी विमानात गेली तसं किसन आणखीनच अस्वस्थ झाला.विनानानं टेक ऑफ घेत आकाशात झेप घेतली तसं एक दिर्घ सुस्कारा सोडला आणि विमनस्क मनानं विमान दृष्टीआड होईपर्यंत कितीतरी वेळ एक टक पहातच राहिला.
       जेनी जाऊन दोन तीन आठवडे उलटून गेले होते. काही दिवस जेनीच्या अस्वस्थ करणाऱ्या आठवणी  विसरुन किसन आपल्या रोजच्या कामाला लागला होता. अचानक एक दिवस  हॉटेलच्या नंबरवर जेनीचा किसनसाठी फोन आला. बिचवर कामावर असलेल्या किसनला फोनसाठी मॅनेजरनी निरोप पाठवला. निरोप ऐकताच किसन जवळ जवळ धावतच हॉटेलकडं आला होता. जेनीन सांगितलेल्या वेळेत जेनीच्या येणाऱ्या फोनची उत्कंठतेनं वाट पाहत होता. आता आपल्याला  जेनीबरोबर बोलायचं आहे या कल्पनेनं मन कांही क्षण हुरहुरलं होतं. उत्सुकता ताणली होती. उत्कंठा लागून राहिलेल्या फोनची जशी वाजली रिंग  तसं  त्यानं चटकन कानाला रिसिव्हर लावला.उल्हासीत चेहऱ्यानं किसन बोलत होता.बोलता बोलता जेनीनं किसनला फोनवर दिलेल्या लग्नाच्या आणि पोर्तुगालला येण्यासाठी दिलेल्या अनपेक्षित ऑफरने मात्र तो अक्षरशः उडालाच. त्याच्या चेहऱ्यावर एकदम आनंद आणि आश्चर्य यांचं मिश्रण  पसरलं. जेनीनं केलेल्या प्रपोजमुळं किसनचे हात एकाएकी थरथरले, हाताचे तळवे घामेजले, आवाज एकाएकी घोगरा झाला. त्याला काय बोलावे तेच कळेना.त्याला स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. क्षणभर मनाची चलबिचल झाली. थोडा गडबडला पण लगेच स्वतःला सावरत त्यानं मागचा पुढचा विचार न करता सरळ होकार देऊन टाकला. होकार देताना त्याच्या सुरात जाणवणारा कंप तो थांबवू शकला नव्हता.
     जेनीचा फोन आल्यापासुन किसनला आता जणू हवेत तरंगत असल्याचा भास होत होता. किसननं पोर्तुगालला जायचा निश्चय तर केला होता. पण त्याला आता आईबाबांची संमती घ्यायची होती त्यांची समजूत घालायची होती. त्याला आता गावाकडं जाणं भाग होतं.त्यानं वेळ लावताच नाही. त्यानं गावाकडं जायची तयारी केली. किसन गावाकडं आला पण आपण परदेशात जाणार हे आईबाबांना सांगायचं कसं?रात्री जेवण करता करता संधी साधून किसननं आपला निर्णय कचरतच सांगितला.किसनचा हा निर्णय ऐकताच देवाप्पाच्या गळ्यातला घास गळयातच अडकल्यासारखा झाला. आईचा तोंडापर्यंत आलेला घास परत ताटात आला. किसन काय म्हणतोय यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिनं पुन्हा एकदा विचारलं.
      " काय म्हणलास? "
      " व्हय, मला जेंनी बरोबर लग्न करुन परदेशात जायचं हाय. "
        " आरं पण.. " देवापाला काहीच बोलता येईना.
        " बाबा, शाळा शिकून माणसं परदेशात नोकरीस जात्यातच की.मला शाळा न शिकता जायला मिळतंय. "
       " आरं त्यांचं वेगळं. तू तिकडी लग्न करुन घेतल्यावर आमच इकडं काय होणार याचा इचार केलास काय? " देवाप्पाची जेवणावरची वासना उडाली.देवाप्पानं भरलं ताट तसचं ठेऊन न्हाणीत जाऊन हातावर पाणी घेतलं. बहिण सरिता तर भावाच्या तोंडाकडच पाहत बसली. किसनला तिच्या घाबरलेल्या नजरेला नजर देता आली नव्हती. किसनची आई तर हादरुनच गेली होती. तिनं ही जेवणाचं ताट तसच ठेवलं.देवाप्पा आणि आईनं केवीलवान्या सुरात आम्हाला सोडून न जाण्यासाठी कितीतरी गळ घातली.
