शनिवार, २५ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे ६१ ते ६३

......वात्रटिका

६१)

भावनेभोवती फिरू नका
असा जनतेचाच 'रेटा' आहे. 
'व्हिजन' नाहीच कुठलंही
यात देशाचाच 'तोटा' आहे.

६२)

दिखावूपणाचे वैर यांच्यात
हा राजकारणाचा 'खेळ' आहे.
नंतर मात्र एकमेकांशी त्यांचा
चांगलाच जमणार 'मेळ' आहे

६३)

एका घरातच अनेक पक्ष
हा न सुटणारा 'गुंता' आहे.
मतदारसुद्धा दोन्ही डगरीवर
ही नेत्यांही 'चिंता' आहे.


.......... ©जयवंत जाधव, कोवाड
              जि. कोल्हापूर
             9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ६४ ते ६६

....वात्रटिका

६४)

'दारु' म्हणू नका कुणी  तिला.
ती जालिम एक 'दवा ' आहे.
त्या वासाच्याच जोरावर सध्या
त्यांच्या विजयाची 'हवा ' आहे.


६५)
कुटुंबातील प्रत्येकजण
प्रचारात 'व्यस्त ' आहे.
मतदानापर्यंत कार्यकर्ता 'किंमती'
निकालानंतर 'स्वस्त' आहे.

६६)

पुढे पळा पुढे पळा
'घबाड' आता गावणार आहे.
चहापेक्षा किटली गरम
अशांचं आता फावणार आहे

.......... ©जयवंत जाधव, कोवाड
              जि. कोल्हापूर
             9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ६७ ते ७०

......वात्रटिका

६७)
मिठी मारुन 'आँखे मारना' असा
नेहमी यांना 'छंद ' आहे.
'चाँद पे खेती' नि 'आलू से सोना' सारखाच
'बहात्तर'लाही ' गंध' आहे.

६८)

त्यांच्यासारखीच यांचीही सुसाट
हिंदुत्वाची सुटली गाडी आहे.
कपाळी टिळा नि गळ्यात माळा
आणि ' ड्रेस' ऐवजी साडी आहे.

६९)

कोण कुठे कधी गुपित
बंद दाराआड 'भेटत' आहे.
राजकारणही फाल्गुना सारखं
अगदी रमरमून 'पेटत' आहे.

७०)

अंतराळातील 'विकास' देशाला
खरोखरच भावला आहे.
'इस्त्रो'लाही 'मुहुर्त' बरोबर
निवडणूकीतच (?)  गावला आहे.



       .......... ©जयवंत जाधव, कोवाड
              जि. कोल्हापूर
             9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ७१ ते ७५

....वात्रटिका


७१)
वाजली तर वाजणार अशी
त्यांची *गाजरा* ची *'पुंगी'* आहे.
घोषणापत्रातील आश्वासनही
त्यांच्यासारखेच  *'ढोंगी'* आहे

७२)

प्रचारात आरोपप्रत्यारोपाचा
सुरु झाला *थरार* आहे.
जनतेला मूर्ख बनवण्याचा 'त्यांच्यात'
आलिखित *करार* आहे.

७३)

एकीकडे स्ट्राईक तर
दुसरीकडेच *धक्का* आहे.
'तन' इथे  तर 'मन' तिकडे
इरादा त्यांचा *पक्का* आहे.

७४)

काहींचं धोरण एकदम *राईट*
तर काहीजणांचं *लेफ्ट* आहे.
काहीचं एकदम *कडक* तर
काहींचं एकदमच *सॉफ्ट* आहे.

७५)

देश हिताचे ज्यांच्या कडे
ठाम, भक्कम *धोरण* आहे.
त्याच पक्षाची संसदेवर *गुढी*
आणि विकासाचे *तोरण* आहे.



....©जयवंत गणपती जाधव,
     कोवाड ता.चंदगड जि.कोल्हापूर
      9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे ७६ ते १००

नमस्कार,
   गेले २५ दिवस सुरू झालेली आणि *निवडणूक* हा एकच विषय असलेली माझ्या *वात्रटिकांची मालिका* 
    काहींना आवडल्या. काहीनी प्रेरणा दिली. त्यांचे मनःपूर्वक *आभार..


७६)

'राज'कारणात त्यांची द्विधा
आणि खुपच झाली 'घाई' आहे.
घड्याळाच्या हातासाठी त्यांच्या
बोटाला लागणार 'शाई' आहे.

७७)
एकीकडे डोळा तर 
दुसरीकडे 'नेम' आहे. 
दिसायला लोकसभा पण
विधानसभेचा 'गेम' आहे.

७८)


नट आणि नट्यांनी घेतली
राजकारणात 'उडी ' आहे.
नेत्यांची मात्र अभिनयात
अभि'नेत्यां'वरही  'कडी' आहे.

७९)

भाजपाचा खामोश 'शत्रु '
काँग्रेसचा झाला मित्र आहे.
यांच्यात काय नि त्यांच्यात काय
सर्वत्र एकच चित्र आहे.

८०)
( बेळगांव स्पेशल)

'मराठी आस्मिता' साठी लढायचा
लोकसभेचा 'लढा' आहे. 
आपापसात लढणे म्हणजे
हा 'एकीकरणाला'  तडा आहे.
८१)
( बेळगांव स्पेशल)

कमळाबाईना हिंदुत्वाची
बघू किती 'साथ' आहे.
निधर्मी जनता दलाचा किती
काँग्रेसला मिळणार 'हात' आहे.

८२)

कोण येणार कोण येणार
प्रत्येकजण गर्क आहे.
कट्टयावरच्या प्रत्येकाचा
वेगवेगळा तर्क आहे.

८३)

निवडणूकागणिक मतदानात
थोडी वाढ,थोडी घट आहे.
वाढल्यास चिडीचुप्प. नसल्यास
हा ईव्हीएम चा कट आहे.
८४)


एकात 'देव' दुसऱ्यात 'नर'
दोघांच्या नावात 'इंद्र' आहे.
एकाच्या डोक्यात 'राज्य' तर
दुसऱ्याच्या मनी 'केंद्र' आहे.

८५)

कार्यकर्त्यांच्या खिशात 
सध्या 'पैसे' खणाणत आहेत .
कार्यकर्त्यांच्या 'कॉकटेल'ने
नेत्यांचे *'धाबे'* दणाणत आहेत.

८६)


मतासाठी घिरट्या आकाशी
कावळ्यांसह *पक्षांचा* 'थवा' आहे.
'माया ममता' 'फुल' मुलायम त्याना
*आप* लेपणाचा *हात* 'हवा' आहे.

८७)

'नव्यांना संधी नि जुणे जाणार
आता नक्की बदल होणार आहे
आईबाबा ऐवजी आता त्यांचच
एक तरी पोरगं येणार आहे.
.
८८)

माघारी साठी ज्याची त्याची
कोटी कोटीची 'भाषा' आहे.
नाही नाही म्हटले तरी निदान
काही लाखांची 'आशा' आहे.

८९)
टक्केवारीत काम करणे
जडला त्याना 'आजार' आहे.
देशसेवेच्या नावाखाली
दलालांचा भरला 'बाजार' आहे.

९०)


कल्पवृक्षाचा विकास असा
एकाकडे  'करवत' आहे.
आणि संगोपनेचं पाणीही 
दुसरीकड़े  'जिरवत' आहे.

९१)

एक महिन्याचे काम आणि
पगार पाच *वर्ष* आहे. 
उत्पन्न वाढणार दसपट अशी
*नेतेगिरी* हा  परिस *स्पर्ष* आहे.

९२)


बुद्धांपासुन युद्धापर्यंत
चर्चेत एक एक ' मुद्दा 'आहे.
आपली बाजू लढण्यासाठी
तयार एक एक 'योद्धा ' आहे.

९३)


मूठीत गू आणि वरनं धु
अशी त्यांची निती आहे.
गोड बोलून खोड मोडतील
अशी थोडी भिती आहे.

९४)


'हाता'खालील कामकरी
मागंमागं सरत आहेत.
घङ्याळाचे काटेही
उलटेसुलटेे फिरत आहेत.

९५) .

कुठे कुठे लटका राग
कुठे दिखाऊ मेळ आहे.
एकीकडे सिंगल 'चहा '
दुसरीकडे  "भेळ " आहे.
९६)


बिनकामाच्या नेत्यांची पत 
स्वकर्मानेच घसरत आहे.
मतदारराजाही  मत द्यायला
जाणिवपूर्वक विसरत आहे.

९७)

नेत्यांच्या आदेशाने सध्या
बंडोबांचा बाण भात्यात आहे.
माघारीसाठी माहित नाही
किती जमा 'खात्यात' आहे.

९८)

'जख्खड' तरी तरुण तडफदार
डीजीटल वर त्यांची 'छबी' आहे.
राजकारणातील 'तारुण्य' राखण्यात
प्रत्येक नेत्याची वेगळी 'खुबी' आहे.

९९)

जाती धर्माच्या राजकारणात 
विकासाला ठेंगा दावत आहेत.
वेगवेगळ्या रंगा सोबत नेते
सगळ्याना 'चूना' लावत आहेत.
*१००)*

*मतदान* मी करणारच
मौल्यवान माझे *मत* आहे.
*लोकशाही* च्या पिकवाढीला
ते *पोषक* असे *खत* आहे.

.......... © *जयवंत जाधव, कोवाड*
              जि. कोल्हापूर
             9403463881

वात्रटिका मार्मिक ठोसे १०१ १०२

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

१०१ )

मांडलिक झाले प्यादी,वजीर
आता राजानाही पटले आहे.(?)
'बुद्धी','बळा'च्या सारीपाटावर त्यानी
राजधानीचे तख्त गाठले आहे.

१०२)

आचारसंहितेच्या आधीच सारे
नाक्या नाक्यावर नारळ फोडत आहेत.
गल्लीबोळातल्या कॉर्नर सभात
'ते' भाषणे आपली झोडत आहेत.

         © जयवंत जाधव, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वात्रटिका मार्मिक ठोसे १०३ १०४

*वात्रट ठोसे*
( वात्रटिका )

१०३ )

सत्ते शिवाय तडफड यांची
खुर्चीत अडकला 'आत्मा' आहे.
"सत्तेसाठी कायपण " आणि
नितिमत्तेचाही 'खात्मा ' आहे.

१०४)

गल्लीपासुन दिल्लीपर्यंत
फक्त दलबदलूनाच संधी आहे.
लबाडांचीच इथे चलती
आणि प्रामाणिपणाला मंदी आहे.

         © जयवंत जाधव, कोवाड.
           ता. चंदगड जि. कोल्हापूर
           मो.9403463881