Monday, August 10, 2020

कथा - धडा

कथा _  ' धडा '

दुपारचा रखरखा अगदीच वाढला होता. दुरवर पसरलेलं रखरखतं ऊन तर मी म्हणत होतं. वारा तर अजिबातच थांबला होता. झाडांची हालचाल खुपच मंदावली होती. चुकूनच एखाद्या झाडाच्या पानाची हालचाल जाणवत होती.अशा या रखखत्या ऊनात सासणे सर तापलेल्या डांबरी रस्त्यावरच्या हवेच्या गरम झळा  तोंडावर झेलत  आपल्या होंडावरून शाळेकडून घराकडं सुसाट सुटले होते.
      सराना घाईने घरी जायचे वेध लागले होते. कारणही तसंच होतं.आज गावची भागूबाईची जत्रा. जत्रा तशी खुप मोठी  नसली तरी आतुरतेने वाट पहायला लावणारी. दुपारनंतर भरणारी फक्त अर्ध्या दिवसाचीच पण अगदी दरवर्षी साजरी होणारी.
         भागूबाईवर गावची खुप श्रद्धा. त्यातही गावातील प्रत्येक घरातल्या माहेरवासीनीची तर अगदी अपार श्रद्धा. या दिवशी त्या न चुकता आपापल्या माहेरच्या घरी येणार हे ठरलेलं. माहेरवासीननं आपल्या खर्चानं नारळ,खणांनं देवीची ओटी भरली की वर्षभर आपला संसार सुखाचा होतो अशी निर्मळ भावना त्यांच्या मनात होती. आणि ही भावना पूर्णत्वास नेण्यासाठी,ओटी भरण्यासाठी अनेक माहेरवाशीन गावात आल्या होत्या. काही येत होत्या. 
        जत्रेनिमित्त येणाऱ्या लेकी, बहिणी येणार म्हणून आज  कुणाच्या घरात खाऱ्या, तर कुणाच्या घरात गोड्या मेजवाणीचे बेत ठरले होतेे. त्याची लगबग घराघरात चालली होती. सासणे सरांच्या घरातही त्यांच्या दोघी बहिणी,सोबत त्यांचे भाचेही येणार होते. पण सरांची अजून कसलीच तयारी नव्हती.आता जाऊन त्याना जत्रेची तयारी करायची होती.त्यासाठीचं नियोजन त्यांच्या मनात सुरू होतं. त्या तंद्री मुळेच पोळून टाकणारं ऊन त्यांना जाणवत नसावं.
       या चार दिवसात उष्म्याचा पारा खुपच वर गेला होता. उन्हानं तर कहर केला होता. घामाच्या धारांनी सारं शरीर भिजवलं होतं. डोळयासमोर ऊनाच्या झळा तर डोळ्यांसमोर काजवा चमकाव्या तशा चमकत होत्या. रस्त्यात, आसपास तर एक चिटपाखरूं सुद्धा नव्हतं.आणि अशा या रणरणत्या ऊनात रस्त्याच्या कडेला एक वयस्क आजी एसटीची वाट पाहत एकटीच उभी होती.आजीनं सरांची गाडी दिसताच त्यांच्या गाडीला हात केला. गाडीसाठी हात केलेल्या आजीला बघताच सरांना वाटलं, 'एवढया ऊनात ही आजी कशाला थांबली असल? ' एसटीची वाट पाहुन कंटाळलेल्या आजीला पाहताच सराना तिची दया आली. काही का असेना पण पोळणाऱ्या ऊनात थांबलेल्याआजीसाठी त्याना थांबावसं वाटलं.  गाडी थांबण्यासाठी त्यानी गच्चकण ब्रेक दाबला. ब्रेक लावताच गाडीचं मागचं चाकं डांबरी रस्त्यावर चरचर आवाज करत घासतच गेलं. चार पाच फुट लांब चाकाचा काळा पट्टा रस्त्यावर उठवतच गाडीचं चाक थांबलं.गाडी थांबताच आजी  आपल्या डोकीवरचा पदर सावरत आणि हातातली कापडी पिशवी घेऊन लगबगीनं गाडीकडं आली.
    आधीच रंगानं गोऱ्यापान असलेली आजी ऊनानं आणखीनच लाल झालेली दिसत होती.  गोऱ्या रंगाच्या कपाळावर कुंकू ऐवजी लावलेला काळा बुक्का उठून दिसत होता. गाडी थांबविण्यासाठीच केविलवाणं आर्जव घाऱ्या डोळ्यात मुळीच लपत नव्हतं. उष्म्यानं आलेल्या घामाच्या धारा तोंडावरच्या सुरकुत्यातून मार्ग काढत वाहत होत्या. तो घाम डाव्या हातातल्या पदरानं  पुसतच गाडीजवळ येत म्हणाली, 
    "बरं झालं रे माझ्या लेकरा गाडी थांबवलास ते. लई ऊन तापलय बघ आज. लई कायली होतीया बघ.''
  आजीला पाहुन गाडी थांबवली खरी पण सराना कडगांवला जायचं असल्यानं त्यांनी आजीला नेमकं कुठं जायचं आहे हे पाहण्यासाठी आजीला विचारलं,
    " ते व्हय खरं. आजी तू कुठं जाणार ? "
   "कडगांवला जातोय बाबा."