   " आरं ती ओळखीची ना पाळखीची. त्या परदेशी मुलखांत तुला फसवलंबिसवलं म्हणजे? " रामभाऊ आणि मित्रांनीही समजाऊन पाहिलं पण किसनच्या मनावर काहीएक परिणाम होत नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर फक्त जेनी आणि जेनी होती.
     शेवटी सर्वांचाच नाईलाज झाला. जड अंतःकरणानं होकार दिल्याशिवाय देवाप्पा आणि अनुसयासमोर पर्यायच नव्हता. परवानगी मिळताच किसननं जायची तयारी सुरू केली.जेनीनं पाठवलेल्या पैशातून त्यानं पासपोर्ट काढला. फ्लाईटच तिकीट बुक केलं.आणि एक दिवस गोव्याला आणि आपल्या माणसांना निरोप देत जेनीनं दिलेल्या पत्त्यावर पोर्तूगालला जाण्यासाठी  आकाशात उंच झेप घेतली.
     पोर्तूगालला गेलेला किसन जवळ जवळ आज दहा आकरा वर्षानी परतत होता. आपल्या माणसांच्या, गावच्या ओढीनं त्याला पुन्हा आपल्या मायदेशी खेचून आणलं होतं.जेनी बरोबर लग्न करून जेनीच्या बिझनेसला मदत करत तो तिथं आनंदानं राहत होता. असं असलं तरी आईबाबांना मात्र विसरला नव्हता. तो तिथूनच बाबांच्या खात्यावर पैसे पाठवून वेळोवेळी अर्थिक मदत करत होता. मध्यंतरी बहिण सरीताच्या लग्नाला, घर बांधण्यासाठीही पैसे पाठवले होते. असं असलं तरी त्याला गावची, मित्रांची आठवण  त्याला गप्प बसु देत नव्हती. प्रत्यक्ष भेटीशिवाय त्याचं समाधान होणं शक्यच नव्हतं.
     म्हणून जेनी आणि आपल्या आठ वर्षाचा मुलगा रोहनला घेऊन किसन फ्लाईटनं थेट गोव्यात उतरला होता. ज्या हॉटेलमुळं आपलं आयुष्य बदललं त्या हॉटेलचा मालक विजयला आणि हॉटेलमधल्या सहकाऱ्याना भेटण्याची ओढ त्याला रोखू शकत नव्हती. त्यानं  सर्वाची आनंदान भेट घेतली. काही वेळ त्यांच्या सोबत जुन्या आठवणी आणि गप्पात रंगला.
       आता त्याला गावाला जायची उत्कंठा लागली होती. मन आतूर झालं होतं. त्यानं सहकाऱ्यांचा निरोप घेतला. जेनी आणि रोहनला सोबत घेतलं.गावाला जाण्यासाठी तिथलीच एक भाड्याची टॅक्सी बुक केली. सोबत आणलेलं साहित्य डिक्कीत भरलं. जेनी आणि रोहन आत बसताच किसननं टॅक्सीचा ताबा घेतला. त्यानं सरळ गावाकडचा मार्ग धरला. गावी जाताना त्याला गेल्या दहा वर्षात झालेले कितीतरी बदल अगदी प्रकर्षानं दिसत होते.आपला भाग पून्हा पून्हा डोळे भरुन न्याहाळत होता.आपण पुन्हा आपल्या गावी जातोय या कल्पनेनं त्याचं मन हर्षून गेलं होतं. गाव जवळ येईल तसं त्याला आपलं गाव,आई बाबा, बहिण, मित्रांचे चेहरे डोळयांसमोर तरळू लागले. त्याना भेटायची त्याला हुरहुर लागली होती. त्याना भेटण्याचं स्वप्न रंगवता रंगवता गाव कधी आलं हे त्याला कळलंच नाही.टेकडी उतरुन खाली आलं की सुरवातीलाच हायस्कूलच दर्शन व्हायच.गावच्या थोडं बाहेर आणि वाटेवर असलेल्या शाळेच्या इमारतीनंच गाव सुरु होतं. समोर आपली शाळा दिसताच किसननं टॅक्सीचा वेग कमी केला. काही वेळ गाडी तिथंच थांबवली. शाळेची अगदीच दुरावस्था झाली होती.आधीच बाकलेला थाट अजूनच बाकल्यासारखा दिसत होता. शाळेकडं पाहताच  मागच्या सर्व आठवणी क्षणात सर्रकण डोळ्यासमोर आल्या तसं स्वतःच गालातल्या गालात हसला. हसता हसता डोळ्यांच्या कडा कधी ओल्या झाल्या त्याचं त्यालाच कळलं नाही.किसनच्या भावना जेनी आणि रोहनला कळणं शक्यच नव्हतं. किसननं त्याच अवस्थेत त्यानं टॅक्सी स्टार्ट केली आणि घरच्या दिशेनं वळवली.
       आज आपला मुलगा येणार म्हणून आई घरात अधिरतेनं वाट पाहत होती. सरिताही आपला भाऊ येणार म्हणून सासरहून दोन दिवस आधीच आली होती.
        किसननं टॅक्सी दारासमोर लावली आणि हॉर्न वाजवला. हॉर्न ऐकून देवाप्पानं बाहेर डोकावून पाहिलं. तो आपला किसनंच असल्याच देवाप्पानं ओळखलं. त्यानं चूलीजवळ बसलेल्या अनुसयाला सांगितलं. किसन म्हणताच ती लगबगीनं बाहेर आली. किसन बॅगा घेऊन आत येतच होता. किसनला बघताच आई आवेगानं किसकडं धावतच आली. लहान मुलाचे पापे घ्यावे तसे मटामटा गालाचे पापे घेतले. मायेनं हालावर हात फिरवला.नकळत तिचे डोळे भरुन आले.किसनला आईच्या मायेनं फिरवलेल्या हाताच्या स्पर्शाने एकदम भडभडू आले. हातातल्या बॅगा हातातनं केंहाच खाली पडल्या होत्या. किसनचे हातही आईला अलगत बिलगले. त्याची नजर बाजूलाच थांबलेल्या बाबांकडं गेली.आईच्या मिठीतून सुटका करून घेत किसननं बाबांना कडकडून मिठी मारली. दादाला बघून सरिताला आपले अश्रु रोखता आले नाहीत. तिनं आपल्या काखेतलं मूल खाली ठेवलं आणि भावाच्या मिठीत शिरली. बाबा, भाऊ आणि बहीण यांची एकच मिठी झाली होती.आईही अगदी कौतुकांनं पाहत होती.या प्रेमाच्या बरसातीत मात्र जेनी आणि रोहनकडं कुणाचचं लक्ष नव्हत. मात्र हे दोघंही आई बाबा आणि मुलाचं ओसंडून जाणारं प्रेम अनुभवत होते.जेनी आणि रोहन बाहेरच उभे होते. ते दोघे बाहेरच असलेले पाहून किसननं त्याना आत बोलवलं. कुणी कुणाला कधीच पाहिलं नव्हतं तरी कुणाला कुणाची ओळख करुन द्यायची कुणालाच गरज भासली नाही. प्रत्यक्ष कधी एकमेकाला पाहिलं नसलं तरी फोनवर अनेकवेळा बोलणं झालं होतं. त्यामुळं सर्वाना एकमेकांची ओळख व्हायला काहीच अडचण आली नव्हती.
