कथा..
देवाचा न्याय
पावसाचा जोर वाढतच होता. गेले दोन महिने पावसाची अखंड सुरु असलेली बरसात अजूनही सुरुच होती. सर्व नद्या,नाले ओहोळ .तलाव, धरणं अगदी ओथंबून वाहत होती.नद्यांनी तर आपली पातळी केंहाच ओलांडली होती. नदीच पाणी साऱ्या शेतशिवारात पसरलं होतं. पाऊस तर थांबायचं नाव घेत नव्हता.नदीकाठच्या गावातील लोकांची मात्र खुपच तारांबळ उडाली होती.
चिंचेवाडी सुद्धा असंच नदीच्या काठावर वसलेलं सुंदर टुमदार गाव.गावाजवळून वाहणाऱ्या नदीमुळं गावाला एक वेगळाच बाज आणि सौंदर्य प्राप्त झालं होतं. गावाजवळच असलेल्या नदीवरच्या बंधाऱ्यामुळं नदीला बारमाही पाण्याचं वरदान लाभलं होतं. बंधाऱ्यामुळं साठलेल्या नितळ व शांत पाण्यात डोकावणारी गावची लख्ख छबी तर बघत बसावं अशीच. शेतीसाठी, पिण्यासाठी नेहमीच पाणी पुरवणारी नदी पोहणाऱ्यांसाठीही तितकाच भरभरून आनंद देत होती. नदी कोरडी पडली असं बहुदा कधी घडलंच नव्हतं. पण प्रत्येक पावसाळ्यात एक दोनदा पुराचा अनुभव हमखास द्यायची. दरवर्षी पुर यायचा पण सहसा कधी कुणाचं नुकसान केलेलं कुणाला माहितच नव्हतं.अशा या आपल्या सुंदर नदीबद्द्लचा अभिमान गावातल्या प्रत्येकाच्या मनामनात नदीतल्या पाण्यासारखाच अगदी तुडूंब भरला होता.
यावर्षी पुरानं मात्र आपल्या नेहमीच्या पातळीपेक्षा बरीच उंची गाठली होती.बंधाऱ्यावरुन पाणी ओसंडून वाहत होतं. काही पाणी नदीकाठा जवळून गेलेल्या रस्त्यावरही पसरलं होतं. रस्त्यावरच्या आणि बंधाऱ्यावरच्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यात खेळण्याचा,चालण्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या मुलांबाळांसह अनेकजण बंधाऱ्यावर येत होते. शाळेतली मुलं बंधाऱ्यावर आणि रस्त्यावर आलेलं पाणी एकमेकांवर उडवत भिजण्याचा आनंद घेत होती.तरुणांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता.
नेहमी एक दोन दिवसात उतरणारं पाणी या वर्षी मात्र तीन चार दिवस झाले तरी कमी होत नव्हतं. सुरवातीला पुराचा आनंद घेणाऱ्या लोकांच्या मनात मात्र आता पुराच्या सतत वाढणाऱ्या पाण्यासारखीच भितीही वाढत होती. घरांपासुन काठावरच्या पाणी अगदी लांब वाटत होतं.पण भरभर वाढणारं पुराचं पाणी पायऱ्यापर्यंत येऊन कधी थडकलं हे समजलच नव्हतं. घरं,पिकं पाण्याखाली जात असलेली पाहुन अनेकांच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट पसरलं होतं.घरात, दारात,चौकात फक्त आणि फक्त पुराबाबतच चर्चा होत होत्या.जाणतीजूणती बाया माणसं पूराच्या आपल्या मागच्या आठवणी ताज्या करत होती.
'' आमच्या आधी कधी एकदा आसा पूर आल्ता म्हणं बघा."
" मला कळतंय तवापास्न मी तरी एवढा पुर कधी बघाय न्हायी बाबा .''