   " कडगांवला व्हय ! चल मग. मी पण तिकडच चाललोय. "
आपण चाललेल्या कडगावलाच आजीही येणार असल्यानं सर निर्धास्तपणे म्हणाले.
आजीनं पदर घट्ट डोकीवरुन घेऊन पदराच लोक फिरवून कंबरेत खुपसत होती.
   " आजी बस लवकर. मला जरा घाई हाय."
   "व्हय व्हय बसतो लेकरा. थांब वाईचं.''
    " आजी बसायला येतय नव्हं??न्हाई तर नको तो घोळ नको..... "
" व्हय बसतो की " . 
आजी पदर  आणि हातातली पिशवी सावरत गाडीवर बसत म्हणाली.
  " हां. चल तू आता. "
    आजी गाडीवर बसताच सरांनी गाडीची  मघासारखीच गती वाढवली. गाडी चालवता चालवता सहज काहीतरी बोलावं म्हणून सरांनी विचारलं,
    "काय आजी काय काम काढलं कडगांवला? " 
    "बँकेत पेन्सिल आले काय बघून येतो." आजी सावरुन बसत बोलली.
    " कसली पेन्सील आजी?" आश्चर्याचे भाव आणत सरांनी  विचारलं.
    " विधवा पेान्सिल मिळते बाबा. म्हैण्याला पाचशे रुपय. "
    " विधवा पेन्शन होय. बर बर."
बोलत बोलत सरांनी गाडीचा वेग आणखीन वाढविला.गाडी काही अंतरावर गेली,नाही गेली इतक्यात अचानक आजीच्या किंचाळत ओरडण्याचा आवाज आला आणि क्षणात नाहीसा झाला. काय झालं म्हणून मागं वळून बघतात तर गाडीवरच्या आजीही गायब. एकदम अचानक काय झालं सरांना पटकन कळलच नाही. सर थोडे गोंधळले. पण लगेच त्यांच्या लक्षात आले.आजी बहुतेक गाडीवरून पडल्यात.बहुतेक नव्हे खरंच रस्त्यावर पडल्याची सरांना अगदी खात्रीच झाली. काही लागलं तर नसेल ?  न कळत मनात भिती चमकली. तसं त्यानी गाडीचा वेग कमी केला. पुढं गेलेली गाडी गर्रकन मागं वळवली आणि आजी जिथं पडली तिथं येऊन गाडी थांबवली. गाडी साईडस्टँडवर लावली. येऊन बघतात तर आजीचा उजवा पाय रक्तबंबाळ झाला होता. आजी वेदनेनं विव्हळत होती.
    "अाजी, एवढं रक्त  कसं अालं?" 
पडल्यावर खरचटलं असतं किवा पाय मुरगळून मुका मार लागला असता. पण रक्तस्त्राव बघून  सर चकीत झाले. त्यानी विचारलेल्या प्रश्नावर वेदनेमुळे आजीला काहीच बोलता अालं नाही. बहुतेक आजीला ऐकू गेलं नसावं असं वाटल्यानं सरांनी पुन्हा विचारलं, 
     "अाजी .एवढं कसं काय लागलं हे ?"
   " गाडीच्या चकरात पायाची बोटं अडकली लेकरा." 
आजी डोळ्यात पाणी आणून आजी तळमळल्यासारखं  बोलली.
       आजीचा रक्ताळलेला पाय बघून सर कळवळले.पण तितकेच नाराजही झाले.आधीच उल्हास त्यात फाल्गून मास म्हटल्या सारखच झालं होतं.जत्रेसाठी म्हणून मुख्याध्यापकांची विनवनी करुन अर्ध्या दिवसाची रजा मिळवली होती. त्यात हे आणि नको ते भलतंच घडल्यानं सरांना काय करावं हे सुचेना.पडलेल्या आजीला बघून रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या,गाडी थांबवून बघणाऱ्या बघ्यांची संख्या बघता बघता वाढली. 
    " अहो, बघत काय थांबलाय?लवकर पळवा की दवाखान्यास. म्हातारीस लई लागलय. नको ते व्हायला नको."
   " अहो खरचं की."
   " बाप रे किती रक्त चाललंय.. !"
   " गाडी चालवायला व्यवस्थित येत नाही तर म्हाताऱ्या माणसास्नी कशाला घ्यायचं गाडीवर.. ."