       बऱ्याच दिवसानं आल्यामुळं गावात,घरात झालेले बदल किसनच्या नजरेतून सुटले नव्हते. गावात जसा बदल झाला तसं माणसांत झालेला बदलही त्याच्या नजरेतून सुटला नव्हता.आई बाबा थकलेले दिसत होते. सरिताही आता बरीच पोक्त बाई दिसत होती. जसा माणसात बदल दिसत होता तसा घरातही बराच फरक वाटत होता. आपल्या जुन्या घरांच्या जागी नवीन घरं उभारली होतं. किसननं पाठवून दिलेल्या पैशातून देवाप्पानंही चांगलं छानसं घर बांधून घेतलं होतं. बांधलेलं घर किसन कौतुकानं पहात होता. छोटंस,कौलारू पण छान घर. चौकटी, दारं, भिंती अगदी रेखीव.घर निरखून बघता बघता किसनच घराच्या थाटाकडं लक्ष गेलं. अगदी कुठ सुताचाही  फरक दिसणार नाही.अशा सुंदर थाटाकडं लक्ष जाताच  त्याला आपल्या हायस्कुल शाळेचा मोडकळीस आलेला थाट नजरेसमोर आला.शाळेचा बाकलेला थाट आठवताच थोडा अस्वस्थ झाला.मनात काहीतरी निश्चय करुन तो देवाप्पाजवळ आला. देवापा म्हशीना गवत घालत होता.
    " बाबा,आपल्या घराचा थाट कुणी बनवलाय? ''
    " सुतारच्या नाम्यानं बनिवलाय."  म्हशी समोर गवताची पेंडी टाकता टाकता देवाप्पानं सांगितलं.
    "नाम्यानं?'' किसनला आश्चर्य वाटलं.सुतारचा नाम्या किसनच्याच वर्गातला मित्र. अभ्यासात जेमतेम असलेल्या नाम्यानं हा थाट बनवलाय याचं त्याला कौतूक वाटलं.नाम्याचं नाव घेताच त्याला नाम्याबरोबरच शाळेतल्या अनेक मित्रांचे चेहरे, त्यांच्यासोबत केलेल्या करामती,आठवणी डोळ्यास समोर चमकल्या.
          " बाबा नाम्या गावातच असतोय. "
         "व्हय. कुठं आणि जातोय तो दुसरीकडं.गेला असलं कामावर कुठंतरी. येईल संध्याकाळी."
किसनला साऱ्या मित्रांना केव्हा एकदा भेटतोय असं झालं होत. किसननं दुपारी थोडी विश्रांती घेतली आणि मित्रांना भेटायचं म्हणून तो बाहेर पडला. जेनी आणि रोहन अजून झोपले होते.किसन पहिल्यांदा नाम्याकडंच गेला.नाम्या दारात लाकूड रंध्यानं  तासत बसला होता.किसन नाम्याला बऱ्याच दिवसानं पहात होता. खाली मान घालून रंधा मारत असलेल्या नाम्याला कुणीतरी आल्याची चाहूल लागली तसं त्यानं मान वर केली. पाहिल्यांदा त्याला ओळखता आलं नाही. त्यानं थोडं निरखून बघितल. बघतो तर काय किसन..! किसनला पाहताच नाम्यानं हातातला रंधा तिथंच टाकला आणि किसनकडं धावतच आला. नाम्याला बघताच किसननंही कडकडून मिठीत घेतलं.  आपला लंगोटी यार खुप दिवसानी भेटल्याचा चेहऱ्यावरचा आनंद दोघांनाही लपवता येत नव्हता.नाम्यानं किसनला घरात घेऊन गेला. घरात असलेल्या आपल्या बायकोला चहा ठेवण्यासाठी फर्मान सोडलं.
     चहा होईपर्यंत दोघं मित्र जुन्या आठवणीत हरवून गेले. जणू पुन्हा एकदा दोघांमध्ये शालेय जीवन शिरलं होतं. शाळेत केलेल्या खोड्या, आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. तेच खळखळतं हास्य पुन्हा ओसंडून वाहत होतं. दोघांनाही कशाचच भान नव्हतं. बोलता बोलता किसनच्या शाळेच्या शेवटच्या दिवसाची करामत आठवली नसती तरच नवल. ज्या कारणामुळं किसनला शाळा सोडावी लागली तो प्रसंग आठवताच किसन गंभीर झाल्यासारखा झाला. किसनला आपल्या मनातला निश्चय नाम्याला सांगायचा होता.
