हबकून गेलंय मन
थबकून गेलीय बुद्धी
सावरत नाही तोल
नाही पहिल्या सारखी शुद्धी
पोखरून गेलंय काळीज
खाकरुन गेलाय गळा
सोसवत नाहीत खरंच
आता वृद्धत्वाच्या झळा
जखडून गेलेत पाय
आखडून गेलेत हात
सोबतीला जमले आता
कफ दमा आणि वात
बिचकून गेलोय मी
दचकून गेलीय ती
हेटाळणीशिवाय आता
काहीच नाही हाती
रिचवत नाहीत शिव्या
नि पचवत नाही अन्न
एकाकीच्या भावनेने
मन झाले आहे खिन्न
खिदळत ये रे यमा
उधळत तुझा रेडा
उचलून ने आम्हा
नकोच विलंब थोडा
©जयवंत जाधव,कोवाड
ता. चंदगड जि. कोल्हापूर
मोबाईल 9403463881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा