आभाळ अगदीच काळवंडून गेलं होतं. पावसाची रिपरीप सुरुच होती. पाऊस बघून बाहेरचा गिलावा तसाच ठेऊन आतल्या खोल्यांचा गिलावा करायचं काम चालू होतं.आभाळ काळ्या ढगांनी गच्च भरल्यामुळं खोलीतही बरच अंधारल्यासारखं झालं होतं. हवेतही थोडा गारवा जाणवत होता. या गारव्यातही रामलिंग मात्र रागानं खुपच तापला होता. घमेल्यातला माल थापीनं भिंतिवर सपासप मारत होता.मनातला संताप थापीतून भिंतीवर उतरवत होता. थापीच्या प्रत्येक फटकाऱ्याबरोबर गावडूबद्दलचा राग चाळोबासमोर मोकळा होता.
" अरे त्येनं पैसे न्हायी म्हटलं असतं तरी चाल्ल अस्तं. मी केवढा उशिर कुत्र्यायासारखा दारातच उभा हुत्तो माझ्याकडे साधं दुंगूनसुदा बघाय न्हायी. अरे साधं घरात ये सुद्धा म्हटलं न्हायी. .एवढी कसली घमेंड आलीय लेकास. "
'' ते व्हय खरं. आत्त आम्ही बोलून, ताप करुन घेऊन काय फायदा हाय काय..?? अरे बाबा आत्त तेचे दिवस हैत.. !त्याच्या कडं लै पैसे झाल्यात.पैशानं माजलाय तो. "
" तरीबी असं एकदम माणसातनं उठल्यासारखं वागायचं काय..? "
" अरे ते तेला कळाय पायजे.आम्ही बोलून काय फायदा ? आणि असल्या फालतू माणसासाठी आपण तरी उगीच कशास टेन्शन घ्यायचं? सोडून दे तिकडी." चोळाबा थापलेल्या सिंमेटवर घोटणी फिरवता फिरवता रामालिंगची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. पण रामलिंगचा संताप काही कमी होत नव्हता. रागाच्या भरात त्यानं हातातली थापी मालाच्या घमेल्यात आपटली आणि तसाच गिलाव्यासाठी बांधलेल्या पायाडावर गुडघ्यावर हात बांधून विचारात गढून गेल्यासारखा गप्पच बसला. चेहरा एकाकी भावूक झाल्यासारखा झाला.बाहेर पावसानं आता बराच जोर धरला होता. खोलीही अगदी अंधारुन गेली होती.
एरवी रामलिंग तसा खुप शांत, साधा आणि लाजवट स्वभावाचा. आपण भलं आणि आपलं काम भलं. खरंतर कष्टाळू असणारा रामलिंग एक वेळचा घरांची कॉन्ट्रॅक्ट घेणारा कॉन्ट्रॅक्टर. प्रामाणिक, वेळेत आणि रेखीव काम करणारा 'रामलिंगमेस्त्री' म्हणून पणजीच्या आसपासच्या उपनगरात बऱ्यापैकी नाव झालं होतं.
रामलिंग शाळेपासुनच अभ्यासात बऱ्यापैकी हुशार पण खुप लाजवट,अबोल स्वभावाचा. शाळेत शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं येत असुनही हात वर करण्याचं कधी धाडस दाखवलं नव्हतं.आपल्याला सर प्रश्न विचारतील म्हणून दुसऱ्या पोरांच्या मागं तोड लपवून मागच्या बेंचवर बसणारा. अशा या स्वभावामुळंच त्याला शाळा सोडावी लागली होती. निमित्त फक्त गांधी जयंतीच्या भाषणाचं.एकदा वर्गात गांधी जयंतीबद्दल सर मुलाना सांगत होते.
''उद्या गांधी जयंती आहे. सर्वांनी भाषण पाठ करुन या.बोलायचं . धाडस पायजे. जो पुढे पुढे करतो तो पुढेच जातो आणि मागे राहणारा कायम मागेच राहतो लक्षात ठेवा. सर्वानी भाग घ्यायला पाहिजे. रामलिंग उद्या तूलाही उठवणार हं. तूही भाषण केलं पाहिजे."