     "नाम्या, आपल्या अजानतेपनानं का होईना पण.नको त्या चुका झाल्यात हे खरं. पण आता मला त्याची भरपाई करायची हाय. पण मला आता तुझी मदत पायजे "
     " अरे हे काय बोलणं झालं?तुला काय मदत पायजे ती फक्त सांग. गरिब असलो तरी बसल्या जागी लाखं रुपय गोळा करीन."
      " तू पैशाची काय काळजी करु नको खरं मी सांगतो ते काम मी पोर्तुगालला जायच्या आत करायचं. "
     " करतो खरं काय सांग तरी आधी."
      " हे बघ... "  म्हणत किसननं नाम्याला आपल्या मनातलं काम सांगितलं. नाम्यालाही ते एकदम पसंद पडलं. नाम्यानंही अगदी आनंदात आठ दिवसातच काम संपवलं.
      किसननं शाळेसाठी केलेल्या कामाची कृतज्ञता म्हणून आज शाळेनं किसनच्या सत्कार आयोजित केला होता. या सत्कार कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, शाळा संस्था अध्यक्ष आणि मान्यवरांना बोलवलं होतं. किसन सोबत जेनी, रोहन, देवाप्पा आणि किसनची आई सुद्धा आली होती. नाम्या त्याचे मित्रही आले होते.
      गोंगाट करणाऱ्या मुलांना शांत बसवत मुख्याध्यापक सत्काराचा उद्देश सांगण्यासाठी उभे राहिले. सर्वांच स्वागत करुन मूळ विषयाला हात घातला,
     "खरं तर विश्वास बसत नाही की ज्या मुलानं दहावीच्या सहामाही परिक्षेच्या प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी त्या ज्या वर्गात ठेवल्या होत्या त्या वर्गाची कौलं काढून,थाट मोडून पेपर फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी शाळेचा थाट मोडल्यानं त्याची करामत उघडकीस आली. यामुळं आपल्याला शिक्षा होईल या क्षुल्लक कारणानं ज्याला शाळा अर्धवट सोडावी लागली त्याच विद्यार्थ्याला आज आपल्या शाळेची करुणा वाटते. आपल्या शाळेकडं  वळून बघावसं वाटतं. शाळेचं रुप बदलावसं वाटतं. ही खरच एक चांगली आणि कौतूकाची गोष्ट आहे. त्याच्या हातून त्यावेळी अजाणतेपणानं चूक झालीही असेल पण ती चुक सुधारण्याचं प्रत्येकाला जमतंच असं नाही. पण किसनंन ते करुन दाखवलं. त्यानं आमच्या शाळेच्या चारही खोल्यांचा मोडकळीस आलेला थाट नवीन बनवून दिला.शाळेची रंगरंगोटी करुन दिली.आज बऱ्याच दिवसानं आमच्या शाळेचं रुप बदललं ते फक्त किसनमुळं. किसनसारखे मागं वळून बघणारे विद्यार्थी तयार व्हावेत, आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही आज हा छोटासा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.आमच्या संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते त्याचा आता आम्ही शाल, श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करीत आहोत."
मुख्याध्यापक सरांच्या या गुणगानामुळं किसनला भरुन आलं. देवाप्पा आणि आईलाही आनंद झाला. जेनी आणि रोहननंही विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात आपल्याही टाळ्याचा आवाज मिळवला.
      आपल्या शाळेतील  सत्कारानं भारावून गेलेल्या किसनंला मात्र आपल्या या छोट्या का होईना पण केलेल्या कामानं कृतकृत झाल्यासारखं वाटत होतं. त्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचा आणि या सत्कार कार्यक्रमाचा थाट शाळेच्या नवीन थाटाइतकाच उठून दिसत होता....


   जयवंत जाधव, कोवाड
    ता.चंदगड जि कोल्हापूर
   ९४०३४६३८८१

No comments:

Post a Comment