    थांबलेला प्रत्येक जण परिस्थिती समजून न घेता उपदेशाचे डोस देत होता.चूक नसताना गर्दीतल्या लोकांनी बोलून बोलून सरांना गांगरून सोडलं. त्या गर्दीत सरांच्या गल्लीतला रामाही होता.सरांना ओळखताच रामा गाडी घेऊन पुढं येत गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला. गर्दीतल्या अनेकांना आजीची दया वाटत होती. सरांनीच तिचा दवाखाना करावा असा लोकांचा जोर वाढला. ती जखम बघून सरांच्याही मनात आजीविषयी दया दाटून आली होती. जबाबदारी टाळायची नव्हती. पण सराना गावाकडं जावं की आजीला दवाखान्याला घेऊन जावं हा पेच पडला. दोन्हीही कामं महत्वाची.आजीचा रक्तस्त्राव व विव्हळणं सुरूच होतं.जत्रा की आजी या गोंधळात आजीला असच सोडून जाणं सरांनाहीं बरे  वाटेना. आपण शाळेत मुलांना समाजसेवेचे, वृद्धांवर दया करा अशी शिकवण देतो. मग आपणच आपल्या आईसारख्या या आजीना आपण असंच सोडायचं ? असा नकळत एक विचार चमकून गेला. 'नाही.. नाही..अाजीला दवाखान्याला घेऊन जायचच.' सरांचा मनात निश्चय झाला होता. 
      सरांनी गर्दीत असलेल्या आपल्या गल्लीतल्या रामाला विनंती केली,
      " रामा जरा ये बाबा. अाजीला दवाखान्याला घेऊन जायला मदत कर. आजीला मधे घेऊन माझ्या गाडीवर बस.नाहीतर पुन्हा पडायला नको."
  आजीही  आपल्या व्याकुळ नजरेनं गर्दीला न्याहाळत होती. गर्दीही आजीकडं दयेनं बघत होती.त्यात सरांच्या गल्लीतला रामाही होता. रामालाही डोळ्यात पाणी घेऊन वेदनेनं कण्हणाऱ्या अाजीची दया आली.सरांनी विनंती करताच रामा आपल्या गाडीवरून खाली उतरला. मित्राकडे आपली गाडी दिली.आजीजवळ जात त्यानं आजीच्या दंडाला धरून हळूवार उचलले. इतर एका दोघांनीही आजीला गाडीवर बसाविण्यासाठी मदत केली.आजीला मधे घेऊन रामा मागे बसला.सरानी गाडी चालू केली ती थेट पाटील डॉक्टरांच्या दवाखान्यासमोर.आजीचं विव्हळणं आणि पायांच रक्ताच  वाहणं अजूनही सुरूच होतं. गाडी थांबवताच रामानं आजीला सावरत हळूच उतरलं. आजीही रामाच्या हाताला धरून उतरली. पण तिचा जखमी पाय तिला जमिनीला टेकवता येत नव्हता. दवाखान्याला येईपर्यंत अाजीच्या पायाला सुजही बरीच चढली होती.
  आजी उतरताच सरांनी गाडी बाजूला नेऊन लावली. तोपर्यंत रामानं एकाच पायावर भार देऊन चालणाऱ्या आजीला आपल्या खांद्याचा आधार देत दवाखान्यात नेऊन बाकड्यावर बसवलं होतं. गाडी लावून सर दवाखान्यातील बाहेरच्या खोलीत आले. त्यानी रामाला विचारलं,
    " डॉक्टर आहेत ना?"
    " होय,आहेत की. अात एक पेशंट आहे.तपासायलेत. "
    " होय काय. बर बर." म्हणत सर बाकड्यावर बसणार तोच अातील पेशंट बाहेर आला.डॉक्टरानी पुढचा पेशंट आत यायची बेल वाजवली तसं सर बसता बसताच उठले. रामा उभाच होता. दोघांनी आजीला धरून आत घेऊन गेले. दोघांच्या खांद्याचा आधार देत देत कॉटवर आणून बसवले. आजी पाय खाली सोडून वेदना सोसत अवघडून बसल्या. डॉक्टरांनी आजी लंगडते हे पाहून त्यानी पायालाच काहीतरी झालय हे ताडलं होतंं. त्यानी पायाकडं पाहतच  विचारलं,'' काय झालं मावशी?"
   वेदनेनं तोंड वाकडं केलेली आजी काहीच बोलली नाही.
    " साहेब, गाडीच्या चाकात पाय अडकला." सरांनीच पुढं येत सांगितलं.
     " बापरे खुपच रक्त चाललय." आजीचा पाय न्याहाळतच डॉक्टर बोलले.
     " होय साहेब. तेवढं ड्रेसिंग एवढं करा साहेब. रक्त थांबेल." सरांनी डॉक्टरांना उपाय सुचवला.
    " डॉक्टर तुम्ही का मी?" डॉक्टर सरांवर जरा चिडलेच."आधी बघतो तरी मग बघू काय करायचं ते." म्हणत डॉक्टरानी जखम निरखून पाहिली. सुजलेल्या भागाला बोट लावून पाहिलं आणि चेहरा गंभीर  करत सरांकडे पाहत म्हणाले," पाय चाकात अडकल्यावर आजी खाली पडल्यामुळं  पाय पण सुजलाय. बहुतेक पायाच्या घोट्या जवळचे हाड क्रॅक झाल्याची शक्यता आहे. त्यामुळेच पायाला सुज आहे. आणि महत्वाचं म्हणजे एका बोटाची नस तुटलेय. त्यामुळं हे रक्तपण थांबत नाही. "
    " .... " सुस्कारा सोडण्याशिवाय सर काहीच बोलले नाहीत.
    ''केस थोडी क्रिटीकल आहे. इथं होण्यासारखं नाही.पेशंटला गडहिंग्लज हॉस्पिटलला हलवायला पाहिजे." डॉक्टर भूवया ताणत व गळ्यातील टेथस्कोप सरळ करत म्हणाले.  
    डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून सर मात्र एकदमच नाराज झाले.हे सारं इथपर्यंतच थांबेल असं सराना वाटलं होतं पण आता डॉक्टरांचा सल्ला ऐकून मनातल्या  मनात स्वतःवरच संतापले. पण तसं न दाखवता स्वतःच शांत होत नम्र आवाजात डॉक्टरांना विनंती केली. 
      "साहेब बघा की इथंच कायतरी उपाय करुन. आता आणि कुठं गडहिंग्लजला जात बसु. आज आमच्या गावची जत्रा आहे. पाहुणेबिवणे आलेत घरात."   
        " त्याला काही ईलाज नाही सर. इथ बोलण्यात जास्त वेळ लावू नका. लवकर घेऊन जा पेशंटला. रक्तस्त्राव थांबत नाही. छोटी शस्त्रक्रिया केल्याशिवाय पर्याय नाही. आणि हाड क्रॅक असेल तर सुजही वाढत जाणार." डॉक्टर खुर्चीवर बसत निर्विकार चेहरा करत म्हणाले.
    सर खरं तर स्वतःवर खुपच संतापले होते. त्यानी त्या रागातच आजीकडं पाहिलं. पण आजी वेदनेन घायाळ झाली.तिला होणारा त्रास सरांना दिसत होता. राग आला तरी आजीकडं बघून गप्प बसण्याशिवाय काहीच करता येत नव्हतं.
    "आज माझी जत्रा इथंच होते वाटतं. विनाकारण नसती आफत ओढवून घेतली अंगावर. उगाच गाडी थांबवली. "
सर स्वतःवरच संतापत तोंडातल्या तोंडात पुटपुटले.
      "काय म्हणलास काय ?" आजीनं सरांचं पुटपुटणं ऐकून सरांनी आपल्यालाच काहीतरी विचारलं असं वाटून सरांना  विचारलं.
    " तुम्हाला नाही आजी माझं मीच बोललो." सर स्वतःशीच वैतागत अस्पष्ट बोलले.
    "हां हां '' सरांचं अस्पष्ट बोलणंही आजीनं ऐकलं होतं. आजीनं वेदननं कसनुसं तोंड केलं होतं. रक्तस्त्राव थांबत नाही ते पाहुन डॉक्टरानी अाजीला बोटं दाखवत सांगितले
   " आजी या इंथ बोटानं दाबून धरा गडहिंग्लजला जाईपर्यंत. रक्त थांबेल. आणि पुढं काय करायचं ते बाहेर बसुन ठरवा. मला बाकीचे पेशंट तपासायचे आहेत." म्हणत डॉक्टरांनी पुढच्या पेशंटसाठी बेल वाजवली.
   " हां साहेब." म्हणत सरांनी रामाच्या मदतीनं आजीला बाहेरच्या बाकड्यावर आणून बसवलं. 
    आजचा रजेचा दिवस असाच वाया जाणार हे सरांना स्पष्ट दिसत होतं. त्यांना काय करावं सरांना काहीच सुचेना. निदान आजीच्या घरातल्या कुणाला तरी बोलवून त्यानांच आजीसोबत दवाखान्याला जायला सांगू असा मनात विचार आल्यानं त्यानी आजीला विचारलं,
     "आजी घरात कोण आहे की नाही. कोण असल तर सांग त्यांचा नंबर. फोन लावून बोलवून घेऊया."
आजीच्या वेदना थांबत नव्हत्या. त्यातूनही त्या क्षीण आवाजात म्हणाल्या,
   " आरं लेकरा  माझा ल्योक मुंबईस हाय बाबा. आणि लेक हाय ती बी तिकडं इचलकरंजीला हाय. आपल्या सासरला.आणि तिचा नंबरबी न्हाय माझाकडं. लेकरा आता तुज्याशिवाय मला कोण घेऊन जाणारं न्हाय बघ घरात." 
  आजीनं तर सगळी जबाबदारी जवळजवळ सरांवरच ढकलली होती.
     आता मात्र सराना दुसरा पर्याय दिसत नव्हता. आजीला घेऊन जायचं सरांनी मनात ठरवलं पण आता घेऊन जायचं कसं ? आता जखमी आजीला टू व्हिलरवरुन जाणं शक्यच नव्हतं.
  " रामा आता कसं घेऊन जायचं रे ?"
  "सर १०८ नंबर ला कॉल करून बघा की."
  "अरे होय की. माझ्या लक्षातच नाही आलं. बघ बघ. तूच १०८ नंबर ला कॉल करून बघ. तोपर्यंत मी घरी फोन लावतो. यायला वेळ होईल म्हणून."      म्हणत सरांनी घरी कॉल केला. पण प्रयत्न करूनही सरांच्या घरचा मोबाईल लागत नव्हता. रामाचा मोबाईल मात्र लगेच लागला. तो मोबाईलवर बोलला. पण मोबाईल बोलणं ऐकून निराश होत सरांना म्हणाला,
   " सर अॅम्ब्युलन्स कोल्हापूरला गेलेय. तीन चार तास लागतील म्हणतात. "
  " काय?तीन चार तास??
  " होय सर "
  " मग आता? "
  " सर रमज्याची ओम्नी सांगा की. पाच मिनिटात घेऊन येतय बघा."
  " पण माझ्याकडे त्याचा नंबर नाही रे. "
   " माझ्याकडे आहे .थांबा लावतो.''
   " लाव बाबा. माझा मोबाईल घरीपण लागत नाही. च्यामायला या रेंजची ऐनवेळी बोंब असते बघ. आज तर एक पण काम धडीन होईना झालंय." सर वैतागून बोलले.
   रामानं रमज्याला मोबाईल लावला. मोबाईलवर रमज्याला सांगितलं. गाडी येण्याची वाट बघत बाहेर आले. रमज्याही बोलल्यासारखं अगदी पाचच मिनिटात ओम्नी घेऊन हजर झाला.
आजी अजून बाकडयावरच होती.आजीचा लांलबुंद चेहरा पार कोमेजून गेला होता. एका हातातल्या पदरानं तोंड पुसत तर दुसऱ्या हातानं डॉक्टरानी सांगितलेली नस बोटानं दाबून धरत तशीच कण्हत बसली होती.ओम्नी येताच सर आणि रामा आत आले. गाडी थांबवून रमज्याही आला.
     "आजी चल. गाडी आली. "
    " थांब बाबा. जरा हळू धरुन चल मला. खाली पाय टेकू देईना झालाय बघ."  आजी उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली.
   "रामा आजीला गाडीपर्यंत घेऊन चल थोडं.मी पण पकडतो" आजीला हळूवार उठवत गाडीकडं घेऊन आले.आजीच्या पायाला सांभाळत शिस्तात गाडीच्या मधल्या सीटवर नेऊन बसवली.आजी आत बसताच सर पुढच्या सीटजवळ जाऊन बसले. सर आणि आजी गाडीत बसताच रामानं दोन्ही दरवाजे बाहेरूनच ढकलून बंद केले.
    " हं चला सर."
     " अरे तू पण चल की."
" नाही सर. अजून आमचा सुद्धा जत्रेचा बाजार करायचा राहिलाय. त्यासाठीच आलेलो. आता तुम्ही चला म्हटला म्हणून इथपर्यंत आलो. मित्रपण माझी गाडी घेऊन येत असलं.इथनं पुढं रमज्या आहे की मदतीला. काय रे रमज्या. सरांना मदत कर."
   रामा रमज्याला विनंती करत रमज्यावर काम ढकललं.
    " व्हय मी हाय की सर. राम्याचा आणि खोळंबा कशाला?मी हाय चला तुम्ही.''
   " बर बर . रामा जा तू. आम्ही येतो. आमच्या घरात जाऊन सांग जरा वेळ होईल म्हणून. खरं ही भानगड काय सांगू नको. उगाच त्याना आणि काळजी." 
    " बर बर सांगतो की. तुम्ही जावा व्यवस्थित. "
     " बर.रमजान चल बाबा गाडी चालू कर आणि चल गडहिंग्लज हॉस्पिटलला."  म्हणत सरांनी रमज्याला मानेनं इशारा केला.
रमज्यानं गाडी स्टार्ट केली. रमज्यानं तासाभरातच गाडी हॉस्पिटलच्या पायरीजवळच टच केली.
गाडी बंद करून रमज्या घाईनं खाली उतरला. तोपर्यंत सरही खाली उतरले होते. रमज्यानं मधला दरवाजा उघडला. आजी तसाच केवीलवाना चेहरा करून, पाय सीटवर लांब सोडून बसली होती. एका हातानं  नस तशीच घट्ट पकडलेली होती. सरांनी आणि रमज्यानं आजीला अलगद खाली घेत गेटजवळच ठेवलेल्या अनेक व्हिलचेअर पैकी एका व्हिलचेअरवर बसवले.ती ढकलत ढकलत केसपेपरच्या खिडकीजवळ आले.आजीला तिथच थांबवलं. सरांनी केस पेपर काढला. पेशंटची गर्दी औषधांच्या दर्प वासासारखीच हॉस्पिटलभर पसरली होती. सर  केस पेपर घेऊन आले. सांगितलेल्या ओपीडीजवळ आले. तिथं अनेक पेशंट बसले होते. सरांनी केस पेपर तिथल्या नर्सकडे दिला.नर्सनी पेशंटला  लाईनमध्ये नंबरलावून व्हिलचेअरवरच बसण्यास सांगितलं. रमज्यानं एव्हाना ती व्हीलचेअर नंबरात लावलीही होती.
    थोड्या वेळानं आजींचा नंबर आला. आजीला आत बोलवलं. आजीला डॉक्टराना दाखवत सारी घटना सांगितली. ऐकत ऐकतच डॉक्टरांनी पाय पाहिला. जखम निरखून पाहिली. पायाची सुज दाबून पाहिली. पाय दाबताच आजी कळवळली. डॉक्टरानी सरांकडे पाहिलं.
    " अॅडमिट करावं लागेल."