या भाषणाचा धसका घेऊन रामलिंगनं गांधी जयंतीपासुन चारपाच दिवस शाळेलाच दांडी मारली. आणि नंतरही त्याला शाळेला जाऊ वाटत नव्हतं. त्यानं शाळेतल्या अशा भाषणांची, प्रश्नोत्तरांची धास्तीच घेतली होती. त्यानं मनातनं शाळाच काढून टाकली होती. घरातल्या सर्वानी मिनत्या करूनही काही फरक पडला नाही. शेवटी त्यानं कायमचीच शाळा सोडून गोव्याला कामाला जायच ठरवलं. गावातील अनेक पोरं गवंडीकामासाठी गोव्यात जात होती... त्यातल्याच एकाची ओळख काढून गोवा गाठला. गावातल्याच एका गवंड्याच्या हाताखाली हेल्पर म्हणून काम करु लागला. या कामात मात्र त्याचं मन चांगलच रमू लागलं होतं. वाळू, विटा,खडी उचलण्यापासुन ते चिरा तासायचं,वाळू सिमेंटचा माल कालवण्याचं काम सफाईनं करत होता... हेल्परच काम करता करता आता बऱ्यापैकी बांधकामही करायला शिकला होता.
रामलिंग प्रत्येक काम आवडीनं आणि मन लावून करत होता. त्यामुळं त्याचं बांधकाम, गिलावा रेखीव असायचं. त्याचं चांगलं काम पाहून त्याला छोटी छोटी कामंही खंडून मिळू लागली होती. घेतलेली कामं वेळेत करू लागला. रेखीव आणि वेळेत होणारी कामं पाहून त्याला आता कांही घराचीही कामं मिळत गेली.कामं वाढत गेली तसं गावातलीच दोन चार पोरं हाताखाली घेतली. मोठ्या फायद्याकडं न बघता दर्जेदार कामात समाधान मानणाऱ्या रामलिगमिस्त्रीनं भागात बऱ्यापैकी नाव कमावलं होतं.
अशा कामाच्या व्यापातही कुटुंबवत्सल रामलिंगच गावाकडं मात्र दुर्लक्ष झालं नव्हतं. थोडी बहुत असलेली शेती आई बाबा बघत होते..पत्नी रुपालीही आईबाबाना शेतकामात मदत करायची. रामलिंगही दर शनिवारी संध्याकाळी गावाकडं येऊन सोमवार सकाळी परत लवकर पणजीच्या रुमवर हजर असायचा.
आजही रामालिंग आपला गाववाला आणि सोबती गावडू दोघंही नेहमीसारखंच गावावरून परत येऊन आताच पोहोचले होते. इतक्यात त्यांच्या मागोमाग फोर व्हीलर घेऊन राम नातलेकर साहेब केंव्हा आले होते हे मात्र त्यांना अजून समजलच नव्हतं. गावडूनं रुमचं दार उघडलं आणि आत गेला. रामलिंगही उंबऱ्यात एक पाय टाकतो न टाकतो इतक्यात नातलेकर साहेबांनी हॉर्न वाजवला. हॉर्नचा आवाज ऐकून रामालिंग हातातली पिशवी तशीच आतल्या बाजूला ठेऊन फिरुन मागं वळून बघितलं तर गाडीत राम नातलेकर साहेब.एवढा मोठा माणूस आपल्या दारात बघून रामलिंग लगबगीन पायऱ्या उतरुन खाली गाडीजवळ आला. हात जोडत नमस्कार केला.नातलेकर साहेबही गाडीतून खाली उतरत हसत येऊन रामलिंगच्या खांद्यावर हात टाकतच म्हणाले, " काय रे रामलिंग मेस्त्री गावाकडच्यान आत्ताच ययलो दिसता."
"व्हय साहेब. शनिवारी गावाकड गेलेलो." नम्र सुरात रामलिंगनं सांगितलं
'' व्हय? बरे बरे.माझे तुझ्या कडेन एक काम अशिल्ले"
'' बोला की साहेब." रामलिंग आज्ञाधारकपणे बोलला.
" बरे, तुगेली हातान घेवल्ली सोगळी घरची कामा सोपली?? "
" हैत एक दोन कामं ती बी आटपत आल्यात. "
" बेगीन करुन घे.आमगेल्या मेन शाखेच्या बांधकामाचे काम काढला. नवीन इमारत बांधपाची मंजूरी गावल्या . मोठं काम आसा. सोगळो आराखडोबी तयार झालेलो आसा. इंजिनियरबी ठरयला. आता नुसते तुका मेळपाचे आसा. फोनुच करपाचो आशिल्लो. पण म्हटले अयसुनच वैतेल्लो. आणि तुका गाडीवरसुन येताना पळयलो. आणि म्हटले तुका मेळोया. त्या खातीर तुझ्या फाटल्यान ययलो.
