रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

कविता - रंगीत संध्याकाळ

रंगीत संध्याकाळ

शांत सुंदर संध्याकाळी
रंगीत झाली धरती सगळी

किरणे येता लाल पिवळे
रंगीत किमया आली आभाळी

शुभ्र ढगही झाले केसरी
निळे आकाश निळाई विसरी

पिवळी पिके सोनेरी झाली
हिरवी झाडे चमकू लागली

परतले पक्षी पहा पटापट
लाल चोचची पोपटी पोपट

रांगा करुनी पांढरे बगळे
काळे कोकीळ काळे कावळे

मावळती दिशा रंग उधळी
रोज पाहतो मी संध्याकाळी


     ©जयवंत जाधव,कोवाड
     ता . चंदगड जि कोल्हापूर
     मोबाईल9403463881

कविता - दारिद्रय रेषा

दारिद्र्य रेषा

कार्डच आमचं 
पिवळं हाय
धान्याची कमी
आम्हाला नाय

दारिद्रय यादीत
आमचं नाव
सगळ्या वस्तूंना
कमीच भाव

सरकार बांधून
देतंय घर
रहायला आमचा
कसला घोर

कितीही वापरा
घरात वीज
बीलही फक्तच
कमाल वीस

सगळं मिळतं
फुकट राव
घेईनात कुणी
कामाचं नाव

असंच कायम
राहिलं तर
आळशी होईल
आमचं घर

नकोच आम्हाला
फुकट दाम
मोबदल्यात द्या
हाताना काम

     ©जयवंत जाधव, कोवाड
     ता चंदगड जि कोल्हापूर
     मो .9403463881

कविता - ऐक्य

ऐक्य

हिंदु मुस्लिम ही फक्त
वागण्याची रीत आहे
दोघांचेही समान रक्त
एक आपले चित्त आहे

नमाज र्किवा पडा पाया
पण करु नका भेद रे
देशाचे  कायदेच माना
कुराण आणि वेद रे

नाते जोडा प्रेम दयेने
दंगलधोपे करू नका
धर्मांधतेच्या हट्टापायी
निष्पाप जीवा मारु नका

सोडून मूळ धर्मतत्वे
स्वतःचे मत रेटू नका
स्वैर आणि क्रूर हिंसेने
धर्म बदनान करु नका

     ©जयवंत जाधव, कोवाड
     ता चंदगड जि कोल्हापूर
     मो .9403463881

कविता - हादगा

हादगा

हादगा म्हणजेच भूलाबाई
खेळ घ्यायच्या आमच्या बाई
समानता शिकवणारा हा खेळ
बालपणी मी खेळलो किती वेळ
गीत हादग्याचे समानतेचे
फिरून फिरुन तिथेच यायचे
खिरापत
सगळ्यानी एकत्र करून खायची .
खिरापत नव्हेच,
शिकवण मिळून मिसळून खायची .
पण
माझा खाऊ
कधी घेतलाच नाही मिसळून
घरातीलही
आणि
घरच्या डब्यातून आणला म्हणून
दुकानातीलही .
बाई ओळखायला सांगायच्या
डब्यातील खाऊ
फक्त आवाजाने .
पण
माझ्या वेदनेचा आवाज
त्याना ओळखताच आला नाही .
मलाही तेंव्हा ओळखता आलं नव्हतं .
बाईच्या हातातील डब्यातील खाऊ
आणि
बाईंच्या मनातील
माझी 'जात'


     ©जयवंत जाधव, कोवाड
     ता चंदगड जि कोल्हापूर
     मो .9403463881

कविता - खुर्चीसाठी

खुर्चीसाठी

होती निष्ठा देशप्रेम
प्रबळ इच्छा शक्ती
राजकारणात सेवा
प्रजेबाबत भक्ती

दिवस ते बदलले
बदलले सारे नेते
वेळ आली म्हणायची
पहिलेच बरे होते

देशप्रेम आणि निष्ठा
केंव्हाच गेली उडत
नेते करती मौजा
प्रजा बसली रडत

सत्तेमुळे येतो पैसा
पैशांमुळे पुन्हा सत्ता
खर्चीसाठी मुडदे नि
तुडवी नितीमत्ता

समाज हिताची जर
आहे थोडी कणव
आरशासारखा लख्ख
देश पवित्र बनव....!

     ©जयवंत जाधव, कोवाड
     ता चंदगड जि कोल्हापूर
     मो .9403463881

कविता - मोल

मोल

अमृत म्हणजे काही नाही
ते तर निर्मळ जल रे
पाणी म्हणजे जीवन असती
अमृतासम बोल रे

उदरामध्ये भूमातेच्या
लपले पाणी खोल रे
जपून करा वापर याचा
समजून त्याचे मोल रे

जलस्थळ हा मोठा ठेवा
छोटा असो वा विशाल रे
प्रदूषणाने करू नकाच
शुद्ध पाण्याचे हाल रे

उद्योगात आणि शेतामध्ये
खाण्या पिण्यात जल रे
वापरण्यातही तुम्ही ठेवा
त्यामध्ये समतोल रे

     ©जयवंत जाधव, कोवाड
     ता चंदगड जि कोल्हापूर
     मो .9403463881

कविता - सांत्वन

सांत्वन

पावसाने या दगा दिला
करपली पिके सारी
जे वाचले तेही हिरावले
येता गारपीठ भारी

उध्वस्त झाले सारे शिवार
गोत्यात मी शेतकरी
दुबार पेरणी करून वाया
तोही बोजा उरावरी

जादा नको मला काही
मिळो पेरले ते तरी
आता तरी पहा मजकडे
उपाशी पालनकरी

कर्जमाफी आणि किती अनुदाने
घोषणा या सरकारी
खोटेच आकडे मदतीचे
निव्वळ कागदावरी

संपून जाता सारे पर्याय
गळा लावता दोरी
उगा कशाला खोटं सांत्वन
येऊन सरणावरी ..

     ©जयवंत जाधव, कोवाड
     ता चंदगड जि कोल्हापूर
     मो .9403463881