एक ना अनेक आठवणी. या वर्षाचा पूर किती भयंकर आहे हे त्यांच्या बोलण्यातून समजून येत होतं.पुरानं तर खरोखरच अगदी आक्राळविक्राळ रूप धारण केलं होतं. नजर टाकावी तिकडं फक्त पाणीच पाणी दिसत होतं. पाऊस तर उसंत घ्यायला अजिबात तयार नव्हता. नदीकाठावरच्या घरातील लोकं पाणी आज कमी होईल उद्या कमी होईल या आशेवर बसली होती.मात्र सतत वाढणाऱ्या पुराच्या पाण्यानं त्यांच्या तोंडावरचं पाणी केव्हाच पळवलं होतं. संध्याकाळपर्यंत पायऱ्यावर असणारं पाणी रात्रीच अनेकाच्या घरात शिरलं होतं. अचानक घरात आलेल्या पाण्यानं तर अक्षरशः सर्वांचीच झोप उडवली होती.दिवसभर पाण्यात खेळणाऱ्या चिमूकल्यांचेही चेहरे घाबरुन इवलेसे झाले होते. घरातल्या सामानाची आवराआवर करता करता लहानमोठ्यांची धांदल उडाली होती.कांहीनी आपल्या घरातलं सगळं साहित्य माळ्यावर काढून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्यांचे माळे नव्हते त्यांची परिस्थिती तर खुपच केविलवाणी झाली होती.आपत्कालीन खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीनं शाळा आणि देवळात जागा मोकळी करुन दिली होती.आदल्या दिवशी तशा सुचनाही दिल्या होत्या. पण एक काय दोन ? अशा कितीतरी घरांत पाणी शिरलं होतं. आता एकदमच इतक्या लोकांची ऐनवेळी कुठं सोय करायची? सर्वानाच मोठा प्रश्न पडला होता.ज्याची आपापल्या भाऊबंदाच्या किंवा इतर संबंधिताच्यात सोय होती ते सकाळपर्यंत पाणी कमी होईल या आशेनं अंगावरच्या कपडयावरच बाहेर पडले होते. त्यांच्या घरांत तात्पूरता आसरा घेतला होता. ज्यांची सोय नव्हती त्यांना गावच्या शाळा, मंदिराशिवाय पर्याय नव्हता. यात लहान मुलाना मौज वाटत असली तरी मोठया आणि म्हाताऱ्या माणसांची मात्र यात खुपच ओढाताण झाली होती. इतरांसारखच लक्ष्मीही यातून सुटली नव्हती.
निदाकाठावर घर असलेल्यांत लक्ष्मीही होती. लक्ष्मी खुप खुप तर चाळीस पंचेचाळीशीतली विधवा. ती आपल्या वाटणीला आलेल्या दोन खोल्यांत रहात होती. तिच्या सोबतीला म्हातारी आणि आजारी सासू होती. लहान लहान खोल्यांतला दोघींचा छोटासा फाटका तुटका संसार. लक्ष्मीच्या नशिबी ऐन तारुण्यातच वैधव्य वाट्याला आलं होतं. एका पोरींना जन्माला घालून तिचा नवरा केदारीनं दारुच्या नादात जगाचा निरोप घेतला होता. कमवता धनी नको त्या वयात जग सोडून गेल्यामुळं घराची सगळी जबाबदारी लक्ष्मीवरच पडली होती. सासुबरोबरच आपल्या लहानग्या मुलीला सांभाळण्यासाठी लक्ष्मीनं खुप कष्ट उपसले होते. मोलमजूरी बरोबरच परंपरेनं चालत आलेला झाडू बनवायच्या धंद्यानं तिला साथ दिली होती. झाडूसाठी लागणाऱ्या रानातल्या शिंदीच्या झाडाच्या झावळ्या तोडून आणून त्यापासुन झाडू तयार करायची.तयार झालेले झाडू ती डोकीवर घेऊन खेडोपाडी जाऊन विकायची. आलेल्या पैशातून आपला संसारगाडा हाकायची. हे सारं लक्ष्मीच्या अंगवळणी पडलं होतं. गावातल्या पुरुषांनाही लाजवेल असं ती राबत होती.आपल्या शेजाऱ्यासारखं कामधंदा न करता ऐतं बसुन खाणं, चैनीत राहणं तिला कधी जमलंच नव्हतं. आणि तसं तिला ते परवडणारंही नव्हतं
लक्ष्मीच्या वागण्यातही कधी वावगेपणा डोकावला नव्हता.डोक्यावरचा पदर कधी ढळू न देणारी लक्ष्मी नेहमी सर्वांशी मिळून मिसळून रहायची. पण तिला कधी वावगं खपत नव्हतं.स्वभावानं अतिशय प्रामाणिक पण त्यापेक्षाही जास्त भोळी होती. .लक्ष्मीच्या भोळेपणाचा गैरफायदा मात्र शेजारच्या भाऊबंदानी अनेकवेळा घेतला होता.तिच्याकडून ऊसनवारी घेतलेले किरकोळ पैसे कित्येक वेळा बुडवले होते. असं असलं तरी लक्ष्मीनं मात्र कुणाशी वाद घातला नव्हता. आपलं काम कधी थांबवलं नव्हतं.बाईं माणूस असुन सुद्धा आपल्या वयस्क व आजारी सासूला सांभाळत तिनं आपल्या एकूलत्या एक मुलीचं लग्न लावून दिलं होतं. लेकीचंही आता बऱ्यापैकी चाललं होतं. पण अनेक वादळं झेलत कष्टानं दिवस कंठणाऱ्या लक्ष्मीसमोर मात्र या पूराच्या रुपानं नवीनच संकट ठाकलं होतं.
गेल्या चार दिवसात महापुरानं अनेक घराना पाण्यानं वेढलं होतं. कित्येक घरांना तर आपल्यात सामावून घेतलं होतं. कधीकाळी बांधलेल्या जून्या रद्द्याच्या घराच्या मातीतला कस आणि चिकटपणा नाहीसा झाला होता. त्यामुळं ही माती पुराच्या पाण्यात मिठासारखी विरघळून गेली होती. फक्त गोपाळचं गेल्याच वर्षी बांधलेल्या दोन सोप्यांचं घर सोडलं तर काठावरची जवळजवळ सर्वच घरं जमीनदोस्त झाली होती. पुराच्या या पाण्यामुळं लक्ष्मीसारख्याच अनेकांच्या संसारावर अक्षरशः पाणी फेरलं होतं.
घरापर्यंत पाणी येईल पण इतकं येईल हे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हतं.अजूनपर्यंत इतकं पाणी कधीच आलं नाही आणि आता कसं येईल?या भ्रमात ज्यांनी सारं साहित्य तसच टाकून पुराच्या भितीने रात्रीच घर सोडलं होतं.निवाऱ्यासाठी जिकडं तिकडं विखुरले होते त्या लोकांना आपली घरं पडल्याची बातमी सकाळीसकाळीच समजली होती. ही बातमी कानावर पडताच त्यांनी आपल्या घरांकडं धाव घेतली होती.पुराच्या पाण्यानं घरांना पूर्ण वेढलं होतं. घरं कसली फक्त घरांची छप्परच दिसत होती. वेढलेल्या पाण्यामुळं धड घराकडंही जाता येत नव्हतं. मात्र घराची झालेली दुरावस्था स्पष्ट दिसत होती. भिंतिखाली घरातली भांडीकुंडी, अंथरुन पांघरून, टीव्ही, कपाटं सारं काही गडप झालं होतं. लांबूनच आपला बुडालेला संसार पाहून बायाबापड्यांचा एकच आक्रोश सुरु झाला होता. त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू आणि झालेलं नुकसान पाहून बघणाऱ्यांची मनं मात्र हेलावून जात होती.लक्ष्मीनं तर पुराच्या पाण्याची तमा न करता आपला ऊर बडवून घेत आपल्या पडलेल्या घराकडं धाव घेतली. शेजारच्या गोपाळनं घाईनं पाण्यात जात तिला अडवलं आणि बाहेर ओढत आणलं. पण काळीज पिळवटून टाकणारा तिचा आक्रोश मात्र काही केल्या थांबवू शकला नाही.
