रविवार, ६ जुलै, २०२५

कविता - वृद्धत्व

वृद्धत्व

हबकून गेलंय मन
थबकून गेलीय बुद्धी
सावरत नाही तोल
नाही पहिल्या सारखी शुद्धी

पोखरून गेलंय काळीज
खाकरुन गेलाय गळा
सोसवत नाहीत खरंच
आता वृद्धत्वाच्या झळा

जखडून गेलेत पाय
आखडून गेलेत हात
सोबतीला जमले आता
कफ दमा आणि वात

बिचकून गेलोय मी
दचकून गेलीय ती
हेटाळणीशिवाय आता
काहीच नाही हाती

रिचवत नाहीत शिव्या
नि पचवत नाही अन्न
एकाकीच्या भावनेने 
मन झाले आहे खिन्न

खिदळत ये रे यमा
उधळत तुझा रेडा
उचलून ने आम्हा
नकोच विलंब थोडा

     ©जयवंत जाधव,कोवाड
     ता. चंदगड जि. कोल्हापूर
     मोबाईल 9403463881

कविता - लेक

लेक

खरोखरच लेक माझी
सुंदर एक परी
व्याकूळायचो नसेल ती
एक दिवस जरी

पैंजन पायी चिमूकले
नाद घुमायचा घरी
कासावीस मन व्हायचे
आवाज चुकला तरी

किती खुप गोड बडबड
कधी खुप लाजरी
हसतमुख गोड कळी
फुलायचो साजरी

काल काल तर मजकडे
बालहट्ट रोज करी
आता वागते मोठ्यांसारखी
घेऊन जबाबदारी

कधी मोठी झाली ती
मलाच कळले नाही
बघता बघता उरकेलही
तिची लगीन घाई

फोडाहून तळहाताच्या
जपलो किती तरी
आपले धन दान देतो
कुठल्या परक्या घरी

आठवून मी घायाळ होतो
आसवे गालावरी
माझीच लेक मला परकी
ती जाताच सासरी

           
     जयवंत जाधव कोवाड
     ता . चंदगड जि कोल्हापूर
     मोबाईल9403463881

बालकविता - सोनीची शाळा

बालकविता -सोनीची शाळा
नको नको शाळा ती
नको तिथली गचडी
रोज  रोज  खायाला
तिच  तिच  खिचडी

बाईंची आमच्या त्या
असे सदा वट  वट
रोज रोज धोकंपट्टी
म्हणे करा  पट पट

नुसताच अभ्यास
नसतोच कधी खेळ
जाता  जात नाहीच
माझा शाळेतला वेळ

रोज  तिच  पुस्तके
नि त्याच त्याच वह्या
अभ्यास चुकला म्हणे
आणा पालकांच्या सह्या

तेच  तेच  कारण
नि तिच तिच शिक्षा
तुरुंगवासही  बरा
आमच्या शाळेपेक्षा

त्याच त्याच प्रार्थना
नि त्याच त्याच बाई
मी आजपासून मुळी
शाळेला जाणार नाही

म्हणते सोनी आईला
येऊन लाडात थोडी
तुझ्या सारखी बाईंना
नाही माया,लाडीगोडी

श्री. जयवंत जाधव, कोवाड
मोबा. 9403463881

बालकविता - आईस्क्रिम

बालकविता
आईस्क्रिम

दोन हातात दोन
आईस्क्रिमचे कोन

किती किती थंडगार
गोड मधूर चवदार

पिस्ता, चॉकलेट फेवर
काजू बदाम त्यावर

किती प्रकार एकेक
तऱ्हेतऱ्हेचे ते शेक

रोज मारतो ताव
रोज वेगळी चव

तोंडात सारे माखतो
मिटक्या मारत चाखतो

जेंव्हा खाऊन संपते
पुन्हा हवेसे वाटते

      जयवंत जाधव, कोवाड
      मोबाईल  9403463881

कविता - मोबाईलचं याड


आला नवा जमाना, आले नवे फॅड
सोनू सोनीला लागलं मोबाईलचं याड ॥धृ॥

वाचन गेले लेखन गेले
अभ्यास झाला डिलिट
रोज एक एक नवीन ॲप
त्यानं डोकं झालंय मॅड
सोनू सोनीला लागलं मोबाईलचं याड    ॥१॥

खेळ नाही अभ्यास नाही
रोज नवा मोबाईलचा गेम
बसुन एकाच जागेवर दोघे
झाले डेऱ्यासारखे जाड
सोनू सोनीला लागलं मोबाईलचं याड ॥२॥

हसणे बंद, बोलणे बंद
मैत्रीही विसरली सारी
पूर्वीचे सारे संस्कार जाऊन
चांगली मुले बनली बॅड
सोनू सोनीला लागलं मोबाईलचं याड ॥३॥

मम्मी पप्पांच ऐकून एकदा
जेंव्हा सोडला मोबाईलचा नाद
मित्र, नातलग आनंदासह सारे
झाले पुन्हा कुटुंबात ॲड
सोनूसोनीच गेलं आता मोबाईलचं याड   ॥४॥

बालकविता - सोनी झाली मॅडम

बालकविता _
 सोनी झाली मॅडम

सोनी झाली मॅडम
धरुन बसली खुर्ची
पाहून साऱ्या मुलांच्या
नाकाला झोंबली मिर्ची

चष्मा चढवून नाकावर
गणित शिकवते फळ्यावर
अवघड तिच्या गणिताने
मुलं आली ताळ्यावर

मोठा मोठा तोरा दावून
अभ्यास तपासते पोरांचा
छाडीचा ती मार देते
अगदी अगदी खरंचा

खऱ्या मॅडम येताच वर्गात
मुले तक्रार करता सगळीच
सोनी म्हणे, नाही करणार
पुन्हा मी अशी अगळीक


    जयवंत जाधव, कोवाड
    मोबा.9403463881

कविता - गावाकडचा पोऱ्या

💁🏻‍♂गावाकडचा पोऱ्या💁🏻‍♂

धावत गाठतो वळणी रस्ता
हिंडतो डोंगर आणि दऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

झाडा झुडपात माझी ही शाळा
खेळ विटी दांडू आणि दोऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

खायाला रानातील रानमेवा
कांदा, चटणी नि भाकऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

माहित नाहीच खोटे बोलणे
करत नाही चोऱ्यामाऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

नाही जगत सिनेमासारखे
गोष्टी जगतो खऱ्याखुऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

राबतो मी रोजच शेतावर
हाती  गुरे,बैलांच्या  दोऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥


ऊना पावसात खेळून येतो
वेचून खातो   थंड  गाऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

नाही करत केवळ अभ्यास
सोबत मौजा, खोड्या साऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

       जयवंत जाधव, कोवाड
       ता. चंदगड जि.कोल्हापूर
       मोबाईल ९४०३४६३८८१