    " अॅडमिट?'' सर डोळे विस्कारत जवळ जवळ आरडलेच,
    " हां. किमान दोन दिवस तरी नक्कीच."
     " पण??? " सर साशंकतेन बोलता बोलता थांबले.
     '' काय प्रॉब्लेम आहे का ? "
     "तसं काही नाही पण.... इथं आजीनं एकटं राहिलं तर चालतय ना? "
      " असं कसं? कुणातरी सोबत पाहिजेच की."
      " तसं नाही साहेब. अाज आमची जत्रा आहे. घरी पै पाहुणे आलेत. हा अपघात झाला आणि नको त्या फंदात अडकल्यासारखं झालं बघा."
   "मग कुणीतरी अॅडजस्ट करा. तुम्हीच पाहिजे असं काही नाही "
 डॉक्टरांचं म्हणणं पटल्यानं सरांनी आजीना विचारलं,
    " आजी, तुम्हीच बघा की कुणी नातेवाईक, शेजारी वगैरे."
     " लेकरा नातेवाईक कुणी नाहीत पण माझ्या शेजारच्या पोराला बोलवून बघती. यतोय काय." 
    " व्हय खरंच बघा आजी. बरं होईल." सर आशेनं म्हणाले.
    "बरं कुणी रहायचं ते ठरवा. आणि हो, बहुतेक खर्च दहा बारापर्यंत जाणार आणि ऑपरेशन पूर्वी पाच हजार जमा केल्यानंतरच पुढचा इलाज सुरु होईल. " डॉक्टर मध्येच बोलले.
    फी म्हणताच सरांनी आजीकडं पाहिलं पण सरांचा रोख बघून आधीच मलूल झालेला  चेहरा केविलवाना करुन डोळयांत पाणी आणत आजीच म्हणाली,
     " लेकरा माझ्याकडं कुठलं इतकं  पैसे? पाचशे रुपय पेन्सील भेटती म्हैन्याला आणि पोरगं शे पाचशे रुपय पाटीवतय. तेवड्यातच सगळं भागिवती बाबा." आजीनं तर खर्चाची बाजू पण पूर्ण झिडकारली होती.
     "च्यायला नको ते शानपण करायला गेलो. आणि अंगलट घेऊन बसलो." सर स्वतःशीच पुटपुटले.
आजीनं खर्चाची बाजू अलगद झिडकारून टाकल्यामुळे सरांना पैसे भरल्याशिवाय गत्यंतरच उरलं नव्हतं.सरांनी खिशांत पाहिलं. या त्या खिशातले गोळा करून
सरांनी काउंटरला जाऊन पाच हजार भरले. पावती घेतली. 
       ''डॉक्टर साहेब, मी चलतो. बाकीचे पैसे मी उद्या किवा डिस्चार्जच्या वेळी भरतो. "
     ''बर चालेल. या तुम्ही"
     " आजी, कुणाला तरी शेजाऱ्याला बोलवून घ्या. "
  ''होय बोलवून घेती. तू जा बाबा घराकडं. माज्यामुळं तुजी जत्रा राहिली बाबा. घरातली वाट बघत असतील. जा तू." आजी वेदनेमुळं  कण्हत आणि मायेनं बोलल्यासारखं म्हणाली. 
    "साहेब मी जातो. घ्या सांभाळून." सासणे सर घाई करत डॉक्टरांचा निरोप घेत म्हणाले.
सर घाईघाईनं बाहेर आले. रमज्याही सरांबरोबर होताच.
   "रमजान, चल बाबा. आज ही माझ्या जीवनातली आठवणीतली जत्रा झाली बघ." सर चलता चलता बोलले.
   " सर. तुम्हाला फुकटात धा बारा हजाराचा गंडा बसला बघा."  रमजान हसत हसत स्टार्टर मारत म्हणाला. 
   " काय हसतोस बाबा. म्हातारं माणूस म्हणून मदत करायला गेलो खरं, सगळं अंगलट आलं बघ. चल आता.नशीबात जे हाय ते काय चूकणार हाय? नशीबाची चक्कर दूसरं काय." 
सर सुस्कारा सोडत गाडीत येऊन बसले. रमज्यानं ओम्नीचा स्टार्टर मारला आणि गावच्या दिशेनं गाडी सोडली.
    सरांची जत्रा सरांच्या गैरहजेरीतही पाहूण्यांच्याच मदतीने व्यवस्थित पार पडली होती.
    दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर आजीला पहायला जाणं गरजेचं होतं. म्हणून सरांनी गावा ऐवजी थेट गडहिंग्लज हॉस्पीटल गाठले.
      गाडी हॉस्पिटलच्या पार्कींग मध्ये लावली. चौकशी खिडकीत आजी कोणत्या रुममध्ये आहे याची चौकशी करुन आजीच्या रुममध्ये गेले. आजी पाय लांब सोडून उशीला टेकून बसली होती. उजव्या पायाला बँडेज गुंडाळले होते.तिच्यासमोर कुणीतरी बोलतं बसलं होतं.सरांना पाहताच आजीनं सरांना आत बोलावलं.
    ''ये माझ्या लेकरा." 
    " काय आजी, वाटलं काय थोडं बरं."
      " व्हय वाटलं की. रगातबी थांबलं आणि सुजबी उतरायला लागलीय बग "
    " बरं झालं एकदाचं."
    " व्हय. आणि हाडबी मोडाय न्हाई. फोटू मारून बघिटलं डॉक्टरानी. "
      " व्हय?बरं झालं घे. बरं,कधी साडतो म्हटलय घराकडं ? सरांनी विचारलं. ''आणि हे कोण? शेजारी का?" शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे बघत सरांनी सहज विचारलं.
   " आं?  हां हां ह्यो व्हय. आमचा बाजूचाच पोरगा हाय. " आजी बोलताना एकदम गोंधळल्यासारखी बोलली.
   " शेजारी असुनही आजीसाठी इतका वेळ देताय म्हटल्यावर भारीच हां. अहो आभारी आहे तुमचा." 
सर त्या व्यक्तीचं कौतुक करत असतानाही ती व्यक्ती कसनुसं हसत नमस्कार करून न थांबता बाहेरच गेली. मग अजीनच विषय बदलला.
     " मला उद्या परवा घराकडं सोडतो म्हणत्यात.आणि तुम्हाला डाक्टारानी भेटाय सांगितलंय."
    '' बरं मी भेटून जातो. बघू काय म्हणतात. येतो मी." म्हणत सर रुममधून बाहेर आले. ते डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये जाऊन डॉक्टराना भेटले. डॉक्टारांशी विचारविनिमय करुन बाहेर आले. पुन्हा आजीच्या रुमकडं जाऊन आजीचा निरोप घेतला आणि गावाकडं जायला निघाले.
     दोन दिवसानंतर आज आजीला डिस्चार्ज देणार होते आणि हॉस्पिटलचे बिलही भागवायचे होते म्हणून सरानी शाळा सुटल्यावर गडहिंग्लजची वाट धरली.
    सर शाळा सुटल्यावर येणार आणि आज आपल्याला डिस्चार्ज मिळणार म्हणून आजीही सारं आवरुन बसली होती. पायाला नव्या पांढऱ्या कपड्याचं बँडेज दिसत होतं.सरांना बघताच आजी स्वतःला सावरतच उभं राहिलीे. ओषधं वगैरे ठेवलेली पिशवी घेत बाहेर पडले. आजी अजूनही लंगडत होत्या. जखमी पायावर कमी भार देत हळूहळू काऊंटरजवळच्या बाकड्यावर बसल्या. सोबत मदतीला 
असलेली व्यक्तीही होतीच.सर बिल पेड करायला काऊंटरवर  गेले. "कॉम्प्युटर ओपन होत नसल्यानं पंधरा वीस मिनिटं थांबाव लागेल. " असं काऊंटरवर सांगण्यात आलं. ऑपरेटरचं हे बोलणं ऐकताच आजीच म्हणाली, " लेकरा  आमची शेवटची आता इतक्यात हाय. आणि थोडा वेळ थांबलो तर आमच्या गावची शेवटची एसटी चुकणार बघ. तवा आमाला जायला चालतय काय विचार की."
   " होय होय आजी. तुम्ही जायला चालतंय. सर बिल भरणार आहेत तर तुम्ही जाऊ शकता." 
आजीचं बोलणं ऐकून सरां अाधी काऊंटरवरचा कॉम्प्युटर ऑपरेटच म्हणाला. मग सरांनीही आजीकडं पहात म्हणाले,
     " चालतंय  व्हय .मग चला तर तुम्ही. मी बील भरुन जातो."
    " बरं बाबा. तू देवासारखा भेटलास लेकरा. दुसरं कुणीतरी असतं तर मला तसंच वाटेत टाकून गेलं असतं. " डोळयात पाणी आणून हात जोडत आजी कृतज्ञनं बोलली.
     " असू दे आजी. त्याला काय इलाज हाय. असु दे. तुम्ही जा आता. खरं इथनं स्टँडपर्यंत कसं जाणार? " सरांनी काळजीच्या सुरात विचारलं
      '' मी माझ्या गाडीवरनं स्टँडपर्यंत सोडतो एसटीत बसवतो आणि मी माज्या गाडीनं पुढं जातो घ्या. तुम्ही निवांत जावा." आजीसोबतचा व्यक्ती सरांना खात्रीनं म्हणाला.
    " बरं बरं. शिस्तात जा." म्हणत
सरांनी आजीला गाडी पर्यंत जायला मदत केली. त्या व्यक्तीने गाडी स्टार्ट केली.
    "आजी शिस्तात बस. नाहीतर पुन्हा चाकात पाय घालशील." सर एवढ सांगत असताना एव्हाना त्या व्यक्तीनं गाडी सोडलीही होती. ते थोडं पुढं जातात न जातात तोच एक व्यक्ती हातात एक शहाळं घेऊन आजी बसलेल्या गाडीकडं हात करत आणि  "पांडू ए पांडू. थांब थांब." असं ओरडत पळतच आला. तोपर्यंत गाडी खुपच लांब गेलेली.
   " च्यामायला ऐकू जायला न्हायी वाटतं. येऊन वाया झालं " हातातल्या रुमालानं तोंड पुसत तो पुटपुटला. ते बघून सरांनी विचारलं, " का हो. कुणाला हाक मारताय? "
    " त्या काय मायलेकरास्नी. त्या म्हातारीलाच बघायला आलेलो " आजी गेलेल्या दिशेला बोट दाखवत ती व्यक्ती म्हणाली.
     '' मायलेकरं ?? अहो त्या आजीचा मुलगा नव्हे तो.तो आजीचा शेजारी आहे. आजीचा मुलगा इथं नसतो. मुंबईला आहे म्हणे. "
    " शेजारी नव्हं साहेब मुलगाच हाय तो तिचा." 
    " अहो अाजीनच तर ओळख करून दिलेय मला त्याची."
    " अहो साहेब, मला म्हाईत का तुमास्नी.आमच्याच शेजारी हैत ते." 
    " अहो ते कसं शक्य आहे.आजीनच मला ओळख करून दिलीय कालच. आजी कशाला खोटं बोलेल?" सर अगदी खात्रीनं सांगत होते.
   " नाही नाही काय तरी सांगू नका. तो गाडी मारत होता तो पांडू आमचा शेजारी. तेला मी ओळखत नाही व्हय. आणि तो मुंबईला वगैरे काही नाही. गावातच असतो तो.''
   " मग आजी माझ्याशी खोटं कसं काय बोलल्या?" साशंक चेहऱ्यानं सरांनी प्रश्न केला.
    " तुम्ही त्यांचं कोण?"  कोडं पडलेल्या चेहऱ्यानं त्यानं सरांना विचारलं.
        सरांनी मग घडलेली सारी घटना सांगितली. हे ऐकून ती व्यक्ती हसतच म्हणाली, 
     " मग बरोबर. सर, ती म्हातारी आमच्या गावात एक नंबर बेरकी हाय. आणि पोरगा तिच्या दुप्पट बेरका. तुम्हाला त्या दोघांनी गंडवलं बघा. दवाखान्याचा खर्च काढायलाच ते खोटं बोलले असणार. असणार नाही अगदी तसंच हाय बघा." चेहऱ्यावर खवचट हसु खेळवत त्या व्यक्तिचं बोलणं ऐकताच सर काही वेळ बुक्काळ्यात पडले. दवाखान्याचा खर्च काढण्यासाठी आजीनं केलेली बनवेगिरी,लबाडी त्यांच्या लक्षात आली. एखाद्या माणसाच्या चांगुलपणाचा गैरफायदा तोही एकदम कणव वाटावी अशा आजीनं घ्यावा हे सरांच्या मनाला मुळीच रुचलं नव्हतं. आजीच्या या अनपेक्षित वागण्यानं खुपच ते निराश झाले होते. थोडे संतापलेही होतेे. स्वतःवरच हसले.
 'विश्वास ठेवावा तर कुणावर ठेवायचा?  दया दाखवायची तरी कुणाला?' हताश सुरात स्वतःशीच उद्गारले. 'नाही इथून पुढे कुणाचीच मदत करायची नाही. अजिबात दया दाखवायची नाहीच.' असा सरांच्या मनात विचार आला. पण क्षणभरच.
     त्यांचं लक्ष मावळतीकडं चाललेल्या सुर्याकडं गेलं. ते विचारात पडल्यासारखे झाले. आणि क्षणात त्यांचा विचार बदलला होता. 'हा सुर्य जगातल्या कितीतरी लोकांवर आणि कितीतरी स्वभावाच्या प्राणीमात्रावर आपली उर्जा आणि प्रकाशाची उधळण करतो. इतरांनी चांगलं म्हणावं अशी कधी साधी अपेक्षाही करत नाही.तो कधीही विचार करत नाही की कोण कसा आहे. मग आपण तरी का विचार करावा? आपण चांगलं काम करत रहायचं बस्स. समोरचा कसा वागतो याचा विचार करायचा नाही. सगळीच माणसं काही लबाड, स्वार्थी नसतात. ' क्षणात चमकलेल्या या विचारानं सरांच्या चेहऱ्यावरच्या संतापाची, नाराजीची जागा समाधानानं केव्हाच काबीज केली होती. त्यांचा चेहरा अगदी सुर्यासारखाच तेजस्वी दिसु लागला. चेहऱ्यावरील समाधानाबरोबरच मनाला एक शिकवणही मिळाली होती. जीवनाची परीक्षा देताना शाळेतच शिकलं पाहिजे असं काही नाही.आपण सध्या शिक्षक आहे आणि विद्यार्थी नाही म्हणून फक्त दफ्तराचं ओझं खांद्यावर नाही. असं असलं तरी काही लोकं अजूनही चांगलाच 'धडा'
शिकवून जातात हेच खरं..!!
   एक नवा अनुभव घेऊन सर गावाकडं परतत होते.

  कथा =  जयवंत जाधव,कोवाड
  मोबाईल -9403463881

 पत्ता -
श्री. जयवंत गणपती जाधव
लक्ष्मीनगर, कोवाड
ता. चंदगड जि. कोल्हापूर
पिन ४१६५०८

No comments:

Post a Comment