" आता जगून काय करू रे देवा. माझी सगळी भांडीकुंडी, धान्य, अंथरून सगळा संसार धूऊन गेला गं...पैपै गोळा करून उभा केल्ला संसार कसा काय न्हायनिप्पत झाला ग माझ्या आई." लक्ष्मीसारखाच आक्रोश प्रत्येक घरातल्या बाया माणसांचा सुरु झाला होता. अनेकांची तर वाचाच बसल्यासारखी झाली होती.पोराबाळांच्या डोळ्यात डबडबून पाणी भरलं होतं.भांडया कुंडयाबरोबर पोटाला चिमटा काढून ठेवलेले लक्ष्मीचे तीन चार हजार रुपयेही पडलेल्या भिंतीत गाडून गेले होते.
" कुणीतरी माझे पैसे काढून देवा गं.. " लक्ष्मीची आर्तता काळीज चिरुन जाणारी होती.आता एवढया पाण्यात पैसे शोधायचं कसं? बघायला येणारे जाणारे मात्र पडलेली घरं आणि आर्त आक्रोश बघून हळहळण्याशिवाय काहीच करु शकत नव्हते.
निम्मं गांव पाण्याखाली गेलं होतं. वीस पंचवीस घरांनी तर अक्षरशः जलसमाधी घेतली होती.या विध्वंसकारी प्रलयाची बातमी प्रत्येक न्युजचॅनेलवर महाराष्ट्र आणि देशभर पसरली होती.पूरग्रस्तांचा आक्रोश टीव्हीवरुन महाराष्ट्रातील घराघरांत घूमू लागला होता. ऐकणाऱ्यांच्या काळजाचं पाणी होतं होतं. या पुराच्या संकटानं मात्र एक गोष्ट प्रकर्षानं पुढं आली होती. या पुरानं माणसातली माणूसकी जागी केली होती. 'आजची तरुण पोरं काय कामाची नाहीत' म्हणणाऱ्यांची बोलती बंद होईल असं तरुण राबत होते. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तरुणांबरोबरच अनेक हात पुढे येत होते.. गावातील अनेक मंडळं मदतीसाठी पुढं सरसावत होती.बेघर झालेल्या पुरग्रस्ताना जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य,कडधान्य जमा करुन वाटप होऊ लागलं. पूर ओसरताच गावच्या मंडळाबरोबरच बाहेरच्या अनेक समाजसेवी संस्था, औद्योगिक कंपन्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. भांडीकुंडी, अंथरूनपांघरून, धनधान्य, तयार जेवणाचे पॅकबंद डबे याबरोबरच आर्थिक मदतचाही ओघ सुरू झाला होता. रोज कुणा ना कुणाची मदत येत होती.आलेली मदत ज्या त्या वेळी वाटप होत होती. मदत घेणाऱ्यांच्या रांगा वाढू लागल्या.पूरग्रस्त असलेले आणि नसलेलेही रांगेत दिसु लागले. मदतीची माहिती वेळीच मिळत नसल्यामुळं विखुरलेले खरे लाभार्थी मात्र बाजूलाच राहू लागले होते.
दिवसेंदिवस अनेक ठिकाणाहून वेगवेगळ्या रुपात मदतीचा ओघ येतच होता. जसजसा मदतीचा ओघ वाढत गेला तसा मदत वाटपातील घोळाचं प्रमाणही वाढत गेलं. ढापाढापीची कुजबुज सुरु झाली. नंतर नंतर तर उघड तक्रारही सुरु झाली होती. शेवटी ग्रामपंचायतीच्या मदतीनं खऱ्या लाभार्थींची यादी केली गेली.ज्यांची घरं पडलीत आणि ग्रामपंचायतीत ज्यांच्या नावावर घराची नोंद आहे अशांचीच एक यादी तयार केली होती.