" बरं झालं की हो साहेब. त्यानिमितान आपली भेट तरी झाली." रामालिंग हात जोडत नम्रपणे म्हणाला.
" हे बघ येवच्या बुधवार दिसा आमगेल्या शाखेच्या संचालक बोर्डाची मिटींग आसा.बांधकामाचो एकच विषय आसा. इंजिनियरबी आपयल्ले आसा. तु बी यो. मागीर पळवया किते ठरपाचे ते."
" हो साहेब येतो की. "
"बरे येता. परत मेळोया. आता हाव वैता. मागेल मास्से अर्जंट काम आसा. " म्हणत नातलेकर साहेबांनी निरोप घेतला.
एक मोठं काम मिळणार म्हणून खुश झाला होता.नातलेकर साहेबांचा निरोप येताच ठरल्याप्रमाणे रामलिंग गावडूला सोबत घेऊन मिटींगला पोहोचला. रामलिंगसोबत गावडूही नेहमी असायचा.मिटींग हॉलमध्ये रामलिंगला बोलवलं. गावडू बाहेर ऑफिसमध्येच बसुन राहिला. रामलिंग आत गेला. आत मिटींगमध्ये चर्चा होत होती. इंजिनियर, बांधकाम तसेच इतर अडचणींवर चर्चा झाली. रामलिंगच्या बांधकाम कॉन्ट्रेक्ट,दराबाबत चर्चा होऊन कमी जास्त कमी जास्त करत शेवटी स्क्वेअर फुटावर काम द्यायचं ठरलं. या कामामुळं रामलिंगला खरच एक मोठी संधी मिळाली होती.
रामलिंगनंही मिळालेल्या संधीचं सोनं केलं होतं. आठ दहा महिन्यात एक सुंदर इमारत उभी राहिली. नातलेकर साहेबांसह सर्व संचालक मंडळ कामावर बेहद खुश झाले होतेे.
आता संस्था नवीन इमारतीत स्थलांतरीत करुन मोठ्या दिमाखात उदघाटनाचा कार्यक्रम साजरा करायचं ठरलं. तसं नियोजन संचालक मंडळान नियोजनही केलं. ठरल्याप्रमाण कार्यवाही सुरु व्हायला वेळ लागला नाही. कार्यक्रम पत्रिका निघाल्या. सर्व मान्यवर नेते, सहकार, राजकारण, उद्योग क्षेत्रातील महनीय व्यक्तींना निमंत्रण गेली. उदघाटन कार्यकम सहकारमंत्र्यांच्या हस्ते करायचं निश्चित झालं होतं.
ठरल्याप्रमाणं उद्घाटनाचा कार्यक्रम अगदी दिमाखात पार पडत होता.उद्घाटनानंतर सत्कारचा कार्यक्रम सुरु झाला.एक एक सत्कारमूर्तीना स्टेजवर बोलवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार सुरु होता, मनोगत व्यक्त करण्यास संधी दिली जात होती. आता सुत्रसंचालकानी पुढचं नाव पुकारलं. सुत्रसंचालकानी रामलिंगच नाव पुकारताच बांधकामाची सुबकता पाहिलेल्या अनेकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.रामलिंगला मात्र एकदम घामच फुटला.टाळ्यांच्या आवाजाबरोबर छातीची धडधड वाढली.पोटात गोळा येऊन एकाकी अंगातलं त्राणच गेल्यासारखं झालं. त्याचा जूना स्वभाव उफाळून आला होता. भाषण सत्कार असं ऐकताच त्याला स्टेजवर जायचं धाडसच झालं नाही. शाळेपासुनची सवय अजून सुटली नव्हती. पुन्हा एकदा नाव पुकारलं. जाऊ की नको, जाऊ की नको या दंद्वात शेवटी 'नको'चाच विजय झाला होता.आणि तो उठलाच नाही. त्यानं आपल्या बाजूलाच बसलेल्या गावडूला जायला जवळ जवळ ढकलूनच पाठवलं. आधीच अशा मोठेपणाची आवड असलेल्या गावडूनं वेळ लावलाच नाही. गावडू अगदी रुबाबात स्टेजवर चढला. त्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. सत्कारानंतर गावडूनं स्टेजवरून सर्वाना नमस्कार केला. हात वर करुन अभिवादन केलं. सर्वानी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. मिळणारा प्रतिसाद पाहून खाली बसलेल्या रामलिंगला मात्र आपण वर गेलो नाही याची चुटपुट लागली होती पण वेळ निघून गेली होती. संधी एकदाच दार ठोठावते. गावडू मात्र स्वतःच कॉन्ट्रॅक्टर असल्याच्या रुबाबात समोरच्या लोकाना अभिवादन करत स्टेजवरून खाली उतरला.
उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. स्टेजवरील मान्यवर खाली आले. खाली बसलेले काहीजण बाहेर पडत होते. तर काही जण ओळखीच्या व्यक्तीच्या गाठीभेटी घेत तिथच थांबले. ज्याना बांधकाम अावडलं असे काही जण गावडूला भेटून शुभेच्छा देत होते. त्याचा नंबर घेत होते. सर्वजण गावडूलाच कॉन्ट्रेक्टर रामलिंग गावडे समजून कौतूक करत होते.
स्टेज वरील सर्व मान्यवर खाली उतरले. नातलेकर साहेबही उतरले. ते जात असतानाच त्याना रामलिंग नजरेस पडला. त्यांनी रामलिंगला हाक मारली. रामलिंग येताच, '' अरे रामलिंग कित्याग यवकना सत्काराक? तुका कसली अडचण येयली??
" नाही साहेब. स्टेजवर यायचं धाडसच झालं नाही साहेब. मला असा सत्कार करून घ्यायची सवय नाही. घाबरल्या सारखं होतं. "
" अरे तुयेन काय बरो मोको सोडलो? सोगळ्या लोकामुकार तुगेला सत्कार झालो असतो. ओळखी झाल्यो असत्यो. आणि तुका कामा गावली असती. काय बाबा तू.. ! " नातलेकर साहेब डोक्याला हात लावत बोलले. त्यांच बोलणं ऐकून रामलिंग खरचं खुप नाराज झाला. त्याला स्वतःच्या भित्रेपणाची कीव वाटत होती.आपण उगीच संधी दवडलो असं सारखं वाटत होतं.
रामलिंगनं सोडून दिलेली संधी मात्र गावडूनं अजिबात दवडली नव्हती. कॉन्ट्रॅक्टर म्हणून मिरवताना बेरक्या स्वभावाच्या गावडूनं मात्र मोबाईल नंबर रामलिंगचा न सांगता स्वतःचाच नंबर सांगितला होता.बोलण्यात आणि व्यवहारातही चतूर असणाऱ्या गावडूला याचा फायदाही होत होता. त्या जीवावरच खरचं त्याला काही कामाच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. त्यानंही रामलिंगला अंधारात ठेऊन स्वतःच कामं घ्यायला सुरवात केली होती. रामलिंग कडचेच काही चांगले कामकारही जादा मजूरी देऊन आपल्याकडं वळवून घेतले होते. स्वतः गावडूही चांगलं काम करायचा. अजूनपर्यंत त्याला संधी मिळत नव्हती. पण आता त्याच्याकडं आयती संधी चालून आली होती. त्याला आता रामलिंगपेक्षाही मोठी कामं मिळत होती. बघता बघता त्यानं आपलं चांगलंच बस्तान बसवलं होतं. त्याला त्याच्या लाघवी बोलण्याचा फायदाही कामं मिळवण्यात बराच झाला होता.
इकडं दोन तीन वर्षात मात्र रामलिंगच्या आयुष्यात बऱ्याच उलथापालथी झाल्या होत्या.नाही म्हणायला रामलिंगचीही घरांची थोडी बहुत कामं चालू होतीच. पण दुर्देवाने त्या कार्यक्रमानंतर एक दीड वर्षभरातच त्याच्यावर आघात कोसळला. रामलिंग पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन पडला होता. कामाचाच उजवा हात मोठ्या प्रमाणात फॅक्चर झाला होता. त्यातून सावरायलाच त्याचे पाच सहा महिने निघून गेले.जेव्हा कामाला जायला लागला तेंव्हा दुखापतीमुळं त्याला हात त्याला साथ देईनासा झाला. हात फॅक्चर झाल्याच्या बातमीमुळं कामं मिळायचीही हळूहळू बंद झाली होती. त्यामुळं त्याला गावाकडं परत यावं लागलं होतं. तो गावाकडच छोटी मोठी कामं करत राहिला. संकटं आली तर ती एकटी येत नाहीत हेच खरं. या कामाच्या तंगीत वडीलांचं आजारपणही अचानक वाढलं होतं. दवाखान्याचा खर्च वाढला होता. मुलं मोठी होत होती तसा शिक्षणा चा खर्च वाढत होता. आता रामलिंग बऱ्याच आर्थिक विवंचनेत सापडला होता.
बाबांचा आजार तर बराच वाढला होता. दवाखान्यासाठी बराच खर्च झाला होता. थोडी ऊसणवारही वाढली होती. आता पुन्हा डॉक्टरांनी काही चाचण्या करुन आणण्यास सांगितल्या होत्या. पण आता आणखी पाच सहा हजार आणणार कुठून?संकटाच्या वेळी जवळची सर्व माणसे दूर जातात हा अनुभव रामलिंगला येत होताच.एक दोघांनी नाही म्हटल्यापासुन आणखी कुणाकडे मदत मागायचं त्याला धाडस होत नव्हतं. पण निकडीची गरज होती. आता मदत कुणाकडे तरी मागावीच लागणार होती. कुणाकडे जावं या विचारात पडलेला असतानाच रामलिंगची बायको रुपालीनंच सुचवलं," काय हो. गावडू दाजीच्या दारात आज सकाळी गाडी दिसली. बहुतेक ते आले असणार. त्यांच्याकडे जाऊन बघा की तेवढी नड भागीवत्यात काय ते."
रामलिंग काहीच बोलला नाही.एकवेळचा आपला सोबती असला तरी का कुणास ठाऊक पण गावडू आपली नड भागविल अस त्याला वाटत नव्हतं. गावडूचा स्वभाव त्याला माहित होता. तरी सुद्धा गरजवंताला अक्कल नसते हेच खरं. 'बघूया एकदा जाऊन तरी पाहुया. होय तरी म्हणील न्हाय तर न्हाय तरी म्हणील.' असा मनात विचार करुन रामलिंगन गावडूकडं जायचं ठरवलं. एक मोठा सुस्कारा सोडला आणि जागेवरुन उठत पत्नीला म्हणाला, " बघूया येतो गावडूकडं जाऊन."
" देतील की तुमास्नी. तुमच्या मुळच येवढं मोठं झाल्यात आणि तुमास्नी न्हाय कसं म्हणतील." रुपाली भाबडेपणानं रामलिंगला धीर देत बोलली.
" हुं. बघू.." रामलिंग तुटकपणे म्हणत बाहेर आला आणि आपल्या एमएटी गाडीला किक मारली. तीन चार वेळा कीक मारुन मारून स्टार्ट केली आणि गावडूच्या घराकडं जायला निघाला.
रामलिंग गावडूच्या दारात गेला. कंपाऊंडच्या आत गावडूचा मुलगा अक्षय दारातच स्विफ्ट गाडी पुसत होता. बाहेरच्या सज्ज्यात दोन तीन पाहुणे पान तंबाखु खात बसले होते. रामलिंगनं बाहेरुनच हाक मारली.
"गावडू. ए गावडू. काय करायलास ?"
पण घरातून काहीच प्रतिसाद आला नाही. मात्र या हाकेनं अक्षयचं लक्ष गेलं.
" काका तुम्ही आलाय.थांबा, पप्पा मागे हैत. बोलवून आणतो." गाडी पुसायचं कापड गाडीवरच ठेऊन अक्षय वडीलांना बोलवायला धावतच गेला..
गेटलावलेलंच होतं. रामलिंग आपल्या एमएटी गाडीवरुन उतरला आणि कंपाऊंडात असलेली पांढरीशुभ्र स्विफ्ट बघत गावडू यायची वाट पाहत गेटजवळ थांबला.
" काय रामलिंग, कसं काय आलेसाय? "दाढी करुन घेत असलेला गावडू रामलिंगकडे न बघताच डाव्या हातातल्या आरशात आपला दाढी करण्यासाठी लावलेला फेसाळ चेहरा निरखितच विचारलं.
" काय न्हाय. जरा काम हुत्तं म्हणून आल्लो." थोडं संकोचत रामलिंग म्हणाला.
" बोल की. '' राहिलेली दाढी करता करताआपल्याच तंद्रीत गावडू बोलला.
" एक पाच सहा हजारची नड होती." बसलेल्या पाहुण्यांची नजर चुकवत संकोचानंच बोलला.
" अरेरे, अरे आता परवाच एक व्यवहार केलाय की रे. कोल्हापूरास एक प्लॉट घेतलोय. तेचीच जुळणा होईना. माझ्याकनं काय तुझं काम होईल असं वाटत न्हायी. कुणाकडं दुसऱ्याकडं मिळत्यात काय बघ." दाढीवर अखेरचा हात फिरवून म्हणत गावडूनं सहजच आपले हात झिडकारले.
" आठ दिवसात देतो. ठेऊन घेतन्हायी '' रामलिंगचं बोलणं ऐकायला गावडू थांबलाच नव्हता. ऐकलं न ऐकलं करुन रामलिंगला बेदखल गावडू करत कधीच घरात गेला होता.
आत गेलेला गावडू पून्हा येईल असं वाटल्यानं रामलिंग बराच वेळ ताटकळत उभा होता. पण गावडू बाहेर फिरकलाच नाही. थांबाव की परत जावं रामलिंगला अवघड झालं. गावडूच्या दारातले पाहुणे ही रामलिंग कडे जणू 'एकदा नाही म्हटल्यावर आणि खरकटमुंडयासारखं अजून कशाला थांबलाय?' या नजरेनं बघत होती. बराच उशिरझाला. रामलिंगला आणखीणच अवघडल्या सारखं झालं.गावडूच्या या वागण्यामुळं रामलिंगला अपमानीत झाल्यासारखं झालं. रामीलंगला खुपच राग आला होता. त्याला आणखी वेळ त्याला थांबावसं वाटलं नाही. त्यानं आपल्या एमएटीला किक मारली नि थेट घराकडंच गेला. घरातही काहीच न खाता सरळ कामावर आला होता.
सकाळीच घडलेला हा प्रसंग रामलिंगनं खुपच मनाला लावून घेतला होता. सकाळी झालेल्या अपमानाचा राग आता तो थापीतून भिंतीवर काढत होता.
चाळोबानं समजूत घालूनही गावडूच्या वागणं रामलिंगच्या मनातून जाता जात नव्हतं. चाळोबाच्या बोलण्यानं रामलिंग एकाकी भावूक झाला होता. स्वतःशीच बोलल्यासारखं चाळोबासमोर मन मोकळं करत होता. "आपल्या हाताखाली कामाला असताना याच गावडूला आपण त्याच्या बरोबर भावासारखं, मित्रासारखं वागवलं होतो. आपल्यासोबतच त्यालाही जेवणखाणं चहापाणी मदत करत होतो. प्रत्येक कामात त्याला सोबत घेत होतो. आणि यानं मात्र मला अंधारात ठेऊन माझ्या नावाचा वापर करुन माझ्या कामाकडं बघून मिळालेली काम स्वतःच्या नावावर घ्यायला सुरवात केली होती. त्यात माझीबी थोडी चूक हायच खरं.. मी जरा धाडस करून पुढं जाईतो तर याला कामं मिळेती काय? आपल्यामुळेच एवढा पैसा कमवूनही माझ्या एका वाईट अडचणीच्या प्रसंगाला माझी एक एवढीसकी नड भागवली न्हायी " आपल्या मनातली ही सल तो चाळोबासमोर बोलून दाखवत होता. म्हणत होता," अरे मी आयुष्यात कुणाचं वाईट केलं नाही. एवढं चांगलं राहुनही माझ्या वाटेला असं का? '
" अरे आतंच जगच तसं हाय. इथं चांगल्याचं चांगलं आणि वाईटाचं वाईट कधीच झालं न्हायी... ! अरे आता त्या गावडूचच बघ की, तुला फसवून सुद्धा त्याचं काय वाईट झालं? तुझ्यापेक्षा आता चांगलंच झालं की तेचं ?
"न्हायी चाळोबा, बघच तू. प्रत्येक गोष्टीस आणि प्रत्येक माणसाची एक येळ असते . ज्या त्या वेळी जे व्हायच ते होतयच. अरे देव देऊनबी बघताय आणि घेऊनबी बघताय... खरं आपण धर्मानच वागायचं असतयं. हेच दिवस कायम ऱ्हाणार नाहीत . मग ते माझे असु दे न्हाय तर त्याचे असुदे. बघशिलच तू. " ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा हलकेसं पुसत रामलिंगनं आपल्या मनाची समजूत घालत चाकोबापुढं आपलं मन मोकळं केलं होतं.पाऊसही आता बराच कमी होत आला होता. काळ्याकुट्ट ढगांनी भरलेलं आभाळही आता बरचं मोकळं होत होतं. अंधारुन गेलेली खोलीही बाहेरच्या प्रकाशाने अगदी उजळून गेली होती.
जयवंत जाधव , कोवाड
ता चंदगड जि कोल्हापूर
मो - 9403463881
No comments:
Post a Comment