रविवार, ६ जुलै, २०२५

कविता - गावाकडचा पोऱ्या

💁🏻‍♂गावाकडचा पोऱ्या💁🏻‍♂

धावत गाठतो वळणी रस्ता
हिंडतो डोंगर आणि दऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

झाडा झुडपात माझी ही शाळा
खेळ विटी दांडू आणि दोऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

खायाला रानातील रानमेवा
कांदा, चटणी नि भाकऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

माहित नाहीच खोटे बोलणे
करत नाही चोऱ्यामाऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

नाही जगत सिनेमासारखे
गोष्टी जगतो खऱ्याखुऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

राबतो मी रोजच शेतावर
हाती  गुरे,बैलांच्या  दोऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥


ऊना पावसात खेळून येतो
वेचून खातो   थंड  गाऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

नाही करत केवळ अभ्यास
सोबत मौजा, खोड्या साऱ्या
मी  गावाकडचा  पोऱ्या  ॥

       जयवंत जाधव, कोवाड
       ता. चंदगड जि.कोल्हापूर
       मोबाईल ९४०३४६३८८१

सोमवार, १० एप्रिल, २०२३

लोकशाही रुजलीच नाही

लोकशाही रुजलीच नाही

'भावनेपेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ' ही निती
 मेंदूपर्यत कुणाच्या पोचलीच नाही.
 घराणेशाहीच्या या भारत देशात
 लोकशाही कधी रुजलीच नाही . ॥धृ॥

        खालचा खाली आणि वरचा वरच
        विषमतेची दरी कधी मुजलीच नाही.
        गीता , कुराण , बायबलच्या गर्दीत
        'घटना' कुणी कधी पुजलीच नाही.
        घराणेशाहीच्या या भारत देशात
        लोकशाही कधी रुजलीच नाही ॥ १ ॥

तुडूंब भरल्या तिजोऱ्या तरी
लुटारुंची हाव कधी भागलीच नाही.
खंडणी, लाच घेतांना नेत्यांसह
नोकरशाहीही कधी लाजलीच नाही 
घराणेशाहीच्या या भारत देशात
लोकशाही कधी रुजलीच नाही ॥ २ ॥

       विरोधात असता 'विकासाची बात'
       सत्तेत प्रगती कधी सुचलीच नाही
       विरोधासाठीच  विरोध  केवळ
       चांगल्यासाठी टाळी कधी वाजलीच नाही.
       घराणेशाहीच्या या भारत देशात
       लोकशाही कधी रुजलीच नाही. ॥ ३ ॥

गुलामगिरीचे ढग जमले देशावर 
स्वातंत्र्यात जनता कधी भिजलीच नाही.
खऱ्या लोकशाहीसाठी मतदारांनी
प्रबळ 'मत निती' कधी योजलीच नाही.
घराणेशाहीच्या या भारत देशात
लोकशाही कधी रुजलीच नाही  ॥ ४ ॥


'
              @जयवंत जाधव, कोवाड
              ता.चंदगड जि. कोल्हापूर
              मोबाईल - 9403463881

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२

एक विनंती ( कविता )

✒️🇮🇳✒️🇮🇳✒️🇮🇳✒️

एक विनंती

तुम्हा विचारवंत ,साहित्यिकांना
अजूनही एक मान आहे .
देश व समाजाच्या जडणघडणीत
तुमचं वेगळं स्थान आहे.

तडा जाऊ नये त्याला कधीही
याचे आपल्याला भान हवे.
आपल्यालाच आता पेलायचं आहे
देशापुढील आव्हान नवे.

लेखणी ठरावी 'आपली ताकद'
केवळ ती एक 'कला' नको .
तारक असावी जनतेला ती
कुणासाठीही  'बला' नको .

लोकशाहीला मारक असे
वर्तन तुमचे ठेऊ नका .  
चौथा स्तंभ तुम्हीच तिचा
हे कधीही विसरु नका.  

धन,पुरस्कार,पदासाठी कधी
बळी  कुणाच्या पडू नका. 
तुच्छ लोभापायी कुणासाठी
कर्तव्य आपले  सोडू नका.

कुणा एक पक्ष वा नेत्याचा
'प्रवक्ता' तूम्ही होऊ नका.
एकांगी समर्थन वा विरोधाचा
मक्ता कधी तूम्ही घेऊ नका.

आपल्या नेत्याचे लपवून सारे
फक्त दुसर्‍यांचेच गैर दावू नका.
खरेखोटे साऱ्यांचे बाहेर काढा
तुम्ही कुणाचीच खैर ठेवू नका.

माझा-तुझा असा कधीही
मनात तुमच्या भेद नको.
लोकशाहीतील निष्पक्षतेला
तुमच्याकडून छेद नको.

मी भारतदेश  विनंती करतो,
शब्द माझा मोडू नका .
देशविघातक,भ्रष्ट प्रवृत्तीला
ढिले तुम्ही सोडू नका .
ढिले तुम्ही सोडू नका .

🙏🙏🙏🙏🙏🙏
✒️     जयवंत जाधव, कोवाड
          ता.चंदगड जि. कोल्हापूर
          मोबाईल 9403463881

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
ब्लॉग 
http://jayvantjadhav.blogspot.com/

रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

कविता - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

[ कविता ]
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव   


भारत आमची शान आहे 
जगात उंच मान आहे . 
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 
हा माझा अभिमान आहे .   ॥ धृ ॥


पंच्याहत्तरी गाठली आहे. 
भारत माता नटली आहे. 
काही बाबतीत अभिमान तर 
काही बाबीत आत्मियता घटली आहे .         


महागाईचा जोर आहे 
गरिबांना घोर आहे 
टाळूवरचे लोणी खाणारा
प्रत्येक जण चोर आहे .  


बेकारीची छाया आहे 
शिक्षण सारे वाया आहे 
नफेखोर उद्योगपतींकडेच  
साठली सारी माया आहे       


शेतकरी,कामकरी गोत्यात आहे  
अनुदान भलत्यांच्या खात्यात आहे. 
सरकारी लाभ फक्त त्यालाच    
जो नेत्यांच्या नात्यात आहे.  
       

जात धर्म मोठा आहे   
देश त्यापुढे थिटा आहे . 
दहशत आणि दंगलीत साऱ्या   
अनेक पक्षांचा वाटा आहे.       


घराणेशाही ही कीड आहे. 
वारसांसाठी नेत्यांची भीड आहे.  
लोकशाहीतील या राजेशाहीची   
जनतेच्या मनात चीड आहे .    


बरेच नाही  चांगले तसे 
सारेच काही वाईट नाही 
उंच शिखरावर नसलो तरी 
एकदमच काही खाईत नाही .     


इथे बुद्धीमत्ता आणि तंत्र आहे . 
उद्योगात आधुनिक यंत्र आहे 
अंतराळातील भरारी आणि 
अध्यात्मिक शांतीचा मंत्र आहे         


सबला बनली नारी आहे. 
पुरुषा इतकीच भारी आहे.  
मुलगा मुलगी एक समान 
घोषणा अगदी खरी आहे .


'संस्कृती' एक ठेवा आहे 
प्रत्येक खेळात छावा आहे . 
वेष भाषा आणि अन्न म्हणजे 
विविध मेजवानीचा मेवा आहे .  

निसर्ग इथला रम्य आहे. 
खरंच स्वर्गाशी साम्य आहे .
पक्षी,प्राणी आणि वन,नद्या 
प्रत्येकातच गम्य आहे.

सेना जगात भारी आहे 
'घटना' देखील न्यारी आहे. 
या दोन्हींच्या हातामध्येच 
देश सुरक्षेची दोरी आहे.

उत्साही शहर नि गाव आहे 
उत्साही रंक आणि राव आहे 
स्वातंत्र्यसेनानींसाठी मनामनात 
कृतज्ञतेचा भाव आहे .

भारत आमची शान आहे 
जगात उंच मान आहे . 
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 
हा माझा अभिमान आहे . 
हा माझा अभिमान आहे .


         जयवंत जाधव, कोवाड
         ता.चंदगड जि. कोल्हापूर
         मो.9403463881

🙏🇮🇳🇮🇳🇮🇳❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
.