पूरग्रस्तांच्या या नवीन यादीत मात्र लक्ष्मीचं नाव आलंच नव्हतं. त्यामुळं आतापर्यंत मिळत होती तशी मदत लक्ष्मीला मिळेनांशी झाली होती. मदतीसाठीच्या रांगेतून तिला बाहेर काढण्यात येऊ लागलं. आता मात्र लक्ष्मी चांगलीच बिथरली होती.
" माझं घर पडूनबी मला मला का मदत देईनासा?" रागासरशी लक्ष्मी मदत वाटप करणाऱ्यांसोबत भांडू लागली.
" वहिणी, तुझं नाव यादीत न्हाय. तुझ्या नावावर घर न्हाय."
" घर न्हाय? मग मी काय इतकं दिवस काय मसणात ऱ्हाईत हुतो काय..?
" आत्त आमी तरी काय सांगणार? ग्रामपंचायतीत चौकशी कर जा की. यादीत नाव का न्हाई ते.आमच्या बरोबर कशाला वाद घालत बसलियास?" यादीनुसार वाटप करणारे समजावून सांगत होते. त्येंचही खरंच होतं.तिनं वेळ लावलीच नाही. ती तिथंनं तडक ग्रामपंचायतीच गेली. ग्रामपंचायत उघडीच होती. ग्रामपंचायतीत ग्रामसेवक साहेबही होतेच.
" अवो सायब, माझं घर पडूनबी माझं नाव यादीत का नाही? " घाईन आल्यानं धापा टाकतच लक्ष्मीनं विचारलं.
" हं काय नाव म्हणालात? " ग्रामसेवकांनी आपलं काम करता करता मान वर न करताच निर्विकार चेहऱ्यानं विचारलं
" केदारी. केदारी सकपाळ.." लक्ष्मीनं आपल्या नवऱ्याचं नाव सांगितलं.साहेबांनी रजिस्टर काढलं. बराच वेळ नाव शोधलं पण नाव दिसलं नाही.
"केदारी नावाचं खातेदार कुणी नाही आमच्या रजिस्टरात... " नाव शोधता शोधता साहेब उद्गारले.
लक्ष्मीला आता मात्र धक्काच बसला होता.
"अवो साहेब माझ्या नवऱ्याचं नाव असायलाच पाहिजे. जरा नीट शोधून बघा की ." लक्ष्मी काकुळतीनं विनंतीच्या सुरात बोलली.
" घरपट्टी भरलेली पावती आहे का तुमच्याकडे. नाव शोधायला बरं पडल.ती आणा. मग बघू."
" माझ्याकडं नाही साहेब. आमचं दीरच घरपट्टी भरत्यात.. "
" मग त्यांच्याकडनं आणा पावती."
'' हुं साहेब आणतो थांबा मागून '' असं म्हणत जात असतानाच ग्रामपंचायतीचा क्लार्क लक्ष्मण तिथं आला. त्याला बघताच ग्रामसेवक म्हणाले, " लक्ष्मण या मावशी काय म्हणत्यात बघ. "
लक्ष्मण लक्ष्मीकडं बघत म्हणाला,
" हं बोल लक्ष्मीकाकू. "
" काय बोलू बाबा.आरं माझं नाव घरं पडलेल्याच्या यादीत न्हायी म्हणून आल्तो." लक्ष्मी काकूळतीच्या सुरात बोलली.
" तुझ्या नावावर घर नको काय?खोली विकतानं समजाय नव्हतं? आता विचारायला आलीस ते." लक्ष्मण खेकसल्यासारखच लक्ष्मीवर ओरडला.
" आरं बाबा कोण विकलंय खोली.. ? कुणास आणि का विकू?'' धक्का बसलेल्या लक्ष्मीनं डोक्याला हात लावत हताश सुरात विचारलं.
" तूच की आणि कोण? तुझ्या दिराला भरमूला इकाय न्हाईस?. " लक्ष्मणानंच लक्ष्मीला उलट प्रश्न केला.
" न्हाई बाई. मी न्हाई कधी इकायला.'' लक्ष्मी दचकून म्हणाली.
" स्टँप हाय आमच्याकडं. भरमूनं दिलाय. झाली सात आठ वर्स. अजून माहिती नाय व्हय तुला. काय इसरलीस एवढया लवकर."
आता मात्र लक्ष्मीचं अवसानच गळालं.डोळयांत टचकन पाणी भरलं. घळघळणारं पाणी पदरानं पुसत तोच पदर तोंडावर घेत ती मटकण खालीच बसली. आपला दीर स्वतःच घरपट्टी भरतो का म्हणत होता हे आता तिच्या लक्षात येत होतं. विधवा पेन्शनसाठी सही पाहिजे म्हणून स्टँपवर आपला अंगठा घेऊन गेल्याचं तिला आठवताच पायाखालची जमीन सरकल्याचा तिला भास झाला. स्वतःला सावरत ती उठली. ती काहीच बोलली नाही. आता तिला तिथं थांबावंसही वाटलं नाही. ती ऊठली आणि आपल्या दीराला जाब विचारायचा असा मनात निश्चय करुन तिथंन तावानंच बाहेर पडली.
भरमू लक्ष्मीचा मोठा दीर. एकदम बिलंदर. जवळच्याच कारखान्यात हंगामी रोजंदारीवर होता. घरचं सगळं बऱ्यापैकी असुन सुद्धा भरमू मात्र आपल्या आईला कधीच सांभाळत नव्हता.लक्ष्मीच आपली सासु द्वारकाबाईची आपल्या आईसारखीच काळजी घेत होती.सांभाळत होती.आपला दीर आपल्या आईला सांभाळत नसल्याचा राग आधीच तिच्या मनात खदखदच होता. त्यात आता लबाडी करुन आपली खोलीही आपल्या नावावर करुन घेतल्यामुळे लक्ष्मी खुपच संतापली होती. भरमू आता ज्या घरात भाड्यानं रहात होता ती तडक तिथंच गेली. भरमू कट्टयावरच तंबाखू मळत बसला होता.लक्ष्मीला बघताच त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. मनात राग असुन देखील तो न दाखवता आपल्या डोकीवरचा पदर सावरत लक्ष्मीनं समजूतीच्या सुरात म्हणाली.
" माझ्या घराच्या घरपट्टीची पावती पायजे व्हती."
" हाय की.कशा पायजे?" तंबाखू मळतच तिची नजर चूकवत भरमू बोलला.
" माझं नाव यादीत न्हाई नव्हं. ते घालाय ग्रामसेवक मागत होता. " लक्ष्मी अजूनही आदबीनच बोलत होती.
" तुला आणि एकटीस कशास पायजे? आमास्नी मिळतंय त्यातलं जरा जरा घे म्हणशील घे " डाव्या हातावर मळलेल्या तंबाखुवर उजव्या हातानं चापटी मारत भरमू म्हणाला.मारलेल्या चापटीने उडालेला तंबाखुचा खाट लक्ष्मीला सहन झाला नाही. तिला ठसका आला.ती खोकतच म्हणाली ,
" ते धान्यबीन्य नसेना खरं. माझ्या घराचं काय? "
" घराचं आणि काय?" काहीच माहित नसल्याच्या आविर्भावात भरमू म्हणाला.
" तुमास्नी आणि काय माहित न्हाई काय?माझ्या खोल्या तुमच्या नावावर करून घेतलीया ते.'' राग आवरत लक्ष्मी बोलली.
" तुला आणि कशास नावावर खोल्या पायजे. हाय तिथ ऱ्हा की." तंबाकू तोंडात कोंबता कोंबता भरमू बेदरकारपणे म्हणाला.
" का? मी काय संसार इकून खाल्लाय काय? माझा वंस काय न्हाईसा झालाय? माझी खोली आधी माझ्या नावानं करायची.बाकीचं मला काय सांगू नकासा." आपल्या दीराच्या बोलण्याचा राग आल्यानं त्याच तावानं ती बोलत होती.
" न्हाय केलो तर काय करशील?" तंबाकू चोळलेला हात झाडत भरमू जरा गुर्मीतच बोलला
" काय करीन म्हणजे? रांडमुंड बाईस फसवून खाणाऱ्यास मी गप्प सोडीन काय.?? लक्ष्मीचे डोळे रागानं गरगर फिरत होते.
"जा काय करायचं ते कर जा. कुणाकडं जायचं तिकडं जा. कागद माझ्यासारखा हाय." हात उडवत आणि चेहऱ्यावर विकट हास्य आणत भरमूनं लक्ष्मीला बेदखल केलं
" खरं त्यो कागद खोटा हाय ते जगाला दाखवून देईन.'' भूवया ताणून हात वर करत लक्ष्मी तावानं म्हणाली.
" खरं तुझा त्याच्यावरचा अंगठा तरी खरा हाय का न्हाई." भरमूच्या तोंडावर छद्मी हास्य तसच होतं.
भरमूच्या या लबाडीवर मात्र लक्ष्मीकडं काहीच उत्तर नव्हतं. ती गावात अनेकांकडं तक्रार घेऊन गेली. पण तिला कुठंच थारा मिळाला नाही. प्रत्येक वेळी भरमू पंचगिरी करणाऱ्यांना चहापाणी, पार्टी,पैसे देऊन त्यांची तोंडं बंद करत होता.. पैशापुढं मात्र लक्ष्मीचं काहीएक चालत नव्हतं. एका निराधार विधवेला कुणीच दाद देत नव्हतं.तिचे घर मिळवण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच होते. पण आता एकाकी पडलेली लक्ष्मी मात्र बरीच खचली होती. संतापून स्वतःलाच त्रास करून घेत होती..
आता पाऊस बराच कमी झाला होता.पावसाचा जोर कमी झाला तसं काही दिवसातच पूरही हळूहळू ओसरला होता. आता शासन पातळीवरही युद्धस्तरावर मदतीचं काम सुरु झालं होतं.पुरग्रस्तांना मदत जाहिर झाली होती.ज्यांची नावे पूरग्रस्तांच्या यादीत होती त्यांच्या घरांचं सर्वेक्षण झालं होतं.पंचनामाही झाला होता.पंचनामा होऊन पुरग्रस्तांची नावं निश्चित केली. यादीत नाव असलेल्यांना शासनामार्फत घरकुलं मंजूर होऊन चांगली टुमदार घरं बांधून मिळाली होती.आज याच घरांची वास्तूशांती आणि आमदारांच्या हस्ते हस्तांतरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.एकीकडं कार्यक्रमासाठी धावपळ चालू होती.स्टेज बांधणी,सजावट,डॉल्बी सिस्टिमची जूळना पूर्ण झाली होती.स्वागत, सत्काराची तयारी सुरु होती. दुसरीकडं मात्र कार्यक्रमासाठी मोठ्यानं लावलेल्या डॉल्बीच्या हादरवून सोडणाऱ्या आवाजामुळं लक्ष्मीचा संताप आणखीनच वाढला होता.डॉल्बीवर प्रल्हाद शिंदेंचं 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो तो ईश्वर' हे भक्ती गीत ऐकून तर तिच्या रागाचा पारा आणखीनच वाढला होता. हे गाणं जणू आपल्याला डिवचण्यासाठीच लावलंय असं तिला वाटत होतं.
" कसलं कर्म आणि कसलं फळ... " लक्ष्मीला आपला संताप मोकळा करायला गोपाळच्या सुमन शिवाय कोणच नव्हतं.
" लांडीलबाडी करणाऱ्यास्नीच चांगलं फळ आणि चांगलं वागणाऱ्यास्नी सजा. असला न्याय देणारा ह्यो देवबी कुठं जाऊन बसला असल बघ की. काय तेचंबी डोळं फुटलंबीटलं काय कुणास ठावूक. अगं, ज्यानं आपल्या आईलासुदीत कधी बघितलं नाही, कधी साधं च्याच पाणी इचारलं नाही तेच्या घराची कशीआयती सोय लावून दिली बघ तेनं. आणि माझं बघ.मला बघ कसं चांगल्या कर्माचं फळ मिळालं ते." लक्ष्मीचा उद्वेग उचंबळून आला.
" व्हय गं सुमे. मला या देवानं असं का वाऱ्यावर सोडलं असल ? मी काय पाप केलं होतं ? या निष्ठूर देवास जराबी कशी दयामाया न्हाई?" लक्ष्मी देवावरचा आपला सारा संताप सुमन समोर काढत होती. इंगळावर फुंकर मारावी आणि इंगळ आग ओकावा तसं सुमनच्या मनातला ही देवाबद्दलचा संताप उफाळून आला होता.
'' कसली दया येतीय बाई तेला? कुठलां देव आणि कुठलं काय.. ! " कपाळाला हात लावून बसलेली सुमनही आपला देवावरच्या रागाला वाट मोकळी करुन देत होती. " लक्ष्मीआक्का अगं साध्यासुध्या माणसाची दुनया नव्हं ही. अगं आत्त आमचच बघ की. पोटास चिमटा काढून पै पै गोळा करुन दोन खोल्या बांधाय काढल्या. पैसं कमी पडलं म्हणून कर्ज काढलं. ते रातदिस काम करुन अजून फेडत बसलोय दोघंबी. आणि ह्या कामधंदा न करणाऱ्यांनाच तेवढा कसं आगतीनं पावला बघ तो देव . अगं त्येनला आमच्यासारकं कसलं कर्ज नाय की बिर्ज नाय. कशी चांगली, आयती घरं बांधून मिळाली त्यास्नी. म्हंजे फक्त राबणाऱ्यानी राबायचच खाणाऱ्यानी खायचय?असला कसला म्हणायचा ह्यो देवाचा अजेब न्याव ?" सरकारी लाभापासुन वंचित रहावं लागलेल्याआणि कर्ज फेडता फेडता नाकेनऊ आलेल्या सुमलाही देवाच्या या अजब न्यायाची चिड रोखता आली नाही.
" व्हय की. अगं दुसऱ्यांला मिळालं म्हणून मला वाईट वाटत न्हाई; खरं कष्ट करुन,म्हाताऱ्या माणसाची सेवा करणाऱ्या,सत्यानं वागणाऱ्या माझ्यासारख्या रांङमुंडबाईकडं जरा डोळं उघडून बघायचं काय नाही तेनं? काय असं डोळं झाकूनच बसायचं?त्यो देव डोळं झाकून बसला तर बसुदे खरं मीबी बघणारच हाय. त्यो दीर म्हणून घेणारा माझं घर कशी देत नाही ते." देवाच्या न्यायावरचा विश्वास उडालेल्या लक्ष्मीचा आक्रोश मात्र डॉल्बीच्या दणदणाटात सुमनशिवाय कुणालाच ऐकू येत नव्हता... डॉल्बीवर मात्र सुरेल भक्तीगीत दणक्यात सुरूच होतं. ' उद्धवा, अजब तुझे सरकार..उद्धवा, अजब तुझे सरकार...!'
जयवंत जाधव, कोवाड
मोबा. 9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा